श्रीमंतीची स्वप्नं पाहणारे शेकडो बांगलादेशी तरुण बोस्नियाच्या जंगलात का गारठले?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2020 08:18 AM2020-10-22T08:18:26+5:302020-10-22T08:18:50+5:30

एरव्ही बांगलादेशातून विदेशात काम करायला जाणारा वर्ग मोठा, कारण त्यांची लोकसंख्या अधिक. तरुणांची संख्या त्यात सर्वाधिक. मात्र आपल्या स्वप्नांच्या मागे धावणाऱ्या तारुण्याच्या वाटेला किती खडतर दिवस येऊ शकतात, याचं भयंकर चित्र दाखवणारा एक अहवाल डॉयचे वेले बांगला या जर्मन मीडिया पोर्टलने प्रसिद्ध केला आहे.

Why are hundreds of young Bangladeshis dreaming of riches trapped in the jungles of Bosnia? | श्रीमंतीची स्वप्नं पाहणारे शेकडो बांगलादेशी तरुण बोस्नियाच्या जंगलात का गारठले?

श्रीमंतीची स्वप्नं पाहणारे शेकडो बांगलादेशी तरुण बोस्नियाच्या जंगलात का गारठले?

Next

बांगलादेशात दरडोई उत्पादन वाढलं आहे, आर्थिक विकास दर भारतापेक्षा सरस आहे, अशा बातम्या गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झाल्या. मात्र ज्या देशात तरुण लोकसंख्या अधिक, त्यांची स्वप्न जास्त अशा ‘अ‍ॅस्पिरेशनल’ वर्गाला अधिकाधिक संधी निर्माण करून देणं, त्यांच्या महत्त्वाकांक्षांना पूरक-पोषक वातावरण निर्माण करणं हे विकसनशील देशात सोपं नसतंच. त्याचा अनुभव बांगलादेशही सध्या घेत आहे.

एरव्ही बांगलादेशातून विदेशात काम करायला जाणारा वर्ग मोठा, कारण त्यांची लोकसंख्या अधिक. तरुणांची संख्या त्यात सर्वाधिक. मात्र आपल्या स्वप्नांच्या मागे धावणाऱ्या तारुण्याच्या वाटेला किती खडतर दिवस येऊ शकतात, याचं भयंकर चित्र दाखवणारा एक अहवाल डॉयचे वेले बांगला या जर्मन मीडिया पोर्टलने प्रसिद्ध केला आहे. हा अहवाल म्हणतो की, शेकडो बांगलादेशी तरुण क्रोएशियाच्या सीमेलगत जंगलात प्रचंड थंडीत अडकून पडलेले आहेत. त्यांच्याकडे ना अन्न आणि ना औषधं, ना निवारा. युरोपात जायचं म्हणून ते बांगलादेशातून निघून मध्य पूर्व देशांतून प्रवास करत बोस्नियापर्यंत पोहोचले आहेत. अर्थातच बेकायदा प्रवास. त्यासाठी एका माणसाने सुमारे १८ ते २० लाख बांगलादेशी टका मोजले आहेत. वेगवेगळ्या देशांत या माणसांना वेगवेगळ्या मध्यस्थांना पैसे द्यावे लागले आहेत, असंही हा अहवाल सांगतो आहे.

काहीजण दोन वर्षांपूर्वी, तर काहीजण त्याहून कमी-अधिक काळ प्रवास करून बोस्नियाच्या जंगलात पोहोचले आहेत. मात्र तिथून क्रोएशियात प्रवेश करत पुढे इटली, स्पेनसह युरोपात जाण्याचं त्यांना साधलं नाही. या सर्व बांगलादेशींनी घर सोडलं ते युरोपिअन वे आॅफ लाइफचा अनुभव घेत, श्रीमंत होण्यासाठी, सुस्थितीत जगण्याची स्वप्न पाहण्यासाठी. मात्र काही लाख मध्यस्थांना देत, रात्रीबेरात्री खडतर प्रवास करून ते फक्त बोस्नियाच्या जंगलात पोहाचू शकले.

आता परिस्थिती अशी आहे की, या जंगलात जेमतेम प्लॅस्टिकच्या कामचलाऊ तंबूत ते राहतात. खायला अन्नपाणी नाही, ना औषधं आहेत. आंतरराष्टÑीय संस्था अशा व्यक्तींना मानवी मदत म्हणून जेवण-औषधं देतात त्या थोडीफार मदत करत आहेत. मात्र माणसं शेकडो असल्याने ती पुरेशी नाही, असंही हा अहवाल सांगतो. इंटरनॅशनल आॅर्गनायझेशन फॉर मायग्रेशन या भागात काही रेफ्यूजी कॅम्प चालवते; पण तिथे आता रहायला जागा उरलेली नाही. म्हणून काही बांगलादेशी तरुणांनी वेलिका क्लाडूसाच्या जंगलात, बंद पडलेल्या फॅक्टऱ्यांमध्ये आश्रय घेतला आहे. या भागात घनदाट जंगल आहे. त्यात सध्या थंडीचा कडाका आहे आणि पाऊसही सुरूआहे. त्यामुळे डोक्यावर धड छत, निवारा, अन्न मिळणं दुरापास्त होत आहे, असं सांगून हा अहवाल नमूद करतो की, आम्ही या बांगलादेशी तरुणांना विचारलं की, हे असं का राहता, तुम्हाला सुरक्षित घरी पाठवलं, तर मायदेशी परताल का? त्यावर बहुसंख्य तरुणांनी सांगितलं की, युरोपात जायचं हे स्वप्न घेऊन आम्ही इथवर आलो. आम्हाला इटली किंवा स्पेनमध्ये जाऊन, कष्ट करून श्रीमंत व्हायचं आहे. ते स्वप्न असं अर्ध्यावर सोडून देता येणार नाही. यात फक्त बांगलादेशीच नाही तर यात काही पाकिस्तानी आणि मोरोक्कन तरुण आहेत. नदीतून बेकायदा वाहतूक करत अनेकांना बोस्नियाच्या जंगलात असं उतरवलं जातं. तिथं नदीत काहीजण वाहून गेल्याच्याही घटना घडतात. बॉर्डरवर अडकून पडलेल्या या तरुणांची संख्या मोठी आहे. ते आता युरोपिअन युनियनला आवाहन करत आहेत की, आम्हाला स्वीकारा. त्यातही काहीजण आपला उत्साह टिकून रहावा म्हणून ‘सी यू सून इटली’चे नारे लावत आहेत. युरोपिअन युनियन स्थलांतरितांना स्वीकारेल का, हा प्रश्न आहेच. मात्र सध्या तरी शेकडो तरुण भर थंडीत, भर पावसात, बिना अन्नपाणी कसेबसे तग धरून आहेत.

देशातील तारुण्याच्या महत्त्वाकांक्षांना पोषक वातावरण आणि पुरेशा संधी उपलब्ध झाल्या नाहीत तर काय होतं, होऊ शकतं याचं हे एक चित्र आहे.
 

Web Title: Why are hundreds of young Bangladeshis dreaming of riches trapped in the jungles of Bosnia?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.