पर्यावरणाच्या समतोलाचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 12:07 AM2020-06-05T00:07:15+5:302020-06-05T00:07:21+5:30

नवी मुंबईतील स्थिती : विकासाच्या नावाखाली पर्यावरणाची होते आहे हानी नवी मुंबई शहराचा विकास करण्याच्या नावाखाली पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. त्यामुळे नागरिकांना प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागत असून, आरोग्य धोक्यात आले आहे. शहरात पर्यावरणाचा समतोल राखणे हे मोठे आव्हान बनले आहे.

The challenge of environmental balance | पर्यावरणाच्या समतोलाचे आव्हान

पर्यावरणाच्या समतोलाचे आव्हान

googlenewsNext

योगेश पिंगळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : नवी मुंबई शहराला निसर्गा$ची मोठी देणगी लाभली आहे. दिघा ते बेलापूर एका बाजूला डोंगररांग असून दुसऱ्या बाजूला दिवा ते दिवाळेपर्यंत सुमारे २२ किलोमीटरचा खाडीकिनारा लाभला आहे. तसेच शहराला भूगर्भीय जलसंसाधनाचे विपुल साठे मिळाले आहेत. यामध्ये २४ तलाव व सरोवरे आणि ११ धारण तलावांचा समावेश आहे. शहराचे हवामान उष्ण व दमट आहे. शहरातील वार्षिक सरासरी तापमान २२ अंश सेल्सिअस ते ३६ अंश सेल्सिअसपर्यंत असते. उन्हाळ्यात ३६ अंश सेल्सिअस ते ४१ अंश सेल्सिअसदरम्यान बदलते. हिवाळ्यात किमान तापमान १७ अंश सेल्सिअस ते २० अंश सेल्सिअसपर्यंत राहते. शहरात सरासरी वार्षिक पर्जन्यमान २००० ते २५०० मिमी एवढे तर आर्द्रता ६१ ते ८६ टक्के एवढी आहे.
या शहराचा विकास करताना गेल्या २० वर्षांत इमारती उभारण्यासाठी झाडांची कत्तल केली असून भूमाफियांनी खाडीकिनाऱ्यांवर डेब्रिजची भर टाकून इमारती उभ्या केल्या. विकासाच्या नावाखाली जैवविविधताही धोक्यात आली आहे. खाडीकिनारी असलेली खारफुटी नष्ट करण्यासाठी प्रयत्न केला जातो. एमआयडीसीमधील कंपन्यांचे सांडपाणी प्रकिया न करता खाडीमध्ये सोडण्यात येत असल्याने जलप्रदूषण वाढले आहे. मुंबई-पुणे महामार्ग येथून जातो. जेएनपीटी बंदराकडे जाणाºया वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे वायुप्रदूषणात वाढ झालीे. उरणमधील खाडीकिनाºयावर डेब्रिजचा भराव टाकला असून, अनेक पाणथळांचे नुकसान झाले आहे. नवी मुंबई शहरात आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधण्यासाठी भराव आणि सपाटीकरण करण्याचे काम सुरू असून यामुळे शेजारील गावांमध्ये विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. पनवेलमधील कसाडी नदीच्या पात्रातही केमिकलमिश्रित पाणी सोडले जात असल्याने नदीतील मासे व इतर जैवविविधता धोक्यात आली आहे. याचा नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल टिकविणे एक आव्हान बनले आहे.

सन 2000 ची स्थिती
1. कचºयाचे वर्गीकरण आणि विल्हेवाट लावण्याची महापालिकडे कोणतीही प्रकिया उपलब्ध नव्हती.
2. शहर नव्याने विकसित होताना वाहनांची वर्दळ कमी होती. त्यामुळे प्रदूषणाचे प्रमाण अत्यंत कमी होते.
3. अनेक मोकळ्या भूखंडांवर मोठ्या प्रमाणावर झाडे होती. त्यामुळे शहरात हिरवळ पसरलेली होती.
4. शहरातील दगडखाणींमुळे
ध्वनी आणि वायुप्रदूषणात भर पडत होती. त्यामुळे नुकसान अधिक झाले.
5. सांडपाण्यावर प्रकिया करण्यासाठी अद्ययावत यंत्रणा नसल्याने खाडीतील पाण्यात प्रदूषण निर्माण होत होते.

सध्याची स्थिती
1. कचºयाचे सुका, ओला, घातक,
ई कचरा असे वर्गीकरण करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे काम पालिका करते.
2. शहरातील क्वाºया बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या प्रदूषणात घट झाली आहे.
3. विविध सुविधा उपलब्ध असल्याने नागरिकांबरोबर वाहनांची वर्दळ वाढून प्रदूषण वाढले आहे.
4. विकासाच्या नावाखाली झाडांची कत्तल करण्यात आल्याने नैसर्गिक हरित क्षेत्राचे नुकसान झाले आहे.
5. शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी अद्ययावत मलप्रकिया केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रक्रिया केलेल्या पाण्याचा बांधकाम, आणि उद्यानांसाठी वापर होऊ शकतो.

पर्यावरणपूरक जीवनशैलीसाठी...

1. नागरिकांनी आपले दैनंदिन कर्बउत्सर्जन कमी करावे. त्यासाठी कर्बपदचिन्हे, जलपदचिन्हे, पर्यावरणीय पदचिन्हे समजून घेऊन कमीतकमी करून जगावे.
2. आपले अन्न शक्यतो स्थानिक पातळीवरील विकत घ्यावे.
3. वस्तू खरेदी करताना त्याचा छुपा वा प्रत्यक्ष पर्यावरणावर
काय परिणाम होणार आहे याचा विचार करावा आणि ती वस्तू घ्यायची की नाही, ते ठरवावे.
4. पर्यावरणावर आणि कर्बउत्सर्जन कमी करण्यासाठी जागरूकपणे व्यक्त व्हा.
5. पाणी किती अंतरावरून येते ते पाहावे. लांबून येत असेल, तर कर्बउत्सर्जन वाढते. पाण्याचा पुनर्वापर करणाºयांना सवलत द्यावी आणि जे करीत नाहीत त्यांना शिक्षा व्हावी.
6. निसर्ग आॅक्सिजन देतो. आपण निसर्गाला काय परत देतो, याचा विचार करा. भावी पिढीला आॅक्सिजन मुबलक मिळावा म्हणून झाडे लावा.
7. शेतकरी, आदिवासी हे झाडांचे रक्षण करतात. त्यांना सरकारने अनुदान द्यावे. मग लोक झाडे जपतील.
8. कोणताही प्रकल्प आणताना त्याचा तत्काळ होणारा फायदा न पाहता भविष्यातील आपत्तीवर विचार व्हावा.
9. बायोडिझाईन तयार करून इमारती उभ्या राहिल्या, तर निसर्ग आपत्ती आणणार नाही.
10. शहरे हरित करण्यासाठी प्रयत्न करायला हवा. त्यासाठी सरकारने प्रोत्साहन द्यावे.

नवी मुंबईत पाण्याची नासाडी मोठ्या प्रमाणावर होत आहे. पुन:प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर झाला पाहिजे. सिडकोच्या माध्यमातून पर्यावरणाविरोधात अनेक कामे केली जात आहेत. नवी मुंबईत सिडकोकडे असलेले सर्व भूखंड महापालिकेकडे हस्तांतरित करणे गरजेचे आहे.
- सुनील अगरवाल, पर्यावरणप्रेमी

पर्यावरणाचे जतन करणे प्रशासनाबरोबर प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. खाडीकिनारी वसलेल्या नवी मुंबईचे संरक्षण कवच म्हणजे खारफुटी असून याचे नुकसान होऊ नये म्हणून काळजी घेण्याची आवश्यकता आहे. वाहनांमुळे प्रदूषण होत असून त्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.
- वासुदेव ढेकणे, पर्यावरणप्रेमी

Web Title: The challenge of environmental balance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.