गोव्यात ८० टक्के कामगार बाहेरचे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 06:47 PM2020-01-29T18:47:17+5:302020-01-29T18:48:13+5:30

गोव्यातले लोक श्रमाची कामे करायला तयार नसतात. त्यामुळे बाहेरचे लोक राज्यात येऊ लागले आहेत.

Why 80 % of workers in Goa are outside? | गोव्यात ८० टक्के कामगार बाहेरचे का?

गोव्यात ८० टक्के कामगार बाहेरचे का?

Next

- राजू नायक
गोव्यातले लोक श्रमाची कामे करायला तयार नसतात. त्यामुळे बाहेरचे लोक राज्यात येऊ लागले आहेत. येथील उद्योगांमध्ये ८० टक्के बाहेरचे लोक आहेत, असे विधान मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांनी केले आहे. काही लोकांना या विधानामुळे राग येऊ शकतो; परंतु त्यात तथ्य आहे. गोव्यात श्रमाची कामे करणारे लोक नाहीत असे नाही. परंतु त्यांना राज्यापेक्षा बाहेर जाऊन, विशेषत: आखातात जाऊन काम करायला आवडते. गेल्या अनेक वर्षाच्या ‘सुशेगाद’ जीवनशैलीमुळे येथील माणूस काहीसा आरामदायी जीवन अनुभवतो. तो सुखासीन आहे. अल्पसंतुष्टही आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर नवीन रोजगार निर्माण होतो; तो कष्टाचा असेल तर त्याला त्यामध्ये स्वारस्य नसते. त्यामुळे आखातानंतर जेव्हा युरोपमध्ये रोजगाराच्या, उत्तम जीवनाच्या संधी तयार झाल्या; तेव्हा पोर्तुगीज नागरिकत्व घेऊन युरोपात स्थायिक होणे त्याने पसंत केले.

दुस-या बाजूला गोवेकर बाहेर जाऊ लागले, हलका रोजगार येथे उपलब्ध होऊ लागला, तसे बाहेरचे मजूर येथे येऊ लागले; त्यामुळे राज्यात सामाजिक अस्वस्थता निर्माण झाली. ख्रिश्चनांची बहुसंख्य वस्ती आहे, तेथे बाहेरचे आल्याने सांस्कृतिक प्रश्न निर्माण झाले. सध्या गोव्यात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात ख्रिस्ती चर्च पुढाकार घेऊन निदर्शने आयोजित करते. परकीय लोकांविरोधात गोव्यात जी पूर्वीपासून नाराजीची भावना आहे, ती या कायद्याला विरोध करतानाही दिसते. बाहेरचे लोक येथे आलेले तुम्हाला नकोत, मग येथे ज्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत, त्यांचा लाभ कोणीतरी घेणारच आहेत.


हलक्या रोजगाराचे सोडून द्या, परंतु येथे नवीन उद्योग स्थापन करायलाही स्थानिकांना स्वारस्य नाही. त्यामुळे सध्या तयार कपडे, काजू, हार्डवेअर, प्लायवूड, टिंबर, इलेक्ट्रिकल, सिरामिक, स्टेशनरी, स्विटमार्ट व फार्मसी या व्यवसायांतही बाहेरचे लोक येऊ लागले आहेत. या लोकांनी शहरांमधील दुकाने मोठय़ा प्रमाणात भाडय़ाने किंवा विकत घेतली आहेत. स्थानिक लोक ऐषआरामासाठी आपली दुकाने भाडय़ाने देऊन स्वत: रिकामे बसून राहतात. त्यामुळे रोजगारापाठोपाठ उद्योगधंदेही बाहेरचे ताब्यात घेऊ लागले असून एका बाजूला क्रयशक्तीचा अपव्यय व दुस-या बाजूला अर्थकारणही परकीयांच्या हातात, अशी दयनीय स्थिती स्थानिकांची होऊ लागली आहे.

परकियांच्या विरोधात संघर्ष करणो सोपे; परंतु त्याला पर्याय उभा करणे व स्थानिकांमध्ये ‘धनीपणाची’ भावना जागविणे या गोष्टी ना चर्चसंस्था विचारात घेते, ना चळवळ करणारे घटक विचारात घेतात. हल्लीच ‘क्रांतिकारी गोवेकर’ या नावाने स्थापन झालेल्या एका युवक संघटनेने फुले विकणा-या बिगर गोमंतकीय फेरीवाल्यांविरोधात मोहीम चालविली होती. परंतु हा व्यवसाय स्थानिक करू इच्छित नाहीत, म्हणून बाहेरचे येऊन करू लागले आहेत. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे मासळी विकण्याचा व्यवसायही सध्या अर्धाअधिक बाहेरच्यांच्या ताब्यात गेला आहे. मच्छीमार पडावांवर काम करायला तर सारा मजूर ओडिशा, झारखंडमधूनच येतो! चिमुकल्या गोव्यात जेथे प्रादेशिक तत्त्व व अस्मितेला अजूनपर्यंत खूपच महत्त्व दिले गेले, ते सुशेगाद वृत्तीमुळे गोवाच दुस-यांच्या हातात देऊ लागले आहे. बाहेरचे घटक येऊ नयेत म्हणून सध्या शेजारील महाराष्ट्र व कर्नाटकातील भाग -जो कोंकणी बोलतो- गोव्यात विलीन करावेत असाही विचार व्यक्त होऊ लागला आहे!

 

Web Title: Why 80 % of workers in Goa are outside?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा