विशेष मुलाखतः विष्णूमास्तराचा प्रश्‍न आभाळाएवढा मोठा झालाय... हे आपलं न्यू नॉर्मल!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 06:00 AM2021-02-13T06:00:00+5:302021-02-13T06:00:02+5:30

आपण एकमेकांचा द्वेष करायला लागलो, आपल्याहून वेगळं मत मांडणार्‍यांच्या जीवावर उठलो आणि हे आपल्याला गौरवास्पद वाटतंय... हे आपलं न्यू नॉर्मल!

Veteran Writer Jayant Pawar Interview on Post Covid era and social situation in India | विशेष मुलाखतः विष्णूमास्तराचा प्रश्‍न आभाळाएवढा मोठा झालाय... हे आपलं न्यू नॉर्मल!

विशेष मुलाखतः विष्णूमास्तराचा प्रश्‍न आभाळाएवढा मोठा झालाय... हे आपलं न्यू नॉर्मल!

googlenewsNext
ठळक मुद्देकोविड काळात मृत्यूची दहशत पसरली होती ती मध्यम आणि उच्च मध्यमवर्गात.माणूस अधिक भित्रा, एकटा आणि दांभिक झाला आहे. व्यक्तिगत पातळीवर तो अधिकाधिक स्वार्थी होत चालला आहे.गेल्या काही काळात आपण एकमेकांचा द्वेष करायला लागलो आहोत, धडधडीत असत्य बोलणं हे मूल्य म्हणून आपण स्वीकारलं आहे.

>> जयंत पवार 
ख्यातनाम लेखक

* वेगवेगळी दहशत निर्माण करणार्‍या माणसांबद्दल, परिस्थितीबद्दल तुम्ही परखड लिहित आला आहात. कोविडच्या दहशतीबद्दल काय वाटतं?

>> जवळपास एक वर्ष आपण कोविडच्या सावलीत काढलं. आणखी किती काळ या विषाणूची भीती जगाचा पाठलाग करत राहील, माहिती नाही. जग भीतीच्या छायेत होतं हे खरंय. पण त्याची दहशत सार्वत्रिक नव्हती. असली तरी तिचं स्वरुप वेगवेगळं होतं. मला स्वतःला कोविडची दहशत वाटली नाही. वास्तविक कोरोनाच्या आगमनाच्या आधीपासून माझ्या आजारानं मला घरात बंदिवान करून ठेवलं होतं. त्यामुळे माझा बाहेरच्या जगाशी जवळपास संपर्क नव्हता. दवाखान्यात अथवा हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय कारणासाठी जावं लागायचं तेवढंच. आजारी माणसांना कोरोनाची लागण होण्याची आणि त्यांच्यासाठी तो जीवावरचा आजार ठरण्याची शक्यता सर्वाधिक होती. पण तरीही एक सर्वसाधारण चिंता वाटते त्याहून अधिक मला कोरोनाची भीती वाटत नव्हती. दहशत नाहीच. कनिष्ठ मध्यम वर्गातसुद्धा लोक घाबरले होते, पण वेगळ्या कारणांनी. लॉकडाऊनने माणसांना त्यांच्या छोट्याशा जागांमध्ये जखडून टाकलं होतं. मुळात स्पेस कमी असलेल्या माणसांना आपापल्या घरात एका जागी सक्तीने बसवलं गेलं होतं. त्याचा त्यांना जाच नक्कीच झाला असणार. मी दवाखान्यात जायचो तेव्हा मला आसपासच्या बैठ्या चाळी आणि वस्त्यांमधली तरणी मुलं भटकताना दिसायची. ती तरी काय करणार? दवाखान्यात येणार्‍या बायकांच्या बोलण्यातून वेगळीच भीती दिसायची. म्युनिसिपालिटीचे कोविड चाचणीसाठी येणारे कर्मचारी बारीकसारीक लक्षणं दिसली तरी कोरोनाची लागण झाल्याचं नोंदवतात आणि क्वारंटाइन करतात, अशी तक्रार त्या करत. त्याचा त्यांनी धसका घेतला होता. घराघरात लोकांची कमाई थांबली होती, ही धडकी भरवणारी गोष्ट होती. माझ्या इमारतीसमोर मोठी मोकळी जागा आहे. तिथल्या चाळी रिडेव्हलपमेंटसाठी पाडल्या आहेत. तिथे आता रान माजलंय. मी बघायचो, अगदी सकाळीच काही माणसं हातात काठी आणि पिशवी घेऊन जथ्याने फिरताना दिसायची. ती झाडांवरची फळं, खाण्याचे जिन्नस शोधत फिरायची. त्यांची शोधक नजर पायवाटांवरून भिरभिरत असायची. हातावर पोट असणारे मजूर आपापल्या गावांच्या दिशेनं सहकुटुंब चालत निघाल्याच्या बातम्या नंतर येऊ लागल्या. त्यांचे हाल अंगावर शहारे आणणारे होते. सारंच भयंकर होतं. पण ही दहशत मरणाची नव्हती, भुकेची होती.

मृत्यूची दहशत पसरली होती ती त्याच्यावरच्या मध्यम आणि उच्च मध्यमवर्गात. हा वर्ग आर्थिकदृष्ट्या सुस्थापित होता. स्थिर होता. जागतिकीकरणोत्तर काळाचा लाभार्थी ठरलेला आणि आपल्याच कैफात जगायला शिकलेला हा नवमध्यम वर्ग. ज्या सुरक्षित कवचात तो जगत होता ते कवचच कोरोनानं फोडलं. कोरोनाने त्याला मरणभय तर दाखवलंच पण त्याला एकटेपणाच्या बेटावर आणून सोडलं. त्याच्यासाठी काळ उलटापालटा झाला. गेली वीसपंचवीस वर्षं ग्लोबलायझेशनच्या जगात मनसोक्त वावरणार्‍या लोकांना एकदम अँटि-ग्लोबल काळात आणून टाकलं. सोशल डिस्टंन्सिंग नावाची एकमेकांबद्दल संशय वाढवणारी, नव अस्पृश्यता जन्माला घालणारी परिस्थिती निर्माण झाली. ह्यात सुस्थापित सुस्थिर वर्गातल्या अनेकांच्या नोकर्‍याही गेल्या. सुरक्षेचं आणखी एक कवच गळून पडलं. त्यांच्यासाठी नव्या जगण्याशी जुळवून घेणं खूप कठीण होतं. सुस्थितीत असलेल्या पण एकटं जगणार्‍या वृद्धांचे हाल झाले. कोरोनाने मृत्यू उंबरठ्यावर आणून ठेवला, पण त्यांचं रोजचं जगणंही मुष्किल झालं. को-ऑपरेटिव्ह सोसायट्यांत राहाणार्‍या सुशिक्षित वर्गाने पुढे सरकारने हिरवा कंदील दाखवूनही आपल्याला सेवा पुरवणार्‍या नोकरवर्गाला घरी बोलवण्याचं टाळल्याची अनेक उदाहरणं मी आसपास पाहिली. अनेकांना गरज होती, पण अनेकांना त्यात रिस्क वाटत होती. दोन तट पडले होते. सोसायटीच्या कमिट्या रिस्क वाटणार्‍यांच्या बाजूने उभ्या राहात होत्या. अर्थात बर्‍याच ठिकाणी असे प्रश्‍न तसंच रहिवाशांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचे निर्णय समंजसपणे हाताळले गेले. जे लोक आपल्या गावी गेले त्यांना वेशीवरच अडवणारे गावकरी हे त्या गावातले सुस्थापित आणि सुस्थिर नागरिकच होते. एका अदृश्य शक्तीने आणलेल्या मृत्यूच्या दहशतीखाली हे सारे जगत होते. कुठल्याही आपत्तीच्या काळात सर्वाधिक भरडल्या जातात त्या स्त्रिया. कोरोनाकाळातही त्याचा सार्वत्रिक अनुभव आला.

* टोकाचं व्हलनरेबल वाटण्याच्या या काळात लेखक म्हणुन नवं सुचणं कसं शक्य होतं?

>> प्रत्येक माणसाला सुचत असतं. व्हल्नरेबल माणसांना तर अधिक सुचत असतं. या सुचण्यातूनच त्यांच्या आत एक वेगळं विश्‍व तयार होतं, जे त्यांना जगायला आधार देतं. अर्थात प्रत्येकाचं सुचणं व्यक्त होण्यापर्यंत जातंच असं नाही. त्याचं कलेत, साहित्यात रूपांतर होणं ही तर फार पुढची गोष्ट. हा प्रश्‍न लेखक म्हणून मला असेल तर मला जी गोष्ट प्रकर्षाने व्यक्त करावीशी वाटते, सांगितल्याविना चैन पडत नाही तेव्हा मी कोणाचीही पर्वा न करता लिहितो. कारण लिहिणं ही तेव्हा माझी गरज बनलेली असते. मी नाही लिहिलं तर माझी गुदमर होईल. मी जास्त करून व्हल्नरेबल माणसांविषयीच लिहिलंय. हे खरंय की मी फार काही विपुल लिहिलेलं नाही. प्रत्येक सुचणं आकार घेतंच असं नाही. पण सुचत राहातं. एक गोष्ट खरी आहे की आज स्वतःच्या विवेकाशी प्रमाण राहून सत्य सांगू बघणार्‍या लेखकांसाठी कठीण दिवस आलेत. लेखक मुळातच एकटा असतो आणि असा लेखक तर आता सत्तेसाठीच नव्हे तर उपद्रवकारी समाजगटांसाठीही सॉफ्ट टार्गेट आहे. त्याला सहज शिकार बनवता येतं. कारण ह्या समाजगटांच्या मागून मेंढराप्रमाणे जाणार्‍या झुंडी तयार झाल्या आहेत. सत्ताधारी आणि सत्ताकांक्षी अशावेळी सोयिस्कर मौन धारण करतात. लेखक या प्राण्याचं अवमूल्यन करायचा कार्यक्रम यशस्वी झाला आहे. अशा काळातच लेखकाची कसोटी लागणार आहे. काळाला चकवणारे व्यक्त होण्याचे मार्ग लेखकालाच शोधून काढावे लागणार आहेत.

* ‘कोन नाय कोन्चा’ ही एकाकी निष्ठूर जाणीव साथीच्या काळात आणखी तीव्र झाली असं वाटतं का? माणूस अधिक एकटा, भित्रा, दांभिक झालाय?

>> होय. माणूस अधिक भित्रा, एकटा आणि दांभिक झाला आहे. व्यक्तिगत पातळीवर तो अधिकाधिक स्वार्थी होत चालला आहे. ही प्रक्रिया केव्हाच सुरू झाली होती. समाज म्हणून आपण एकजिनसी कधीच नव्हतो, पण आपण व्यवस्थेत नाडल्या जाणार्‍या लोकांच्या मागे उभं असलं पाहिजे, आपले हात त्यांच्या हातात असले पाहिजेत असं मानणारे खूप लोक होते. मात्र कधीतरी आपण या लोकांचा हात सोडला. आपण फक्त आपल्यासारख्या आणि आपल्यासारखा विचार करणार्‍या लोकांचे गट करून सेलिब्रेशन केलं. आपण अखिल जगाचे रहिवासी झालो होतो, पण त्याचवेळी आपण आपापल्या कुंपणाच्या तारा पिळून अधिक घट्ट केल्या. आपण नवनव्या माहितीने समृद्ध होत होतो, पण त्या माहितीचं ज्ञानात रूपांतर करण्याकडे दुर्लक्ष केलं आणि जे ज्ञान तयार झालं त्याचा माणसाच्या भल्यासाठी वापर करायचं विसरून गेलो. तांत्रिक प्रगती खूप झाली. नवी पिढी शिकली. पण जगाचा आज जो व्यवहार चालू आहे तो बघता शहाणपण आलं का हा प्रश्‍न निरुत्तर करणारा आहे. कोरोनाकाळात याचं दृश्यरूप अधिक ठळक झालं. या संपूर्ण काळात लोकांच्या अगतिकतेचा फायदा उठवत सरकारच्या आशिर्वादाने औषधी कंपन्यांनी जी नफेखोरी केली ते याचं ठळक उदाहरण आहे. करोनाकाळात मी डॉक्टरकडे जायचो तेव्हा रस्त्यात काही लोक भीक मागताना दिसायचे. हे नेहमीचे भिकारी नव्हते.नेहमी दिसत ते तर कुठेतरी गायबच झाले होते. ही त्याहून बर्‍या स्थितीतली माणसं होती. पुरुष होते, बाया होत्या आणि मुलंही होती. लाचारपणे ते रस्त्यावरून येणार्‍याजाणार्‍यांच्या मागे लागायचे. पण कोणीही त्यांच्याकडे बघत नव्हतं की मदत करत नव्हतं. मी पहिल्यांदा हे पाहिलं तेव्हा घरी आल्यावर बाथरूमचा दरवाजा बंद करून ओक्साबोक्शी रडलो. नंतरही बाहेर पडताना मला या दृश्याची भीती वाटत असे.

* ‘न्यू नॉर्मल’मध्ये सगळ्या पातळ्यांवर जगाचा चेहरा बदलला. लेखक म्हणून तुम्हाला त्यातलं काय नाट्य आकर्षित करतं? काळाचा हा फटका राज्यव्यवस्थांचा चेहरामोहरा बदलेल असं वाटतं का?

>> मोठ्या आपत्तीनंतर, पडझडीनंतर, भीषण संहारानंतर त्यातून वाचलेल्यांंना स्वतःला सावरताना जगणं नव्याने सुरू करावं लागतं. यात अनेक जुन्या गोष्टी नाहिशा होतात आणि जगण्याचं शहाणपण काही नव्या गोष्टी घेऊन येतं. हे न्यू नॉर्मल आजचंच नाही. मानवी जीवनव्यवहार यातूनच पुढे जात आला आहे. कोरोनाने शिकवलेल्या नव्या जगण्याने जगाचा चेहरा बदलला आहे. पण तो अधिक मानवी झाला का, हा प्रश्‍न शेष आहे. मला वाटतं मानवी स्वार्थ अधिक टोकदार झाला आहे. त्यामुळे राज्य व्यवस्थेचाच नव्हे तर ज्यांच्या हातात सत्ता आहेत अशा सर्वच व्यवस्थांचा चेहरामोहरा बदलणार आहे. तो अधिक क्रूर होणार आहे.

मला भारताच्या संदर्भातलं न्यू नॉर्मल अधिक भीषण वाटतं. गेल्या काही काळात आपण एकमेकांचा द्वेष करायला लागलो आहोत, धडधडीत असत्य बोलणं हे मूल्य म्हणून आपण स्वीकारलं आहे, माणूसपणाच्या सगळ्या कसोट्या पायदळी तुडवून आपल्याहून वेगळं मत मांडणार्‍यांच्या जीवावर उठलो आहोत आणि हे सर्व आपल्याला गौरवास्पद वाटतंय. हे आपलं न्यू नॉर्मल आहे. इथे मी ‘आपण’ असा उल्लेख करतो आहे तो बहुसंख्य या अर्थाने.

नाटककार मोहन राकेश यांच्या ‘शायद’ या एकांकिकेतला एक संवाद मला सतत आठवतो. ही एकांकिका वाचून चाळीस वर्षं झाली. त्यात निवृत्तीनंतरचं आयुष्य जगणारं दाम्पत्य घराच्या बाल्कनीत बसलं आहे. दोघं बाहेर बघताहेत. नवरा बायकोला म्हणतो, ‘हम कितने मॅच्युअर हो गये है ना?’ यावर बायको विचारते, ‘वो कैसे?’ तो म्हणतो, ‘पहले लगता था हम सुखी है. सारी दुनिया सुखी है. अब लगता है, सारी दुनिया दुखी है. हम भी दुखी है. मॅच्युरिटी और क्या होती है?’ मला वाटतं हा संवाद आजच्या जगण्याशी ताडून बघायचा तर आपण मॅच्युरिटीकडून इममॅच्युरिटीकडे चाललो आहोत.

* जगण्याचाच झगडा मोठा झाल्यावर नीती, मूल्यं अशा गोेष्टींचं असणं किती उरेल असं वाटतं?

>> ज्यांचा जगण्याचा झगडा मोठा आहे त्यांनी पराकोटीच्या संघर्षात टिकून राहण्यासाठी नीती मूल्यं पायदळी तुडवली तर मला त्यात गैर वाटणार नाही. ज्यांच्या वाट्याला सन्मानाचं जगणं येत नाही त्यांनी मूल्यं का जपावीत? पण अनेकदा अशीच माणसं त्यांची म्हणून काही नीतीमूल्यं जपताना दिसतात. उलट ज्यांना जगण्याची भ्रांत नाही, ज्यांची पोटं तुडुंब भरलेली आहेत असे लोक मात्र सगळी मूल्यं धुडकावून अनैतिक होत असतात आणि समाजात ताठ मानेने मिरवत असतात, गौरवले जातात, अशांचं काय करायचं? सगळ्या व्यवस्थाही त्यांच्याच पक्षपाती असतात. चिं.त्र्यं. खानोलकरांच्या ‘चाफा’ कथेतला विष्णू मास्तर म्हणतो, ‘गावातल्या लोकांची दोंदे सुटतात, पण माझ्या काशीचं लग्न होत नाही. असं का?’ विष्णू मास्तराचा हा प्रश्‍न आभाळाइतका मोठा झालाय.

मुलाखत : सोनाली नवांगुळ

Web Title: Veteran Writer Jayant Pawar Interview on Post Covid era and social situation in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.