सोनेरी पिंजऱ्यातल्या क्रिकेटपटूंची ‘विराट’ व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 04:34 AM2021-04-03T04:34:43+5:302021-04-03T04:35:35+5:30

भारतीय क्रिकेटपटूंची अवस्था सध्या सोन्याच्या पिंजऱ्यातल्या पोपटासारखी आहे. सप्ततारांकित सुखं, सोन्याचे दाणे आहेत; पण मुक्त संचाराचं स्वातंत्र्य नाही!

The 'Virat' grief of the cricketers in the golden cage | सोनेरी पिंजऱ्यातल्या क्रिकेटपटूंची ‘विराट’ व्यथा

सोनेरी पिंजऱ्यातल्या क्रिकेटपटूंची ‘विराट’ व्यथा

Next

- द्वारकानाथ संझगिरी 
(ख्यातनाम क्रीडा समीक्षक)

आपल्याला लहानपणी अल्लामा इकबालची एक कविता होती. तिचं नाव होतं, ‘परिंदे की फरियाद’. सोन्याच्या पिंजऱ्यातल्या पोपटावर होती ती. पिंजरा सोन्याचा होता. दाणे सोन्याचे होते; पण पिंजऱ्याबाहेर उडून मोकळ्या आकाशात विहार करायचं स्वातंत्र्य त्या पोपटाला नव्हतं. भारतीय क्रिकेटपटूंची अवस्था या पोपटासारखी झाली आहे. सप्ततारांकित हॉटेलची सुखं आहेत. सोन्याचे दाणे वाढताहेत; पण कोविडमुळे मुक्त संचाराचं स्वातंत्र्य नाही.
विराट कोहलीने हीच भावना परवा बोलून दाखविली. कोविडचं युद्ध संपलेलं नाही. आता आधी आयपीएल असेल. त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं भरगच्च कॅलेंडर आहेच. त्यामुळे सोन्याचे पुढचे पिंजरे त्याच्या डोळ्यासमोर उभे राहिलेत; पण त्यांना सोन्याचे दाणेही हवेत, त्यामुळे गुदमरलेल्या मन:स्थितीची व्यथा त्याने बोलून दाखविली. 

ही व्यथा खोटी नाही. आपणही सध्या सोन्याचा नसला, तरी पिंजऱ्यातच आहोत. त्यामुळे आपण विराटची व अन्य क्रिकेटपटूंची व्यथा समजू शकतो. ‘स्वातंत्र्य’ नावाची गोष्ट कोविडने आणि कोविडमुळे तयार झालेल्या बायो-बबलने क्रिकेटपटूंकडून हिरावून घेतलीय. खेळायचं तर बबल हवाच, नाहीतर क्रिकेटमध्ये कोविड कधीही शिरकाव करू शकतो. हा बबल किती त्रासदायक असतो हे इंग्लंड, विंडीजच्या मालिकेवेळी प्रथमच जाणवलं. इंग्लंडचा गोलंदाज जोफ्रा आर्चर कुत्र्याची आठवण येते म्हणून बबल तोडून घरी गेला आणि पुढची कसोटी गमावून बसला; पण बबल तोडावासा वाटण्याला अनेक कारणं आहेत. 

व्यावसायिक खेळात आनंदाबरोबरच दुःख, नैराश्य, अपयश, संधीची टांगती तलवार वगैरे गोष्टी असतात. त्यातून बाहेर पडण्यासाठी काही खेळाडू एकाकी होतात. काही गाणी ऐकतात. काही बाहेरच्या लोकांत मिसळतात. बबलमध्ये असं बाहेर पडण्याची संधी नसते. मुख्य म्हणजे या सोनेरी तुरुंगवासामुळे एकतर मूलतः नैराश्य आलेलं असतं. त्यात परफॉर्मन्सच्या नैराश्याची भर पडू शकते. दुसरं म्हणजे क्रिकेटपटू ही लोकप्रियतेच्या लाटेवर आरूढ झालेली तरुण मुलं! सतत प्रसिद्धी व चाहते त्यांच्याभोवती घोंगावत असतात. बबलमुळे हे सारंच बंद झालंय!  

क्रिकेट संघ हा एखाद्या कुटुंबासारखा असला तरी सातत्याने तीच तीच माणसं त्यात दिसतात, त्याच त्याच माणसांबरोबर क्रिकेटपटू एकत्र राहतात. त्यामुळे कधीतरी दुरावलेली माणसं एकत्र येऊ शकतात; पण त्यांच्यात घर्षण होऊन दुरावूसुद्धा शकतात.

सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कोणाही खेळाडूला रिकाम्या स्टेडियमवर खेळायला कधीही आवडणार नाही. मी जेव्हा स्टेज शो करतो, तेव्हा योग्य जागी हशा किंवा टाळ्या आल्या नाहीत, तर मी कासावीस होतो. क्रिकेटपटूसुद्धा स्टेज शोच करीत असतात. फक्त त्यांचं स्टेज वेगळं असतं. कुणी बॅटनं बोलतं, कुणी चेंडूनं, तर कुणी अप्रतिम झेल घेऊन बोलतं. त्यावेळी स्टेडियममध्ये घुमणाऱ्या टाळ्या, उभं राहून दिली गेलेली मानवंदना या गोष्टी फार महत्त्वाच्या ठरतात. टीव्ही कॅमेऱ्यासमोर बोलणं आणि उत्साही प्रेक्षकांसमोर बोलणं यात फरक आहे ना, तोच रिकाम्या स्टेडियमवर खेळण्याच्या बाबतीत आहे.

पण हे टाळता येईल का?- कठीण आहे. तुम्ही रणजी किंवा इतर स्पर्धा सहज रद्द करू शकता आणि खेळाडूही तयार होतात. कारण, त्यातून फारसं काही त्यांना मिळत नाही; पण आंतरराष्ट्रीय कॅलेंडर बदलणं सोपं नसतं. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेट ही पैशाची मोठी उलाढाल असते. क्रिकेट ही इंडस्ट्री आहे. आता तो फक्त खेळ राहिलेला नाही. क्रिकेटपटूंपासून स्पॉन्सर व संघ मालकांपर्यंत अनेकांचे हितसंबंध त्यात गुंतलेले असतात. 

खेळाडू स्वतःहून बबलच्या बाहेर राहू शकतो. म्हणजेच तो ‘नाही खेळणार ही सिरीज,’ असं म्हणू शकतो; पण मग सोन्याच्या दाण्यांचं काय? स्वातंत्र्यावरून सोन्याचे दाणे ओवाळून टाकायची त्याची तयारी नसते. शिवाय भारतीय क्रिकेट सध्या इतकं समृद्ध आहे व नवीन खेळाडूंनी दुथडी भरून वाहतंय की एक संधी गेली तर पुन्हा ती कधी येईल हे सांगता येत नाही.
त्या ‘परिंदे की फरियाद’मध्ये अल्लामा इकबाल म्हणतात,
‘आजाद मुझ को कर दे, ओ कैद करने वाले, मैं बे-जूबाँ हूँ कैदी, तू छोड़ कर दुआ ले!'
- विराट कोहलीच्याही भावना याच आहेत; पण सध्या तरी त्याला पर्याय दिसत नाही.

Web Title: The 'Virat' grief of the cricketers in the golden cage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.