कुठून कुठे विसावला तो पँथरचा विद्रोह?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 04:01 AM2020-07-09T04:01:42+5:302020-07-09T04:02:47+5:30

‘शेळी होऊन अनेक वर्षे जगण्यापेक्षा वाघ म्हणून एक दिवस जगा’ हा बाबासाहेबांचा संदेश होता. परिणामी, दलित तरुणांत असंतोष धुमसू लागला. त्याच असंतोषाचे दुसरे नाव आहे ९ जुलै १९७२ रोजी जन्माला आलेली दलित पँथरची चळवळ. दलित पँथरने राज्यात चांगलाच दरारा निर्माण केला होता.

Where did the Panther Rebellion stop from? | कुठून कुठे विसावला तो पँथरचा विद्रोह?

कुठून कुठे विसावला तो पँथरचा विद्रोह?

Next

- बी. व्ही. जोंधळे
(पुरोगामी चळवळीचे अभ्यासक)

१९७० ते ८० च्या दशकात महाराष्ट्रात दलित समाजावरील अत्याचार वाढले होते. पुणे जिल्ह्यातील बावडा येथील मातंग उमेदवाराने जिल्हा परिषद निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरल्यामुळे सवर्णांनी तालुक्यातील दलित समाजावर बहिष्कार टाकला होता. अकोला जिल्ह्यातील गवई बंधूंचे डोळे काढले होते. परभणी जिल्ह्यातील ब्राह्मणगावात दोन दलित महिलांची नग्न धिंड काढली होती. या घटनांमुळे दलित तरुण संतप्त होत होता. याच काळात १० एप्रिल १९७० रोजी एलिया पेरुमल समितीचा अहवाल प्रसिद्ध झाला. त्यात म्हटले होते, दलित अत्याचाराच्या एकूण प्रकरणात १ टक्का गुन्ह्याचीसुद्धा नोंद होत नाही. अहवाल प्रसिद्ध झाल्यावर २४ मे १९७२ रोजी मधू लिमये यांनी लोकसभेत दलित अत्याचारविरोधी आवाज उठविला.

महाराष्ट्रात दलित समाजावर अत्याचार वाढत असतानाच दुसरीकडे प्रस्थापित साहित्याविरुद्ध बंडखोरीचा स्वर ‘लिटल मॅगझिन’च्या माध्यमातून उमटू लागला होता. ‘सत्यकथेत’ल्या साहित्याविरुद्ध दलित लेखक काहूर माजवू लागले होते. राजा ढाले, नामदेव ढसाळ हे या मॅगझिनमधून उमेदवारी करीत होते. याच काळात डॉ. म. ना. वानखेडे हे अमेरिकेतून ब्लॅक लिटरेचरची पीएच.डी. घेऊन भारतात परतले होते. त्यांनी ब्लॅक लिटरेचर, ब्लॅक पॉवर, ब्लॅक पँथरच्या चळवळीचा अभ्यास केला होता. अमेरिकेतील अश्वेतांनी आपल्या अनुभवांशी प्रामाणिक राहून जसे लेखन केले, तसे लेखन दलित लेखकांनी करावे, हा विचार प्रभावी ठरू लागला होता. परिणामी, दलित लेखक नव्या धाटणीचे साहित्य लिहू लागले. ‘स्वातंत्र्य हे कुठल्या गाढवीचं नाव?’ असा सवाल नामदेव ढसाळांनी कवितेतून विचारला होता, तर १५ आॅगस्ट १९७२ मधील ‘साधना’ साप्ताहिकातील राजा ढाले यांचा ‘काळा स्वातंत्र्य दिन’ हा लेख राज्यभर वादळ माजवून गेला. १९६३ मध्ये आलेल्या बाबूराव बागुलांच्या ‘जेव्हा मी जात चोरली होती’ पुस्तकाने काहूर माजून दलित साहित्य चर्चेस तोंड फुटले.

दलित समाजावरील अत्याचार व दलित साहित्यातून व्यक्त होणाऱ्या विद्रोहाने दलित तरुण संतप्त न होता तरच नवल! अन्यायाचे साम्राज्य असते तेव्हा बंड ही न्यायाची सुरुवात असते, असे प्रख्यात तत्त्ववेत्ता कार्लाईल म्हणाला होता, तर ‘शेळी होऊन अनेक वर्षे जगण्यापेक्षा वाघ म्हणून एक दिवस जगा’ हा बाबासाहेबांचा संदेश होता. परिणामी, दलित तरुणांत असंतोष धुमसू लागला. त्याच असंतोषाचे दुसरे नाव आहे ९ जुलै १९७२ रोजी जन्माला आलेली दलित पँथरची चळवळ. दलित पँथरने राज्यात चांगलाच दरारा निर्माण केला होता. हजारो तरुण पँथरच्या भोवती जमा झाले होते. दलितांचा मुक्तिलढा सर्व प्रकारची क्रांती इच्छितो. आमचे लक्ष्य व्यक्ती नसून, व्यवस्था आहे. ती बदलून आम्हाला राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक क्षेत्रांत वरिष्ठ स्थान हवे आहे, या भूमिकेने तरुण भारावून गेले होते. वरळीची दंगल, गीतादहन, पँथर्सची बेदरकार भाषणे, त्यांच्या लाखा-लाखाच्या सभा यामुळे पँथर चांगलीच चर्चेत आली होती. पँथरमुळे खेडोपाडी दलितांवर होणारे अत्याचार थांबले होते. शिवसेनेला त्याकाळी आव्हान दिले ते पँथरनेच! पण दलित चळवळीस लाभलेला दुहीचा शाप अखेर पँथरलाही भोवला आणि व्यक्तिगत हेवेदावे, नेतृत्वाचा हव्यास तसेच आंबेडकरवाद की मार्क्सवाद या वादातून पँथर फुटली.

नागपूर येथे भरलेल्या पहिल्या दलित पँथरच्या मेळाव्यात राजा ढालेंनी पँथरच्या नावाचा राजकीय वापर होत आहे, पँथर ही स्वयंभू संघटना आहे, असे कारण देत नामदेव ढसाळांना संघटनेतून काढून पँथर बरखास्तीची घोषणा करून ‘मास मूव्हमेंट’ काढली. तरीही नामदेव ढसाळ, रामदास आठवले, भाई संगारे, अरुण कांबळे, गंगाधर गाडे, अ‍ॅड. प्रीतमकुमार शेगावकर, आदींनी पँथर चालविली; पण १९९८च्या लोकसभा निवडणुकीवेळी रिपब्लिकन पक्षाचे जे फसवे ऐक्य झाले, तेव्हा दुसऱ्यांदा रामदास आठवलेंनी पँथर बरखास्त करून मोठी चूक केली. यामुळे दलित अत्याचाराविरोधी लढणारे हजारो तरुण सैरभैर झाले. चांगल्या चळवळीचे मातेरे झालेले पाहणे दलित चळवळीच्या वाट्याला आले. अत्याचाराविरुद्ध खदखदणारा ज्वालामुखी थंड झाला.

रिपब्लिकन पक्षाच्या तडजोडवादी गटबाज नेत्यांच्या नाकर्तेपणाविरुद्ध आक्रोश करीत सर्वंकष क्रांतीचा नारा देत जन्माला आलेल्या दलित पँथरने रिपब्लिकन नेत्यांनाही मागे सारणारे सत्तेचे हिणकस राजकारण करण्यात कसूर केली नाही. दोन्ही काँग्रेसच्या मांडवाखालून जाता जाता पुढे शिवसेना व आता भाजपच्या तंबूत पँथर नेते केव्हा जाऊन बसले, हे त्यांचे त्यांनाही कळले नाही. पँथरने नामांतर, मंडल आयोगाच्या प्रश्नावर संघर्ष केला; पण पुढे सर्व भार भावनात्मक राजकारणावरच राहिला. एक वेळ हे ठीकही होते. कारण, एका मर्यादेतील भावनात्मक राजकारण चळवळीत ऊर्जा निर्माण करीत असते; पण पँथर नेत्यांनी आंबेडकरवाद बाजूस सारून धर्मांध पक्षांशी युती करून सत्तेची पदे उपभोगावीत यास आंबेडकरवाद कसे म्हणावे, हा खरा आंबेडकरानुयायांना छळणारा प्रश्न आहे. १९७०च्या दशकासारखे अत्याचार आजही दलितांवर होत आहेत. तेव्हा दलित समाजावरील अत्याचाराची दाद मागण्यासाठी व त्यांना सर्व क्षेत्रात सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकशाहीवादी, सनदशीर, व्यापक, समाज संघटनेच्या मार्गाचा अवलंब करून काय करता येईल, याचा विचार दलित तरुणांनी केला पाहिजे, अशी अपेक्षा दलित पँथरच्या आजच्या स्थापनादिनी केली तर ती गैर ठरू नये.

Web Title: Where did the Panther Rebellion stop from?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.