परीघ विस्तारलेली मध्यमवर्गीय चौकट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 11:43 PM2019-07-20T23:43:52+5:302019-07-20T23:44:14+5:30

गौरव मालणकर याने नाटकात विविध प्रकारची चार पात्रे रंगवत आणि त्यांची स्वभाववैशिष्ट्ये टेचात उलगडत भन्नाट कामगिरी केली आहे.

Expanded middle class box | परीघ विस्तारलेली मध्यमवर्गीय चौकट

परीघ विस्तारलेली मध्यमवर्गीय चौकट

googlenewsNext

राज चिंचणकर

नाटकाचा पडदा उघडताच क्षणी डोळ्यांसमोर येते, ते त्या नाटकाचे नेपथ्य! या प्रथमदर्शनी नेपथ्याला टाळी पडली की रंगमंच आपसूक खुलतो आणि त्यावर कलेचा आविष्कार घडवणाऱ्या कलाकारांचा हुरूपही वाढतो. ‘दहा बाय दहा’ या नाटकाच्या शीर्षकातून जो अंदाज व्यक्त होतो, त्याला हे नाटक अजिबात अपवाद ठरलेले नाही. अशा वेळी या दहा बाय दहाच्या खोलीचे नेपथ्य महत्त्वाची कामगिरी बजावते. या नाटकातली ही खोलीही शक्य तितक्या मध्यमवर्गीय वैशिष्ट्यांनी काठोकाठ भरलेली आहे आणि या खोलीसह या नाटकानेही त्याचा चौकटीतला परीघ अधिक विस्तारला आहे.

नाटकाच्या शीर्षकाला प्रमाण मानत, एका चाळीतल्या दहा बाय दहाच्या खोलीत हे नाट्य खेळवण्यात आले आहे. या खोलीतला कर्ता पुरुष म्हणजे, टॅक्सी चालवत त्यावर घरही चालवणारा मोहन घाडीगावकर! त्याच्या या घरात त्याची बायको सुनंदा, मुलगी रिया आणि ‘आगाऊ कार्टा’ या व्याख्येत अचूक बसेल असा मुलगा रवी, हे सदस्य आहेत. अशातच, टिपिकल मध्यमवर्गीय जीणे जगणाºया मोहनच्या आयुष्याला कलाटणी देणारा एक दिवस उजाडतो. त्याच्या टॅक्सीत एक बाई तिची पर्स विसरून जाते आणि प्रामाणिकपणाचा वसा घेतलेला मोहन ती पर्स घरी आणतो. कुतूहलापोटी घाडीगावकर कुटुंब ती पर्स उघडतात. या पर्समध्ये महागडा मोबाइल, सोन्याचा हार वगैरे वस्तू सापडतात. साहजिकच, या मंडळींचे डोळे विस्फारतात; पण या वस्तू त्या बाईकडे परत करण्यावर मोहन ठाम राहतो. पण इतर तिघे त्याच्या या निर्णयाला पाठिंबा देत नाहीत. मधल्या काळात तो सोन्याचा हार सुनंदाकडून हरवतो. इथून या दहा बाय दहाच्या खोलीतले नाट्य खºया अर्थाने फेर धरू लागते.

रंगमंचावर निव्वळ धमाल घडवून आणण्याचा बेत, लेखकद्वय संजय जमखंडी व वैभव सानप यांनी या नाटकाद्वारे तडीस नेला आहे. त्यासाठी उपयोगात आणलेल्या दहा बाय दहाच्या खोलीच्या कॅनव्हासवर, अनेक करामती करत त्यांनी लेखणीद्वारे उठावदार रंगकाम केले आहे. या नाट्याला वेग आहे आणि तो तसाच कायम ठेवण्याची जबाबदारी दिग्दर्शक अनिकेत पाटील यांनी नीट पेलली आहे. खोलीतली चार मुख्य पात्रे आणि त्यांच्या आयुष्यात एका घटनेमुळे अवतीर्ण होणाºया अजून काही पात्रांचा हा गोतावळा त्यांनी फक्कड जमवला आहे. उपलब्ध नेपथ्याचा व्यवस्थित वापर करत, या खोलीच्या अवकाशात त्यांनी कलाकारांना छान खेळवले आहे.

चाळीतल्या खोलीचे यथार्थ दर्शन घडवणारे संदेश बेंद्रे यांचे या नाटकाचे नेपथ्य आकर्षक आहे. बारीकसारीक गोष्टींचा विचार करून आणि त्यांचा या खोलीत अंतर्भाव करून त्यांनी ही खोली सुबक सजवली आहे. खोलीतली एकूणएक प्रॉपर्टीसुद्धा तिला वास्तव रूप बहाल करते. नाटकाचे शीर्षक आणि खोलीचे नेपथ्य एकमेकांत चपखल मिसळून गेले आहे. आशुतोष वाघमारे यांचे संगीत व विजय गोळे यांच्या प्रकाशयोजनेने हे नाट्य अधिकच ठोस सादर होते.

तब्बल दोन दशकांनंतर रंगभूमीची पायरी चढणाºया विजय पाटकर यांनी दहा बाय दहाच्या या खोलीचा प्रत्येक कोन त्यांच्या अदाकारीने व्यापून टाकला आहे. इतक्या मोठ्या कालावधीनंतरही त्यांच्या रंगमंचीय अभिनयात दिसणारी ऊर्जा थक्क करून सोडते. अर्थात, यातल्या मोहनच्या भूमिकेत त्यांनी त्यांच्या खास लकबी वापरल्या आहेतच; परंतु महत्त्वाचे म्हणजे टिपिकल चाळकºयाच्या भूमिकेचे त्यांनी घेतलेले बेअरिंग कमालीचे वास्तवदर्शी झाले आहे. त्यांना तितकीच मोलाची साथ, यात सुनंदा रंगवणाºया सुप्रिया पाठारे यांनी दिली आहे. पण इतकेच नव्हे; तर या भूमिकेत स्वत:चे अस्तित्व कायम राखत, एक अफलातून पात्र त्यांनी उभे केले आहे. सहजाभिनयाचे उत्तम गुणदर्शन त्यांची सुनंदा या नाट्यात घडवते.

गौरव मालणकर याने नाटकात विविध प्रकारची चार पात्रे रंगवत आणि त्यांची स्वभाववैशिष्ट्ये टेचात उलगडत भन्नाट कामगिरी केली आहे. या पात्रात वेशभूषा व रंगभूषाकारांची कमाल दिसून येते. विदिशा म्हसकर हिने साकारलेली रिया, आश्वासकतेचे उदाहरण कायम करणारी आहे. प्रथमेश परब याचा यातला रवी, त्याच्या आतापर्यंतच्या इमेजला तडा जाऊ न देणारा आहे. अमीर तडवलकर यांच्या भारदस्तपणाची; तसेच संकेत बारे यांची योग्य साथ या नाटकाला मिळाली आहे. स्वरूप रिक्रिएशन व अष्टविनायक या संस्थांनी हे नाटक रंगभूमीवर आणून, रंगमंचावरच्या साचेबद्ध चौकटीबाहेर पाऊल टाकण्याचे काम केले आहे.

Web Title: Expanded middle class box

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.