वाढत्या उन्हाच्या झळा यापुढे जीव घेतील?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2022 07:42 AM2022-05-18T07:42:08+5:302022-05-18T07:42:40+5:30

उन्हाळ्याची आजची परिस्थिती अवघड म्हणावी तर तापमानवाढीचा पुढचा काळ फारच चिंताजनक असेल. त्यामुळे आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होतील.

will the rising heat wave no longer survive | वाढत्या उन्हाच्या झळा यापुढे जीव घेतील?

वाढत्या उन्हाच्या झळा यापुढे जीव घेतील?

Next

डॉ. रीतू परचुरे

उष्णतेच्या लाटा हा प्रकार भारताला तसा अनोळखी नाही. देशातल्या काही भागांमध्ये दर वर्षी त्यांची आवक-जावक असते. पण या वर्षी मात्र देशातले बहुसंख्य भाग तीव्र किंवा अति-तीव्र उष्णतेच्या लाटांना  सामोरे गेले. याची सुरुवातही लवकर, म्हणजे मार्चमध्ये झाली. तापमानाचे आधीचे उच्चांकही मोडीत निघाले. आगामी काळाची चाहूल देणारी ही परिस्थिती आहे. उन्हाळ्याची आजची परिस्थिती अवघड म्हणावी तर तापमानवाढीचे पुढल्या काळातील अंदाज तर फारच चिंताजनक आहेत. भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयातर्फे वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे प्रयत्न  सध्याच्याच गतीने चालू राहिले तर २१०० सालापर्यंत भारतात सरासरी तापमान ४.४ अंश सेल्सिअसने वाढेल. १९७६ ते २००५ दरम्यानच्या काळाशी तुलना करता, उष्णतेच्या लाटांची संख्या दुपटीने किंवा तिपटीने अधिक असेल आणि त्यांचा कालावधीही दुपटीने वाढेल.  

जगभरातल्या संशोधनातून हे सिद्ध झालं आहे की तीव्र उष्णतेमुळे आरोग्यावर दुष्परिणाम होतात. ते कमीत कमी ठेवण्यासाठी मोठ्या स्तरावर प्रयत्न होणं अत्यावश्यक आहे. या प्रयत्नांची पहिली पायरी म्हणजे आरोग्याच्या परिणामांचे स्वरूप आणि व्याप्ती नीट समजून घेणं, त्यावर उपाययोजना करणं.

आपल्या शरीराचं तापमान संतुलित ठेवायचा प्रयत्न शरीर सतत करत असतं.  उष्ण तापमानात त्वचेच्या जवळच्या रक्तवाहिन्या प्रसरण पावतात, ज्यामुळे तिथला रक्तप्रवाह वाढतो, आणि उष्णता त्वचेद्वारे बाहेर टाकणं सहज शक्य होतं. परंतु, या प्रक्रियेचा हृदयावर ताण पडतो. ज्यांना हृदयाचे आजार आहेत अशांना हृदयविकाराचा झटका, हृदय बंद पडणे या गोष्टी संभवतात. दुसरं म्हणजे, उकाड्याने घाम येतो आणि घामाच्या बाष्पीभवनामुळे उष्णता बाहेर टाकली जाऊन शरीराचं तापमान नियंत्रित केलं जातं. खूप घामामुळे शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं. पुरेसे पाणी प्यायलं गेलं नाही तर शरीराचं तापमान वाढत जातं, तसेच मूत्रपिंडं अचानक काम करायचं थांबू शकतात. उष्णता आणि अपुरं पाणी हे चक्र बराच काळ चालू राहिलं तर वर्षांनुवर्षे पिच्छा पुरवणारे मूत्रपिंडाचे आजार दिसायला लागतात. तीव्र उष्णतेमुळे फुप्फुसांना सूज येणं, अचानक श्वास घ्यायला त्रास होणं, असेही परिणाम दिसून येतात. शरीराचं तापमान संतुलित राखण्याच्या प्रक्रियांचे नियमन मेंदूद्वारे होतं. अति-तीव्र तापमानात या संतुलन प्रक्रियेला मर्यादा पडतात आणि मग शरीराचं तापमान प्रमाणाबाहेर वाढतं, ज्याचं पर्यवसान उष्माघातात होतं. वेळेवर उपचार मिळाले नाहीत तर मृत्यू होऊ शकतो. 

उष्णतेमुळे होणाऱ्या आजारांची भारतातील परिस्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी प्रयास या पुण्यातील संस्थेने नुकताच एक अभ्यास केला. यात भारतात या विषयावर झालेल्या आतापर्यंतच्या  संशोधनाचा आढावा घेतला गेला. या अभ्यासातून असं दिसतं आहे की, उष्णतेच्या लाटेदरम्यान एकंदर मृत्यूंची (कुठल्याही कारणाने झालेले) संख्या वाढते. हे बरेचसे अभ्यास शहरांमध्ये झालेले आहेत. उष्णतेमुळे होणारे आजार विविध गटांमध्ये किती प्रमाणात आढळतात, यावरही संशोधन झालं आहे. असे अभ्यास मुख्यतः स्टील इंडस्ट्री, वीटभट्टी कामगार, बांधकाममजूर, वाहतूक पोलीस, शेतमजूर यासंदर्भात झाले आहेत. 

अनौपचारिक क्षेत्रात, जिथे बाहेर उन्हात काम करावं लागतं (उदा. किरकोळ विक्रेते, फेरीवाले, कचरा वेचक, रोजंदारी कामगार), अशा गटांमध्ये फारच कमी अभ्यास झाले आहेत. या क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या उत्पादकतेवर काय परिणाम होतो, याबद्दलही अधिक माहितीची गरज आहे. कडक उन्हाळा झेलणाऱ्या काही शहरी किंवा ग्रामीण भागातल्या घरांमध्ये काही अभ्यास आहेत. पण त्यांची संख्या अगदी बोटांवर मोजण्याइतकी कमी आहे. या अभ्यासांमध्ये २०-५०% लोकांना उष्णतेचा काही ना काही त्रास होता असं आढळलं. वयस्कर आणि दीर्घकालीन आजार असलेल्यांमध्ये (उदा. रक्तदाब, हृदय, मूत्रपिंड विकार, इ.) हे प्रमाण जास्त होतं. चिवट दीर्घकालीन आजारांचं प्रमाणही या घरांमध्ये बरंच होतं. पत्र्याची घरं, बंदिस्त घरं, अनियमित वीजपुरवठा असलेली घरं इथेही उष्णतेमुळे होणारी आजारपणं जास्त प्रमाणात होती. 

भारताबाहेर इतरत्र झालेल्या अभ्यासांतून इतरही काही घटक दिसून येतात - उदा. काही औषधांचं सेवन, मद्य सेवन, अगदी लहान वय - यामुळे आजारांचा धोका वाढतो. मैदानी खेळात सहभागी होणाऱ्या खेळाडूंना असलेली वाढती जोखीम हाही महत्त्वाचा मुद्दा पुढे येतो आहे. अतिउष्णतेचे मानसिक आरोग्यावरील परिणाम देखील नोंदवले जात आहेत.

तापमानाचा आलेख पुढील काळात वाढणार हे  जवळजवळ निश्चित आहे. त्यातून निर्माण होणारी अनारोग्याची जोखीम हा भारतापुढचा गंभीर प्रश्न असू शकतो. अति-उष्णतेला सामोरे जाणारे, उष्णतेच्या आजारांचा धोका अधिक असणारे, आणि उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी लागणाऱ्या साधन क्षमतेपासून वंचित असणारे अशा गट-समूहापर्यंत उपाययोजना पोहोचवाव्या लागतील. भारतातील याबद्दलची परिस्थिती कशी आहे, भावी संकटाला सक्षमपणे तोंड देण्यासाठी काय करायला हवं, याबद्दल उद्या उत्तरार्धात... ritu@prayaspune.org
 

Web Title: will the rising heat wave no longer survive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.