दैव देतं अन्... 'ऑस्कर'मध्ये चमकलेला 'स्लमडॉग'मधला सलीम पुन्हा झोपडपट्टीत!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 07:36 PM2020-01-28T19:36:11+5:302020-01-28T19:37:38+5:30

एका चित्रपटानं रातोरात स्टार झालेल्या अझहरवर पुन्हा झोपडपट्टीत राहण्याची वेळ

Slumdog Millionaire Star Azharuddin Ismail Back To Mumbai Slums | दैव देतं अन्... 'ऑस्कर'मध्ये चमकलेला 'स्लमडॉग'मधला सलीम पुन्हा झोपडपट्टीत!

दैव देतं अन्... 'ऑस्कर'मध्ये चमकलेला 'स्लमडॉग'मधला सलीम पुन्हा झोपडपट्टीत!

googlenewsNext

मुंबई: गरिब घरातला जन्म, झोपडपट्टीतलं बालपण, एका चित्रपटानं रातोरात स्टार आणि त्यानंतर परिस्थिती पालटल्यानं पुन्हा झोपडपट्टीत राहण्याची आलेली वेळ. स्लमडॉग मिलेनियर चित्रपटात सलीमची भूमिका साकारुन थेट ऑस्करसारख्या प्रतिष्ठीत सोहळ्याला उपस्थित राहिलेल्या अझरुद्दीन इस्माईलचं आयुष्य आता पूर्णपणे बदललं आहे. 12 वर्षांपूर्वी अचानक स्टार झालेला अझरुद्दीन पुन्हा एकदा अतिशय हलाखीत आयुष्य जगू लागला आहे. स्लमडॉग मिलेनियर चित्रपटासाठी निवड होण्यापूर्वी अझरुद्दीन वांद्र्यातील झोपडपट्टीत राहायचा. आता पुन्हा एकदा त्याच्यावर झोपडपट्टीत राहण्याची वेळ आली आहे. 

घरातून अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसेलल्या अझरुद्दीनची ३०० मुलांमधून स्लमडॉग मिलेनियरसाठी निवड झाली. या चित्रपटानं प्रचंड मिळवलं. तो ऑस्करलाही गेला. अझरुद्दीन चित्रपटाच्या टीमसह या सोहळ्याला उपस्थित होता. त्या लखलखत्या सोहळ्याला हजर राहणारा अझरुद्दीन आता पुन्हा एकदा बकाल झोपडपट्टीत राहू लागला आहे. स्लमडॉग मिलेनियरच्या यशानंतर दिग्दर्शक डॅनी बॉयलनं अझहर आणि त्याची सहकलाकार रुबिना कुरेशीसाठी जय हो नावाच्या ट्रस्टची स्थापना केली. झोपडपट्टीत राहणाऱ्या अझरुद्दीन आणि रुबिनाला चांगलं आयुष्य मिळावं, त्यांचं शिक्षण व्यवस्थित व्हावं, या हेतूनं या ट्रस्टची स्थापना करण्यात आली होती. 

अझहर आणि रुबिनाला ट्रस्टकडून एक-एक फ्लॅट देण्यात आला. याशिवाय दर महिन्याला त्यांना एक ठराविक रक्कमदेखील दिली जात होती. मात्र ट्रस्टनं दिलेला सांताक्रूझमधील फ्लॅट अझहरनं विकला असून आता तो पुन्हा झोपडपट्टीत राहू लागला आहे. कुटुंब आर्थिक संकटातून जात असल्यानं अझहरनं त्याचा फ्लॅट ४९ लाखांना विकला. अझहरनं काही रक्कम व्यवसायात गुंतवली होती. मात्र त्यात तो अपयशी ठरला, असं अझहरची आई शमीमानं सांगितलं. अझहर काही वाईट लोकांच्या संपर्कात गेला. तो अंमली पदार्थांच्या आहारी गेला, अशी धक्कादायक माहितीदेखील शमीमा यांनी दिली. 



घरातील सध्याची परिस्थिती अतिशय गरीब असल्याचं शमीमा यांनी सांगितलं. 'अझहर १८ वर्षांचा झाल्यावर ट्रस्टनं दर महिन्याला दिली जाणारी आर्थिक मदत बंद केली. त्यामुळे घर चालवणं अवघड झालं. अझहर वारंवार आजारी पडू लागला. त्याच्या  उपचारांवर बराच खर्च झाला. त्यामुळे आमच्याकडे फ्लॅट विकण्याव्यतिरिक्त कोणताही पर्याय उरला नाही,' अशी व्यथा शमीना यांनी मांडली. माझं स्टारडम संपलं असून आता चरितार्थ चालवण्यासाठी पैसे कमावण्यावाचून पर्याय नाही, असं अझहरनं सांगितलं. मी झोपडपट्टीत जन्माला आलो. मला पुन्हा तिथे जायचं नव्हतं. मात्र आता दुसरा पर्याय नाही, अशा शब्दांत अझहरनं त्याच्या भावना व्यक्त केल्या. 
 

Web Title: Slumdog Millionaire Star Azharuddin Ismail Back To Mumbai Slums

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.