अंचॅन प्रीलर्टला एवढी शिक्षा का?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2021 03:36 AM2021-02-03T03:36:58+5:302021-02-03T03:37:24+5:30

Anchan Prelart News : अंचॅन प्रीलर्ट ही ६३ वर्षांची थाई महिला. माजी सनदी नोकर. तिला थायलंडमधील न्यायालयाने ४३ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा दिली आहे. तिचा गुन्हा काय? तर तिने २०१४ मधे थायलंडमधील राजेशाहीवर टीका करणारे एक पॉडकॉस्ट यूट्यूब आणि फेसबुक  या  समाजमाध्यमांवर शेअर केले होते

Why such a punishment for Anchan Prelart? | अंचॅन प्रीलर्टला एवढी शिक्षा का?

अंचॅन प्रीलर्टला एवढी शिक्षा का?

Next

अंचॅन प्रीलर्ट ही ६३ वर्षांची थाई महिला. माजी सनदी नोकर. तिला थायलंडमधील न्यायालयाने ४३ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा दिली आहे. तिचा गुन्हा काय? तर तिने २०१४ मधे थायलंडमधील राजेशाहीवर टीका करणारे एक पॉडकॉस्ट यूट्यूब आणि फेसबुक  या  समाजमाध्यमांवर शेअर केले होते;  पण थायलंडच्या राजेशाही चौकटीत तिची ही कृती म्हणजे भयंकर अपराध ठरला.  थायलंडमधील ‘लेस मॅजेस्टी’ या कडक कायद्याखाली अंचॅनवर गुन्हा दाखल करून तिला प्रदीर्घ काळच्या तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली. अंचॅनवर राजेशाहीविरुद्ध  नियम उल्लंघनाचे स्वतंत्र  २९ गुन्हे दाखल करण्यात आले. लेस मॅजेस्टी कायद्यानुसार प्रत्येक नियम उल्लंघनासाठी ३ ते १५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा देण्याची तरतूद आहे.  २९ स्वतंत्र गुन्ह्यानुसार अंचॅनला आधी न्यायालयाने ८७ वर्षांची शिक्षा ठोठावली होती; पण तिने आपला गुन्हा मान्य करून तशी  याचिका न्यायालयासमोर सादर केल्याने न्यायालयाने शिक्षा निम्म्याने कमी करीत तिचा तुरुंगवास ४३ वर्षांवर आणला.

सन २०१४ मधे थायलंडमधील लष्करी गटाने (मिल्ट्री जुंटा) तेथील सरकार उलथवून टाकले. तेव्हा १४ जणांच्या एका गटाने राजेशाहीवर टीका करणारे एक पॉडकास्ट  व्हायरल केले. या पॉडकास्टमधे राजेशाहीवर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्यात अंचॅन या महिलेचा समावेश होता.  या पॉडकास्टचा आशय लिहिणाऱ्या लेखकास मात्र फक्त  दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली आहे. 

 सन २०१५ मधे सुरक्षा अधिकाऱ्यांनी अंचॅनच्या घरावर छापा टाकला आणि तिला ताब्यात घेतले. खटला बंद दाराआड चालवला गेला. प्रतिवाद्यांनी सादर केलेले पुरावेही देशाच्या सुरक्षेचे कारण देऊन गुप्त ठेवण्यात आले.  अंचॅनचा खटला आधी लष्करी न्यायालयात सुरू होता; पण २०१९ मध्ये पुन्हा नागरी सत्ता आल्यावर हा खटला दिवाणी न्यायालयासमोर चालविला गेला.

थायलंडमध्ये सध्या नागरी सत्ता असली तरी प्रयुथ चॅन ओछा जे सध्या पंतप्रधान आहेत. ते २०१४ मध्ये  बंडखोर लष्करी गटाचे प्रमुख होते. हा येथील निवडून आलेल्या सरकारमधला सगळ्यांत मोठा विरोधाभास ! त्याचाच परिणाम म्हणजे लष्करी बंडाविरुद्ध  बोलणाऱ्या १६९ लोकांविरुद्ध ‘लेस मॅजेस्टी’ कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले गेले. थायलंडमधील मानवी हक्क कार्यकर्त्यांनी,   ‘ॲम्नेस्टी इंटरनॅशनल’  या  संस्थेनेही अंचॅनला झालेल्या शिक्षेवर  कडाडून टीका केली आहे. 

सन २०१४ मधील एका गुन्ह्याचा खटला एवढा प्रदीर्घ काळ चालणं, त्याची शिक्षा  २०२१ मध्ये सुनावली जाणे आणि तीही एवढ्या प्रदीर्घ तुरुंगवासाची,  या गोष्टीला थायलंडच्या अस्वस्थ राजकारणाच्या चौकटीत एक विशिष्ट अर्थ आहे.   ‘येथील राजेशाहीविरुद्ध एक शब्दही बोलाल तर याद राखा,’ असा छुपा संदेश थायलंडमधील असंतुष्ट जनता आणि  आंदोलक यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठीची ही प्रतीकात्मक  कृती आहे. सध्या सरकारविरुद्धच्या असंतोषावर अंकुश ठेवण्यासाठी ‘लेस मॅजेस्टी’ हा कायदा थायलंडमध्ये  बेफामपणे वापरला जात आहे. गेल्या वर्षी  थायलंडमधील विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते.  त्यांनी राजा वज्रलॉंगकोर्न यांची संपत्ती, त्यांची राजकीय भूमिका  आणि त्यांच्या वैयक्तिक  आयुष्याबद्दल निडरपणे प्रश्न उपस्थित केले. आजपर्यंत थायलंडच्या इतिहासात हे कधीच झालं नव्हतं. हे हाताबाहेर चाललेलं आंदोलन रोखण्यासाठी येथील पोलिसांनी (अर्थात राजाच्या संमतीमुळे) लेस मॅजेस्टी या कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली.
 
अस्वस्थता, आंदोलनं ही थायलंडमधील समाजकारणाची  प्रमुख वैशिष्ट्यं आहेत.  मागील वर्षी लोकशाहीसमर्थक विरोधी पक्षाचं विसर्जन करण्याचा आदेश न्यायालयामार्फत सरकारने आणला आणि थायलंडमधील तरुण डोकी पेटली.  राजा वज्रलॉंगकॉर्ननी  ‘मुकुट संपत्ती’ (क्राउन वेल्थ)  जी मागील वर्षापर्यंत येथील सामान्य जनतेच्या कल्याणासाठी होती, ती राजाने वैयक्तिक संपत्ती म्हणून जाहीर केली. त्याद्वारे राजा थायलंडमधील सर्वांत श्रीमंत व्यक्ती ठरला.  राजाच्या या निर्णयाला  आंदोलकांनी आव्हान दिलं. तसेच बॅंकॉकमधील लष्करी तुकड्या राजाच्या आदेशाने का वागतात? लष्करी सूत्रं ही राजेशाहीच्या हातात का एकवटली आहेत? - असे  राजेशाहीच्या मर्मावर  बोट ठेवणारे प्रश्न उपस्थित केले गेले. यातून अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांनी  आंदोलन काबूत आणण्यासाठी ‘लेस मॅजेस्टी’चे शस्त्र पुन्हा उगारले आहे; पण आंदोलकांनी आम्ही राजाला, सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्यास घाबरणार नाही, हे जाहीर करुन टाकले आहे. ही अस्वस्थता काबूत कशी करायची हा थायलंडला सतावणारा प्रश्न आहे!
- आणि अंचॅनला एवढी शिक्षा का? या जगाला पडलेल्या  प्रश्नाचं हेच उत्तर!

कठोर शासनाची परंपरा
थायलंडच्या घटनेच्या कलम ११२ अंतर्गत थायलंडमधील राजेशाहीला संरक्षण देण्यात आलं आहे. हे कलम म्हणजेच ‘लेस मॅजेस्टी’ या नावानं ओळखला जाणारा कायदा. 
या कलमानुसार थायलंडचा राजा, राणी, राजघराणे यांचा अवमान, निंदा करणारी कोणतीही कृती हा गंभीर गुन्हा असून, त्या कृतीसाठी ३ ते १५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

Web Title: Why such a punishment for Anchan Prelart?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.