प्रादेशिक भाषांत विद्यापीठ अभ्यासक्रमांचा अनुवाद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2021 06:12 AM2021-11-05T06:12:54+5:302021-11-05T06:13:01+5:30

केंद्राचा निर्णय; मराठीचाही समावेश, असंख्य विद्यार्थ्यांना दिलासा

Translation of university courses in regional languages | प्रादेशिक भाषांत विद्यापीठ अभ्यासक्रमांचा अनुवाद

प्रादेशिक भाषांत विद्यापीठ अभ्यासक्रमांचा अनुवाद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : विद्यापीठातील अभ्यासक्रमांचा मराठीसह सर्व प्रादेशिक भाषांमध्ये अनुवाद करण्याचा आदेश केंद्र सरकारने देशभरातील विद्यापीठांना दिला आहे. देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीचे अमृतमहोत्सवी वर्ष सुरू असून, त्यानिमित्त हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रादेशिक भाषांत सर्व अभ्यासक्रम ऑनलाइन उपलब्ध होणार असून, त्यामुळे असंख्य विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव रजनीश जैन यांनी यासंदर्भात विद्यापीठांना २ नोव्हेंबर रोजी एक पत्र लिहिले आहे. विविध अभ्यासक्रमांचा प्रादेशिक भाषांमध्ये अनुवाद करण्यासाठी २० नोव्हेंबरपर्यंत योजना तयार करण्याच्या सूचना विद्यापीठांना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ३१ ऑगस्ट रोजी एक बैठक घेतली होती. विद्यापीठीय अभ्यासक्रमांचे प्रादेशिक भाषांमध्ये अनुवाद केले जावेत, अशी शिफारस राष्ट्रीय शिक्षण धोरणात करण्यात आली आहे. 

यासंदर्भात केंद्रीय शिक्षण खात्यातील सूत्रांनी सांगितले की, देशामध्ये अनेक विद्यापीठांमध्ये विविध प्रकारचे अभ्यासक्रम चालविले जातात. भाषाविषय सोडले तर इतर विषयांचे अभ्यासक्रम हे इंग्रजीत असतात. ते जर प्रादेशिक भाषांमध्ये अनुवादित केले तर त्याचा असंख्य विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकेल. काही अभ्यासक्रम हे फक्त विशिष्ट भाषेतच आहेत. तेही अन्य प्रादेशिक भाषांमध्ये अनुवादित होणे आवश्यक आहे. त्यासाठी विविध विद्यापीठांच्या अधिकाऱ्यांशी या योजनेबद्दल आणखी सविस्तर चर्चा करण्यात येईल.  केंद्र सरकारच्या धोरणाबाबत अधिक माहिती मिळाल्यानंतरच त्या योजनेचा आराखडा आम्ही बनवू शकतो, असे जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे.

ऑनलाइनवर मिळणार अभ्यासक्रम
केेंद्रीय शिक्षण खात्याच्या सूत्रांनी सांगितले की, विद्यापीठांत सर्व अभ्यासक्रम प्रादेशिक भाषांतून शिकविणे शक्य नाही. मात्र सर्व अभ्यासक्रमांचे प्रादेशिक भाषांमध्ये केलेले अनुवाद ऑनलाइन उपलब्ध होणार आहेत. महाविद्यालयांत विविध शाखेत अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचा प्रादेशिक भाषांत अनुवाद करण्याचे काम एनएमईआयसीटीने पूर्ण करत आणले आहे. 

Web Title: Translation of university courses in regional languages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.