शाकाहारी...विगन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 12:05 IST2025-06-08T12:04:55+5:302025-06-08T12:05:06+5:30
Food News: आजच्या घडीला मात्र शाकाहार हा मोठा प्रकार झालाय आणि त्यातही विगन, म्हणजे फक्त भाज्या-फळे खाणारे नाहीत तर प्राणिजन्य पदार्थ, दूध, दही, मध हेही न खाणारे आहेत. पण गंमत याची वाटते की अनेकांना पदार्थांचे रुपडे पालटून टाकायची हौस असते.

शाकाहारी...विगन!
- शुभा प्रभू-साटम
आदिमानवाचा मेंदू विकसित होऊन तो प्रगत मानव होण्याआधी शाकाहारी नव्हता. त्याने अपघाताने आगीत भाजलेले अन्न खाल्ले आणि अन्न शिजवणे म्हणजे स्वयंपाक सुरू झाला. त्याआधी मानवजात जराही शाकाहारी नव्हती. आजच्या घडीला मात्र शाकाहार हा मोठा प्रकार झालाय आणि त्यातही विगन, म्हणजे फक्त भाज्या-फळे खाणारे नाहीत तर प्राणिजन्य पदार्थ, दूध, दही, मध हेही न खाणारे आहेत. पण गंमत याची वाटते की अनेकांना पदार्थांचे रुपडे पालटून टाकायची हौस असते.
आता सुशी घ्या. ती कशी करतात हे जगज्ञात आहेच, पण डोक्यालिटीने त्याचे पूर्ण शाकाहारी व्हर्जन आणले आहे. अन्य आहारात जे जे आहे त्याचे जवळपास पूर्ण शाकाहारी रूप आपल्याला मिळते. मोठ्ठे उदाहरण, मॅकडोनाल्ड. त्यांच्या बर्गरमध्ये काय असते ते जगजाहीर. पण भारतातील शाकाहारी लोकांच्या भावना सांभाळायच्या म्हणून या अमेरिकी व्यापाऱ्याने बटाटा टिक्की, पनीर मसाला अशा चवीचे बर्गर आणले. व्हेज मांचुरियन, पनीर चिली, व्हेज फ्राइड राइस माहीत नाही असा कोणी भारतीय शाकाहारी खवय्या नसेल. तुमची अमुक बिर्याणी, आमची व्हेज, पनीर टिक्का, व्हेज बटर बिर्याणी. तुमचे अमुक कबाब तर आमचे ब्रोकोली/ फ्लॉवर/मशरूम/ पनीर टिक्का, रेशमी.कबाब. तुमचे हॉट सौर सूप आमचे शिमला कॉर्न हॉट ॲन्ड सौर सूप. तुमची फ्रँकी आमची चीज पनीर फ्रँकी आणि सर्वांत मोठ्ठा घोळ म्हणजे पनीर भुर्जी.
मला इथे एक प्रश्न पडतो की मूळ पदार्थ काय चवीचा आहे हे शाकाहारी कसे ओळखतात? की कोणा माहितगाराची मदत घेतात? कारण बिर्याणीत किंवा बटर मसाल्यात मूळ पदार्थ/ घटक असतो त्याची चव ही त्या डीशला खुलवते. एक बावळट प्रकार म्हणजे कोफ्ता करी. मूळ कोफ्ता करी कशाची असते हे ठाऊक असेलच. दुधी भोपळ्याचे कोफ्ता करतात राजेहो...का पण?
या सर्व पदार्थांचे शाकाहारी व्हर्जन तडाखेबंद खपते... आणि या शाकाहारी पंथातील कट्टर प्रवाह म्हणजे विगन. दूध, दुग्धजन्य पदार्थ, त्यांना बिलकुल चालत नाहीत. म्हणजे केक करतोय तर त्यात बटर नाही तर बदाम क्रीम घालणार किंवा कोकोनट क्रीम, मिल्कशेक आहे तर त्यात ओट्स/ बदाम दूध, चहात पण हेच. फरक इतका की त्या बदाम दुधाच्या खर्चात चार महिन्यांच्या दुधाचे बिल निघेल. मुद्दा काय की मूळ पदार्थाचे शाकाहारी/ विगन रूप आणण्यामागे हेतू काय? आपली ठराविक आहारनिष्ठा अबाधित ठेवून वेगळी चव घेण्याची ऊर्मी? की हम भी कुछ कम नहीं हे दाखवायची खुमखुमी?