In the village of 'Anna', 'wax' explosion! Kamalacha Lotus near the old house of 'Ta'in' ... | 'अण्णां’च्या गावातही ‘मोम’बत्तीचा भडका ! ‘तार्इं’च्या नव्या-जुन्या घराजवळही कमळच कमळ...
'अण्णां’च्या गावातही ‘मोम’बत्तीचा भडका ! ‘तार्इं’च्या नव्या-जुन्या घराजवळही कमळच कमळ...

सचिन जवळकोटे

‘हात’वाल्यांना सोलापुरात पराभव तसा नवा नाही; परंतु यंदाची हालत खूपच बिकट. गल्लीबोळातले कार्यकर्ते तर सोडाच; आमदारांच्या घराजवळही कमळच कमळ फुललेलं. ‘सिद्धूअण्णां’च्या दुधनीत ‘मोदी-मुत्त्यां’ना पाचशेचा लीड; तर ‘प्रणितीतार्इं’च्या नव्या-जुन्या घराजवळ म्हणजे सात रस्ता अन् विजापूर रस्ता परिसरात कमळाचाच बोलबाला. विशेष म्हणजे, हे दोन्ही आमदार भलतेच बोलघेवडे.. तरीही मतदारांनी करून टाकली यांची बोलती बंद.


गेल्या निवडणुकीत पानमंगरुळच्या बनसोडेंना अक्कलकोट तालुक्यानं चांगली साथ दिलेली. यंदा तर त्यांच्यापेक्षाही जास्त लीड या पट्ट्यानं दिलेला. खुद्द दुधनीत कमळाला पाचशेचा लीड मिळाला. दुधनी गाव गेल्या कैक दशकांपासून ‘हात’वाल्यांचं राहिलेलं. ‘सिद्धूअण्णा’ही याच गावचे. तरीही चमत्कार घडलेला. ज्या घरांमध्ये आजपावेतो ‘ओम नमोऽऽ शिवाय’चा गजर व्हायचा, तिथं चक्क ‘नमो नम:’चा जयघोष झालेला.


‘डान्सबार’मधल्या डीजेलाही लाजवेल इतक्या जोरात ‘शंकरअण्णां’नी महाराजांच्या विरोधात आरोळी ठोकूनही ‘हात’वाल्यांना म्हणे इथं काँटा लगाऽऽ’.. कदाचित या ‘मोम’बत्तीचा अंदाज ‘‘सिद्धूअण्णां’ना अगोदरच आला असावा. ‘मोम’ म्हणजे ‘मोदी अन् महाराज’. त्यामुळे ते यंदा शांतच होते. सोलापूरच्या ‘लक्ष्मी निवास’मधूनच तालुक्याच्या प्रचाराची धुरा हाकत होते. भलेही त्यांनी महाराजांबद्दल एकही उलटसुलट शब्द उच्चारला नसला तरी त्यात विधानसभेची गणितं लपलेली. अक्कलकोट तालुक्यात ‘तमऽऽ तमऽऽ मंदीं’ना दुखवून आमदारकी जिंकता येत नसते, हे ओळखण्याइतपत ते नक्कीच सुज्ञ होते. त्यामुळं त्यांच्या पक्षनिष्ठेविषयी कुणीच शंका घेतलेली नसावी.


भलेही ‘सिद्धूअण्णां’नी गेल्या विधान परिषदेला ‘पंढरपुरी पंतां’च्या आडून कमळाला साथ दिली. झेडपी अध्यक्षपदासाठी ‘संजयमामां’साठीही कमळाचा सुगंध हुंगला. मात्र, आता याच कमळाच्या पाकळ्या आता थेट दुधनीतच घरोघरी दिसू लागल्यानं कार्यकर्त्यांची झोप उडालीय. ‘सिद्धूअण्णाऽऽ इगं येनू माडादू ?’ म्हणत काहीतरी मोठा निर्णय घ्यायला हवा, अशी लोकांच्या घरातली कुजबूज आता पारावरच्या गप्पांपर्यंत येऊन ठेपलीय. एकीकडं पाच वर्षे काम करून अन् वीस-पंचवीस खोकी फोडूनही आमदारकी मिळण्याची शक्यता नसेल... अन् दुसरीकडे केवळ खिशाला कमळाचा बिल्ला लावून पार्टी खर्चात म्हणजे फुकटात निवडून येण्याचे चान्सेस अधिक असतील, तर काहीतरी ठोस अ‍ॅक्शन घ्यायलाच हवी, या मानसिकतेपर्यंत कार्यकर्ते येऊ लागलेत. बघू या... अण्णा काय करतात ते. सोलापूरचे ‘विजूमालक’ देतीलच म्हणा त्यांना योग्य तो सल्ला. तोपर्यंत ‘सुभाषबापूं’च्या ‘सचिन’चे देव मात्र पाण्यात.
 मतदान झाल्यापासून ते निकाल लागेपर्यंत सोलापुरात एकच कॉमन चर्चा रंगलेली. ‘मध्य’मध्ये ‘हात’वाल्यांना लीड जास्त की ‘मिमसाब’वाल्यांना; परंतु ‘प्रणितीताई’ही राहिल्या दूर... ‘तौफिकभाई’ही पडले बाजूला... ‘महेशअण्णां’च्या टीमनंच आपल्या उमेदवाराला तब्बल अडोतीस हजारांचा लीड मिळवून दिलेला. ‘राज’ यांची ‘मनसे’ बात फुकटात गेली. आदल्या रात्री लोकांना झोपेतून उठवून दाखविलेले ‘गांधीबाबा’ही वाया गेले. ‘तार्इं’साठी हा निकाल खरोखरच धक्कादायक असला तरीही त्यांचा आशावाद अजूनही जबरदस्त. म्हणे ‘गेल्या लोकसभेचा पराभव पचवूनही आम्ही पुन्हा विधानसभा जिंकलेली. आता यंदाही तस्संच होणारऽऽ.’ तार्इंच्या स्वप्नपूर्तीसाठी मनापासून शुभेच्छा असल्या तरी योगायोग कधीतरी एकदाच अनुभवायला मिळतो. चमत्कार सारखा-सारखा घडत नसतो, हेही विसरू नये म्हणजे मिळविली.. असा विरोधकांचा सल्ला.
सोलापुरात महाराजांच्या नावामागं खासदार उपाधी लागल्यानंतर ‘उत्तर’मधल्या ‘विजूमालकां’ची दिल्लीतली राजकीय ताकद वाढली. माढ्यात एक लाखाचा लीड एकट्या माळशिरस तालुक्यातून दिल्यामुळं ‘विजयदादां’चाही मुंबईतला रुबाब अधिक वाढला. या दोन्ही मतदारसंघात चांगला समन्वय ठेवून ‘शिंदेशाही’ला शह देणाºया ‘सुभाषबापूं’चाही होल्ड जिल्ह्यात वाढला. पूर्वीच्या काळी जिल्ह्यात ‘हात’ एके ‘हात’ होता, तेव्हा दोन-तीन गट कार्यरत असायचे. ‘घड्याळा’चं प्रस्थ वाढल्यानंतरही गटा-तटाचंच राजकारण रंगत गेलं. गेल्या काही वर्षांपासून सोलापूर शहरात ‘कमळ’च्या गटबाजीला चांगले दिवस आलेले. आतातर जिल्हाभर कमळच कमळ. त्यामुळं यापुढे भविष्यात तीनच मोठे गट कार्यरत राहणार, हे शंभर टक्के निश्चित. ‘दक्षिण’चे बापू, ‘उत्तर’चे मालक अन् ‘अकलूज’चे दादा. बाकी सब बी टीम... थेट मुंबईतल्या ‘देवेंद्रपंतां’ची. लगाव बत्ती.. 

(लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)


Web Title: In the village of 'Anna', 'wax' explosion! Kamalacha Lotus near the old house of 'Ta'in' ...
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.