ट्रम्प यांना भारत भेटीचा फायदा होईल?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 03:02 AM2020-02-17T03:02:14+5:302020-02-17T03:04:41+5:30

अमेरिकेच्या निवडणुकीत भारतीय वंशाच्या समुदायाची भूमिका महत्त्वाची

Will Donald Trump benefit from India visit? | ट्रम्प यांना भारत भेटीचा फायदा होईल?

ट्रम्प यांना भारत भेटीचा फायदा होईल?

Next

विजय दर्डा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना खरे तर गेल्याच वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून भारतात आणायचे होते. परंतु अन्य कामांच्या व्यस्ततेमुळे ट्रम्प त्या वेळी येऊ शकले नव्हते. त्यानंतर मोदी पुन्हा एकदा अमेरिकेत गेले व तेव्हा तेथे ‘हाऊडी मोदी’ हा बहुचर्चित कार्यक्रम झाला. स्टेडियम भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिकांनी खचाखच भरलेले होते. त्या वेळी ट्रम्प यांना$ सोबत घेऊन मोदी यांनी हात उंचावून ज्याप्रकारे स्टेडियमचा फेरफटका मारला ते पाहिल्यावर असे वाटले जणू मोदी ट्रम्प यांना त्यांच्या निवडणुकीसाठीच ‘लॉन्च’ करत असावेत! आता होत असलेली ट्रम्प यांची भारत भेटही त्याच संदर्भात पाहिली जात आहे. २४ व २५ फेब्रुवारी असे दोन दिवस ट्रम्प सहपत्नीक भारत भेटीवर येत आहेत. त्यांच्यासोबत फर्स्ट लेडी मेलानीया या असतील. ट्रम्प यांच्या सन्मानार्थ २४ फेब्रुवारीला अहमदाबादमध्ये ‘केम छो ट्रम्प’ हा ‘हाऊडी मोदी’च्या धर्तीवर कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम तेथील पुनर्बांधणी केलेल्या मोटेरा स्टेडियममध्ये व्हायचा आहे. त्यामुळे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना त्यांच्या निवडणुकीत या भारत भेटीचा काही फायदा होईल का, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.

या प्रश्नाचे उत्तर ३ नोव्हेंबर २०२० रोजी मिळू शकेल. त्या दिवशी अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक व्हायची आहे. सलग दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून येणे हे मोठे आव्हान असल्याने ट्रम्प मतदारांना आकर्षित करण्याचे हरतºहेने प्रयत्न करत आहेत. अमेरिकेत मूळ भारतीय वंशाचे सुमारे ६० लाख नागरिक आहेत. त्यापैकी सुमारे ५० लाख मतदार आहेत. सरासरी ७० टक्के भारतीय वंशाचे मतदार मतदान करतात असा अनुभव आहे. म्हणजे ३५ लाख भारतीय वंशांच्या मतदारांना आपल्याकडे वळविण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न आहे. अमेरिकेच्या राजकारणात भारतीयांची भागीदारी ३ टक्क्यांहून अधिक आहे. हे भारतीय तेथील राजकारणात सक्रियतेने बजावत असलेली महत्त्वाची भूमिका जगजाहीर आहे! ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या मतदारांची खुशामत करण्याचे आणखीही एक कारण आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षातर्फे तुलसी गॅबार्ड उमेदवार असण्याची शक्यता आहे. तुलसी यांनी बºयाच वर्षांपूर्वी हिंदू धर्म स्वीकारला असून त्या भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिकांमध्ये बºयाच लोकप्रिय आहेत. प्रतिनिधी सभा व सिनेटवर निवडून आल्या तेव्हा तुलसी यांनी भगवद्गीतेवर हात ठेवून सदस्यत्वाची शपथ घेतली होती. तुलसी या भारताच्या कट्टर समर्थक आहेत. त्या अमेरिकी वंशाच्या असल्या तरी अनेक जण त्यांना भारतीय वंशाच्याच मानतात. या भारत भेटीनिमित्ताने अमेरिकेतील भारतीय वंशांच्या मतदारांना तुलसी गॅबार्ड यांच्यापासून दूर करून आपल्या बाजूने करणे असा ट्रम्प यांचा प्रयत्न आहे. अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीयांत तेलंगणा व आंध्र प्रदेशखालोखाल गुजरातींची संख्या सर्वाधिक आहे. त्यानंतर पंजाब व केरळचा क्रमांक लागतो. परंतु प्रभाव व सुबत्तेच्या दृष्टीने गुजराती वरचढ आहेत. अमेरिकेतील हॉटेल व मॉटेल उद्योगात ४० टक्के हिस्सा गुजरातींचा आहे. त्यामुळे ट्रम्प आपले उद्दिष्ट साध्य करण्यात कितपत यशस्वी होतात, हे पाहणे रोचक ठरेल. आताच्या भेटीत ट्रम्प तेलंगणा व आंध्र प्रदेशला जाणार नसले तरी त्यांची कन्या इवांका यांनी नोव्हेंबर २०१७ मध्ये हैदराबादला भेट दिलेली आहे.

 

ट्रम्प यांच्या या दौºयाचे इतरही कारणांनी महत्त्व कमी नाही. भारताला भेट देणारे ट्रम्प हे सातवे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष असतील. याआधी आयझेनहॉवर, रिचर्ड निक्सन, जिमी कार्टर, बिल क्लिंटन, जॉर्ज बुश व बराक ओबामा यांनी भारताचा दौरा केला होता. जिमी कार्टर यांचा अपवाद वगळला तर इतर पाच अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी भारतासोबतच पाकिस्तानलाही लगोलग भेट दिली होती. सध्या तरी या दौºयाला जोडून पाकिस्तानला जाण्याचा ट्रम्प यांचा कार्यक्रम नाही. त्यांनी पाकिस्तानला न जाणे हा भारताचा मोठा विजय असेल. अमेरिकेशी मैत्री किती घनिष्ट आहे याच्या प्रचारासाठी भारत याचा उपयोग करून घेऊ शकेल. एकूणच दक्षिण आशियाई राजकारणाच्या दृष्टीने ट्रम्प यांची ही भारत भेट महत्त्वाची असेल. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्रम्प यांच्याकडे काश्मीरचा विषय काढला आहे. या समस्येत मध्यस्थी करण्याची तयारीही ट्रम्प यांनी दाखविली होती. या भेटीत ते काश्मीरबाबत अमेरिका ठामपणे बाजूने असल्याची खात्री भारताला देण्याचीही शक्यता आहे. भारत व इराण यांची मैत्री जुनी व घनिष्ट आहे याची ट्रम्प यांना पूर्ण कल्पना आहे. अमेरिकेला भारताची गरज असल्याने भारताची अडचण होईल, असे ट्रम्प काही करतील, असे अपेक्षित नाही. एक तर भारताला सोबत घेतल्याखेरीज अमेरिकेला चीनशी दोन हात करणे शक्य नाही. अफगाणिस्तानातही भारताची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे ट्रम्प जाणून आहेत. त्यामुळे पुन्हा राष्ट्राध्यक्ष झाल्यास ट्रम्प यांना भारताची खूप गरज लागणार आहे, हे उघड आहे. म्हणूनच ते भारतात येत आहेत. २४ फेब्रुवारीला भारत ट्रम्प यांना ‘केम छो ट्रम्प’, असे विचारणार आहे. पाहू या ट्रम्प काय उत्तर देतात!

(लेखक लोकमत समुहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन आहेत)

Web Title: Will Donald Trump benefit from India visit?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.