गुगलचे जन्मदाते ब्रिन व पेज का झाले निवृत्त ?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2019 09:20 PM2019-12-05T21:20:33+5:302019-12-05T21:50:59+5:30

गुगलच्या जन्मदात्यांनी अल्फाबेट कंपनीच्या कार्यकारी पदावरुन निवृत्त हाेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या निवृत्तीच्या निर्णयातून गुगलची कार्यसंस्कृतीची ओळख पटते. आपले सामर्थ्य कशात आहे हे जाणणारे असा धाडसी निर्णय घेऊ शकतात.

why googl's founder brin and page are retired ? | गुगलचे जन्मदाते ब्रिन व पेज का झाले निवृत्त ?

गुगलचे जन्मदाते ब्रिन व पेज का झाले निवृत्त ?

googlenewsNext

- प्रशांत दीक्षित 
अल्फाबेट कंपनीच्या कार्यकारी पदावरून पायउतार होण्याचा निर्णय गुगलचे जन्मदाते सर्जी ब्रिन व लॅरी पेज यांनी घेतला आहे. ही जबाबदारी आता भारतीय वंशाचे सुंदर पिचाई यांच्याकडे आली आहे. पिचाई यांची बढती हा भारतासाठी अभिमानाचा विषय आहे. या घडामोडीतून गुगलमधील किंवा अमेरिकेतील कार्यसंस्कृतीची जी झलक मिळते, ती अधिक महत्त्वाची आहे.

ब्रिन व पेज यांचे वय हे निवृत्त होण्याचे नाही. ते दोघेही अवघे ४६ वर्षांचे आहेत. पिचाई त्यांच्यापेक्षा एका वर्षाने मोठे आहेत. अत्यंत यशस्वी धंद्याची जबाबदारी चाळिशीत अन्य व्यक्तीकडे सोपविण्याचे धाडस ब्रिन व पेज करू शकतात, हा अमेरिकेच्या कार्यसंस्कृतीचा विशेष आहे. कितीही यश मिळाले तरी त्या यशाला लोंबकळत राहायचे नाही, त्या यशावर गुजारा करीत राहायचे नाही, हे अमेरिकेत होऊ शकते. सत्ता सोडण्यास सहसा कोणी तयार नसते. पैशाची सत्ता तर लोभविणारी असते. आपण निर्माण केलेल्या कंपनीतील बारीकसारीक घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून जागोजागी हस्तक्षेप करणारे उद्योजक अन्य देशांत भरपूर आहेत. भारतात तर बहुसंख्य आहेत.

ब्रिन व पेज यांना आता पैशाची ददाद नाही. अल्फाबेटची जबाबदारी पिचाई यांच्याकडे सोपविल्यामुळे त्यांचे कंपनीवरील नियंत्रण हटलेले नाही. ते कधीही हस्तक्षेप करू शकतात; पण तसे करणार नाहीत. उलट, पिचाई यांना ते पूर्ण स्वातंत्र्य देतील. इथे प्रश्न पैशाचा नाही, तर नव्या नेतृत्वाला पूर्ण स्वातंत्र्य देण्याचा आहे. यात धोका असला तरी तो स्वीकारण्याची तयारी आहे. धाडस हे अमेरिकी संस्कृतीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

आता हाती आलेला मोकळा वेळ ब्रिन व पेज कसा घालविणार, ही यातील अधिक महत्त्वाची गोष्ट आहे. रोजच्या धकाधकीत स्वत:ला मोकळे करून घेण्यास या दोघांनी गेल्या वर्षापासूनच सुरुवात केली होती. कंपनी चालविण्याची रोजची जबाबदारी महत्त्वाची असली तरी आपले सामर्थ्य त्यामध्ये नाही, तर नवीन उत्पादने निर्माण करण्यात आहे, याची पक्की जाणीव त्यांना आहे. त्यांना सर्जनशीलता जपायची आहे. कंपनीवर नियंत्रण ठेवण्याच्या लोभापायी ती गमवायची नाही.  आपल्या कामाचा फोकस सर्जनशीलतेवर ठेवायचा आहे. रोजची कार्यालयीन उलाढाल करण्यास पिचाई समर्थ आहेत. 

ब्रिन व पेज सध्या काय करीत आहेत, याची रंजक माहिती ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने दिली आहे. ब्रिन सध्या अशा प्रोजेक्टवर काम करीत आहेत, ज्यामध्ये अपयशच येण्याची जवळपास खात्री आहे. मात्र, हे प्रकल्प यशस्वी झाले तर जगाचा चेहरामोहरा बदलण्याची ताकद त्यामध्ये असेल. अनेक कल्पक अभियंत्यांसोबत ते काम करीत आहेत. पेज याने तंत्रज्ञानातील नव्या आव्हानांवर आणि त्यातून निर्माण होऊ शकणाऱ्या उत्पादनांवर लक्ष केंद्रित केले आहे. ‘उडणारी मोटर’ हे त्यातील एक उदाहरण. असेच अन्यही काही प्रकल्प आहेत. अपयश येण्याची खात्री असूनही त्या प्रकल्पावर काम करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती. पेज व ब्रिन यांचे हे सामर्थ्य आहे. कंपनीच्या फायनान्स, सेल्स, ह्युमन रिसोर्स अशा विभागांतील अनेक तांत्रिक समस्यांची सोडवणूक करण्यात त्यांना हे सामर्थ्य फुकट घालवायचे नाही. कल्पकता, नावीन्य आणि त्यासाठी अफाट मेहनत करण्याची बौद्धिक शक्ती हे त्यांचे सामर्थ्य आहे. यातूनच त्यांनी गुगलची अर्थशक्ती निर्माण केली आहे. गुगलला स्थिरस्थावर करीत २१ वर्षे त्यांनी तो गाडा हाकला. आता गुगल वयात आली आहे व तिला स्वतंत्र करण्याची वेळ आल्याचे ते म्हणतात. 

अमेरिकी उद्योगक्षेत्राचे सामर्थ्य अशा कार्यसंस्कृतीमध्ये आहे. प्रचंड पैसा असल्यामुळे ते अनेक प्रयोग करू शकतात, असे म्हणणे चुकीचे ठरेल. अमेरिका ही कल्पक व धाडसी असल्यामुळे तेथे पैसा आला, हे येथे विसरले जाते. नव्या बुद्धिमत्तेला तेथे वाव दिला जातो. जात, धर्म, पंथ, राष्ट्रीयत्व यांचा विचार केला जात नाही. कल्पक विचार वा प्रयोग करण्यावर फोकस असतो. आपल्याच यशात गुंतून राहून यशाचे गोडवे गाण्यात तेथील उच्च स्थानावरील उद्योगपती समाधान मानीत नाहीत. यश गाठीला बांधून ते स्वत:हून नवीन आव्हाने शोधतात, कल्पक तरुणांच्या प्रकल्पांना चांगली आर्थिक मदत करतात किंवा समाजात बुद्धिमत्ता वाढीस लागावी म्हणून विश्वविद्यालयांना वा प्रयोगशाळांना भरघोस दान देतात. याउलट आपली कार्यसंस्कृती आहे. तीमध्ये कल्पकतेला आर्थिक आधार नाही. कौशल्यापेक्षा जात-धर्म-पंथ यांना महत्त्व आहे. वृद्धापकाळातही नेतृत्व राखण्याची आस आहे. जनतेलाही त्याचे कौतुक आहे.  लोकशाहीच्या मार्गाने महासत्ता होण्यासाठी ब्रिन व पेज यांची कार्यसंस्कृती जपणे आवश्यक असते.

Web Title: why googl's founder brin and page are retired ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.