नववर्षाच्या संकल्पाचे झाले काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2021 01:23 PM2021-01-07T13:23:08+5:302021-01-07T13:23:27+5:30

- मिलिंद कुलकर्णी वर्ष मावळत असताना नवीन वर्षाचे वेध लागतात. हे वेध लागत असताना मावळत्या वर्षातील घडामोडींचा मागोवा घेतला ...

What happened to the New Year's resolution? | नववर्षाच्या संकल्पाचे झाले काय?

नववर्षाच्या संकल्पाचे झाले काय?

googlenewsNext

- मिलिंद कुलकर्णी


वर्ष मावळत असताना नवीन वर्षाचे वेध लागतात. हे वेध लागत असताना मावळत्या वर्षातील घडामोडींचा मागोवा घेतला जातो. काय झाले आणि काय राहून गेले, याचा आढावा घेतला जातो. काही ठरवूनदेखील शक्य झाले नसेल, ते नव्या वर्षात पहिल्या दिवसापासून करायचे असे मनोमन ठरविले जाते. हे ठरवले जाते, यालाच संकल्प म्हटले जाते. नव्या वर्षाचा असा संकल्प प्रत्येक जण करीत असतो, पण ‘नव्याचे नऊ दिवस’ या नियमानुसार आठवडाभरात नव्या वर्षाचा संकल्प मागे पडतो, विसरला जातो आणि ‘ये रे माझ्या मागल्या’ प्रमाणे गेल्या वर्षीसारखे आपण बेबंदपणे जगू लागतो. आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाची ही कथा आणि व्यथा आहे.


इंग्लंडमध्ये कोरोनाचे नवे रुप आढळून आल्यानंतर राज्य शासनाने संपूर्ण राज्यात रात्रीची संचारबंदी जाहीर केली. रात्री ११ वाजेपासून सकाळी ६ वाजेपर्यंत या संचारबंदीचा अंमल राहणार आहे. हा निर्णय तर नवा संकल्प केलेल्या नागरिकांच्या पथ्यावर पडला. समाज माध्यमावर एक मार्मिक संदेश या मंडळींकडून फिरवला गेला. तो असा होता, उद्यापासून चांगलं ठरवलं होतं पहाटे ४ वाजता चालायला जायचे...आणि नेमकी रात्रीची संचारबंदी लागू झाली...आता पाच जानेवारीपर्यंत वाट पहावी लागणार...१ जानेवारी म्हणजे नवीन वर्षाचा उपक्रम गेला, म्हणजे एकंदर २०२१ पण व्यायाम केल्याशिवाय जाणार बहुतेक...अवघड आहे...नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न असे म्हणतात, तसे आरंभशूर मंडळींचे होत असते. काही तरी बहाणा करुन संकल्प पुढे ढकलायचा प्रयत्न केला जातो, त्याचे हे मासलेवाईक उदाहरण आहे.


कोरोनाच्या जागतिक महासाथीमुळे आपल्याला आरोग्याचे महत्त्व कळले. प्रतिकारशक्ती मजबूत असणे किती आवश्यक आहे, हे ध्यानात आले. असे असताना दैनंदिन व्यायामाचा संकल्प सगळ्यांनी करणे आवश्यक होते, पण दुर्देवाने तसे होताना दिसत नाही. दूरचित्रवाणी, समाजमाध्यमे यामुळे रात्री उशिरापर्यंत जागरण केले जाते, आणि स्वाभाविकपणे सकाळी लवकर उठण्याचा कंटाळा केला जातो. ‘लवकर निजे, लवकर उठे’ ही शिकवण आपल्याला कालबाह्य, जुनाट वाटते. पण त्याचे महत्त्व अबाधित आहे, हे विसरुन चालणार नाही.
संकल्प करुन ते सिध्दीस नेणारेदेखील अनेक जण आहे. भले, त्यांचे प्रमाण कमी असेल. पण त्यांची चिकाटी, सातत्य वाखाणण्याजोगे आहे. रनर्स ग्रुप, सायकलिस्ट ग्रुप, योग वर्ग, बॅडमिंटन, जीम या वेगवेगळ्या माध्यमातून नियमितपणे व्यायाम करणाऱ्या धडपड्या लोकांचे कौतुक करायला हवे. कोणताही ऋतू असला तरी त्यांच्या दैनंदिनीत खंड पडत नाही. आळसाला ते अजिबात जवळ फिरकू देत नाही. त्यांच्या या निश्चयामुळे केवळ आरोग्यासाठी लाभ होतो, असे नाही, त्यांच्या व्यक्तिमत्वाला एक शिस्त लागते. घरी, कार्यालय वा व्यवसायातदेखील ते त्याच निश्चयाने, दृढतेने काम करताना दिसतात.त्याचा परिणाम व्यवसायवृध्दीत होते.


काहींना दैनंदिनी लिहायची सवय असते. त्यामाध्यमातून आपले रोजचे जगणे ते शब्दबध्द करतात. स्वत:च्या वागण्याचे, स्वभावाचे रोज आत्मपरीक्षण, विश्लेषण करतात. अकारण वाद, चुका, संताप टाळण्यासाठी प्रयत्नपूर्वक पावले उचलतात. स्वनियंत्रणासाठी प्रयत्नरत राहतात. भवतालाकडे त्रयस्थपणे पाहतात. घटना, व्यक्ती व प्रसंगाविषयी तारतम्य भावाने विचार करु लागतात. हेदेखील व्यक्तिमत्व विकासाच्यादृष्टीने चांगले पाऊल आहे. काही जण रोज किमान एक पान वाचल्याशिवाय झोपायचे नाही, असा निश्चय करतात. तो बराचसा यशस्वी करतात. समाजमाध्यमांवरील वाचन वाढले तरी पुस्तके, मासिके, वर्तमानपत्र वाचनाचा अवधी कमी होत चालला आहे. समाजमाध्यमांवरील मजकुराच्या विश्वासार्हतेविषयी संशयाचे वातावरण असताना सिध्द झालेली पुस्तके न वाचले ही आत्मवंचना ठरणार आहे. ज्ञान, माहिती या बाबत आपण परिपूर्ण नसू तर स्वत:ची मते बनविण्याविषयी आपण साशंक राहतो. झुंडीतील एक घटक बनून होकाराला हो देण्यात धन्यता मानतो. विवेकाने प्रत्येक गोष्टीकडे बघणे, चिकित्सा करणे, प्रश्न विचारणे हा प्रत्येक नागरिकाचा स्थायीभाव आहे. त्याचा विसर पडता कामा नये. म्हणून नवीन वर्षासाठी संकल्प ठरविणे, त्याचे पालन करणे आणि संकल्पातून सिध्दी मिळविण्याचा आनंद घेणे हा वेगळाच अनुभव आहे.

 

Web Title: What happened to the New Year's resolution?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.