काॅंग्रेसचे स्वबळ शिवसेनेचे प्राण कंठाशी आणणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2021 05:42 AM2021-01-04T05:42:27+5:302021-01-04T05:43:23+5:30

Congress News: दोन काँग्रेसची मनमर्जी सांभाळून महाविकास आघाडी टिकविताना शिवसेनेला आपला `जीव की प्राण` असलेली मुंबई महापालिका ताब्यात ठेवणे कसे जमणार?

Will the strength of Congress bring the life of Shiv Sena to its knees? | काॅंग्रेसचे स्वबळ शिवसेनेचे प्राण कंठाशी आणणार?

काॅंग्रेसचे स्वबळ शिवसेनेचे प्राण कंठाशी आणणार?

Next

- संदीप प्रधान
वरिष्ठ सहायक संपादक,
लोकमत
मुंबई काँग्रेसला अखेर भाई जगताप यांच्या रुपाने अध्यक्ष लाभले. वर्षभरानंतर मुंबई महापालिकेच्या निवडणुका असल्याने नववर्षात मुंबईतील काँग्रेसजनांस काही कार्यक्रम देणे ही गरज ओळखून जगताप यांनी ‘माझी मुंबई, माझी काँग्रेस’ हा कार्यक्रम दिला. यामध्ये पुढील शंभर दिवसांत प्रत्येक वॉर्डात जाऊन लोकांच्या समस्या ऐकून त्या सोडविण्याकरिता प्रयत्न करण्याची जबाबदारी जगताप यांनी कार्यकर्त्यांच्या खांद्यावर सोपविली. केवळ तेवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर येत्या निवडणुकीत सर्वच्या सर्व २२७ जागा लढविण्याचा निर्धार व्यक्त केला. मुंबईवर एके काळी काँग्रेसने राज्य केले. स. का. पाटील, रजनी पटेल, मुरली देवरा यांच्या कार्यकाळात देशाची ही आर्थिक राजधानी व येथील लक्ष्मीपुत्र त्यांच्यापुढे नतमस्तक असायचे. १९९२ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेस-रिपाइंची सत्ता आली होती. १९९५ मध्ये राज्यात सत्ताबदल होऊन शिवसेना-भाजप युतीचे सरकार आल्यावर १९९६ मध्ये महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसमध्ये मोठी फूट पाडून शिवसेनेने काँग्रेसकडून सत्ता हिसकावून घेतली. त्यानंतर, या महापालिकेवर भगवा फडकत आहे. 


राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याकरिता शिवसेनेच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या महाविकास आघाडीत काँग्रेस सामील आहे. त्यामुळे जगताप यांनी केलेला निर्धार प्रत्यक्षात उतरवण्यात त्यांना समजा भविष्यात यश आले, तर महाविकास आघाडीतील फाटाफूट म्हणून त्याकडे पाहिले जाईल. अर्थात, काँग्रेसमध्ये कुठलाही निर्णय स्थानिक पातळीवर होत नाही. मात्र, जगताप यांनी हे विधान करण्यामागे दोन-तीन हेतू आहेत. वर्षानुवर्षे मुंबई काँग्रेस व प्रदेश काँग्रेस यांच्यात वेगवेगळ्या विषयांवर मतभेद राहिले आहेत. तीच प्रथा जगताप यांच्या कार्यकाळात सुरू राहणार, असे दिसते. काँग्रेस हायकमांड फारसे उत्सुक नसतानाही केवळ भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या हेतूने राज्यातील काही नेत्यांच्या आग्रहाखातर हायकमांडने महाविकास आघाडीच्या प्रयोगाला मान्यता दिली आहे. मात्र, मुंबईतील काही नेत्यांचा व मुख्यत्वे राज्य सरकारमध्ये मंत्रिपदे न मिळालेल्या काहींचा या सरकारला विरोध आहे. त्या नेत्यांना लागलीच तोंड देणे टाळण्याकरिता जगताप यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. काँग्रेस अध्यक्षपदाकरिता इच्छुक असलेल्या अर्धा डझन नेत्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या वाटून देऊन ‘सामूहिक नेतृत्वा’चा नवा प्रयोग हायकमांडने यावेळी केला आहे. कुणाही एकाला अध्यक्ष केला, तर अन्य इच्छुक कारवाया सुरु करतात हा वर्षानुवर्षांचा अनुभव असल्याने, जगताप यांनी स्वबळाच्या बेटकुळ्या फुगवल्या नसत्या, तर पहिल्याच फटक्यात हायकमांडचा प्रयोग फसला असता. त्यामुळे सर्व गटातटांना सोबत घेऊन जायचे व त्यांच्या समर्थकांना सोबत ठेवायचे, तर २२७ मतदारसंघातील उमेदवारीचे गाजर सतत दाखवत राहणे ही त्यांची गरज आहे. 


काँग्रेसचा १३६वा स्थापना दिन अलीकडेच साजरा झाला. त्याच वेळी जगताप यांनी सूत्रे घेतली. त्याच तोंडावर शिवसेनेच्या मुखपत्रातून यूपीएचे अध्यक्षपद शरद पवार यांना देण्याचा विषय उपस्थित केला गेला. राज्यात तीन पक्षाचे सरकार असताना, सेनेचे खा. संजय राऊत यांनी या विषयाला तोंड फोडून काँग्रेसच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवले. पवार यांच्या ऋणातून उतराई होण्याकरिता राऊत यांनी हा उपदव्याप केला की, सतत चर्चेत, वादात राहण्याची खोड अंगी भिनल्यामुळे राऊत यांनी हा वादविषय छेडला, ते त्यांचे त्यांनाच माहीत, पण त्यामुळे महाविकास आघाडीच्या प्रयोगाला विरोध असलेल्यांना आक्रमक होण्याची संधी लाभली. अर्थात, राऊत यांच्या त्या खोडीच्या पार्श्वभूमीवर जगताप यांनाही स्वबळाचा नारा देणे अपरिहार्य झाले. राऊत अथवा शिवसेना विनाकारण काँग्रेस हायकमांडच्या विरोधात काड्या करीत राहील, तर राज्यातील नेत्यांना महाविकास आघाडीतून बाहेर पडणे अपरिहार्य ठरू शकते असे होऊ न देता. दोन काँग्रेसची मनमर्जी सांभाळून महाविकास आघाडी टिकविताना शिवसेनेला आपला `जीव की प्राण` असलेली ही महापालिका ताब्यात ठेवायची आहे.

Web Title: Will the strength of Congress bring the life of Shiv Sena to its knees?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.