केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 10:06 IST2025-05-20T10:02:37+5:302025-05-20T10:06:44+5:30
प्रथेप्रमाणे इस्रोने तांत्रिक समित्या नेमून अपयशांमागील तांत्रिक कारणे शोधण्याची प्रक्रिया सुरू केली आहेच; पण शंकांचा समूळ बिमोड होण्यासाठी घातपातांची शक्यताही तपासून बघितली पाहिजे...

केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
पीएसएलव्ही या संक्षिप्त नावाने सुपरिचित भारताच्या ध्रुवीय प्रक्षेपक वाहनाचे १८ मे रोजीचे अपयश हा भारताच्या संरक्षण सिद्धतेच्या दृष्टीने मोठा धक्का आहे. विशेषतः पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत उफाळलेल्या सशस्त्र संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, पीएसएलव्ही वाहून नेत असलेला ईओएस-०९ हा पृथ्वी निरीक्षण उपग्रह कक्षेत स्थापन होणे अत्यंत निकडीचे होते. वास्तविक पीएसएलव्ही हे भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने विकसित केलेले अत्यंत विश्वासार्ह प्रक्षेपक आहे; परंतु दुर्दैवाने यश अत्यंत आवश्यक असतानाच, भरवशाच्या म्हशीला टोणगा, या म्हणीचा प्रत्यय आला.
अवघ्या चारच महिन्यांपूर्वी जीएसएलव्ही या भूस्थिर उपग्रह प्रक्षेपकाचे उड्डाणही अपयशी ठरले होते आणि एनव्हीएस-०२ हा उपग्रह निर्धारित कक्षेत पोहोचू शकला नव्हता. या दोन अत्यंत महत्त्वाच्या मोहिमांचे अपयश हे केवळ तांत्रिक बाबींपुरते मर्यादित न राहता, राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनेही गंभीर परिणाम करणारे ठरले आहे. ‘सिंथेटिक ॲपर्चर रडार’ने सुसज्ज ईओएस-०९ या उपग्रहाचा उपयोग रात्री आणि ढगाळ हवामानातही जमिनीवर सतत नजर ठेवण्यासाठी होणार होता. विशेषतः सीमाभागांतील घुसखोरी आणि दहशतवादी हालचालींवर नियंत्रणासाठी त्याचे महत्त्व अनन्यसाधारण होते; परंतु उड्डाणानंतर प्रक्षेपकाच्या तिसऱ्या टप्प्यात इंधन दाबात अडथळा आल्याने उपग्रह इच्छित कक्षेत पोहोचू शकला नाही.
एनव्हीएस-०२ हा भारताच्या स्वदेशी ‘नाविक’ या नेव्हिगेशन प्रणालीसाठी अत्यावश्यक उपग्रह होता. लष्करी आणि नागरी वापरासाठी अचूक स्थाननिर्धारण व वेळनिर्धारण करणारी ही प्रणाली भारतीय संरक्षण यंत्रणेसाठी फारच महत्त्वपूर्ण आहे. एनव्हीएस-०२ यशस्वीरीत्या प्रक्षेपित झाला खरा; पण त्यानंतरच्या कक्षांतरणासाठी आवश्यक असलेल्या झडप प्रणालीतील बिघाडामुळे तो अपेक्षित कक्षेत पोहोचू शकला नव्हता. परिणामी, ‘नाविक’ प्रणालीच्या अचूकतेवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. या दोन्ही मोहिमा भारताच्या संरक्षण सिद्धतेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या होत्या. दोन्ही अपयशांमुळे भारताला तब्बल ८५० कोटी रुपयांचा फटका बसला आहे; पण देशाच्या संरक्षण सिद्धतेवर जे विपरीत परिणाम होणार आहेत, त्यांची मोजदाद पैशात होऊच शकत नाही. ईओएस-०९ कक्षेत न पोहोचल्याने, नेमकी आत्यंतिक गरज असताना, रात्री किंवा ढगाळ हवामानात सीमाभागात घडणाऱ्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवणे अधिक अवघड झाले आहे. एनव्हीएस-०२ च्या अपयशामुळे ‘नाविक’ प्रणालीत निर्माण झालेला अडथळा भारताला ‘जीपीएस’सारख्या अमेरिकन प्रणालीवर अवलंबून राहण्यास भाग पाडू शकतो. कारगिल युद्धाच्या वेळी भारताला अत्यंत निकड असताना अमेरिकेने भारताला ‘जीपीएस डेटा’ उपलब्ध करून दिला नव्हता, ही फार जुनी गोष्ट नाही. किंबहुना त्यामुळेच तर भारताला स्वदेशी नेव्हिगेशन प्रणालीची गरज भासली होती आणि ‘नाविक’चा जन्म झाला होता. ताजे अपयश हे पीएसएलव्हीच्या इतिहासातील केवळ तिसरे अपयश आहे.
यापूर्वी केवळ १९९३ आणि २०१७ मध्येच पीएसएलव्ही अपेक्षा पूर्ण करू शकले नव्हते. योगायोग म्हणजे २०१७ मध्ये पीएसएलव्ही ‘नाविक’ प्रणालीचा भाग होणार असलेला आयआयआरएनएसएस-१ एच हा उपग्रह वाहून नेत होते. थोडक्यात, गत काही वर्षांत देशाच्या संरक्षण सिद्धतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेले तीन उपग्रह कक्षेत स्थापित करण्यात इस्रोला अपयश आले आहे. हा योगायोग असण्याचीच शक्यता दाट आहे; पण मनात कोठे तरी शंकेची पाल चुकचुकल्याशिवाय राहत नाही. प्रथेप्रमाणे इस्रोने तांत्रिक समित्या नेमून अपयशांमागील तांत्रिक कारणे शोधण्याची प्रक्रिया सुरू केली आहेच; पण शंकांचा समूळ बिमोड होण्यासाठी घातपातांची शक्यताही तपासून बघितली पाहिजे.
इस्रोने आजवर सुमारे ३०० हून अधिक परदेशी उपग्रह यशस्वीरीत्या कक्षेत स्थापन करून जागतिक स्तरावर विश्वासार्हतेचा एक उच्च मापदंड प्रस्थापित केला आहे. त्यामुळे या दोन सलग अपयशांनी परदेशी ग्राहकांच्या दृष्टीने इस्रोच्या विश्वासार्हतेला धक्का वगैरे बसणार नाही; पण दुर्दैवाने नजीकच्या भविष्यात आणखी एखाद-दुसरे अपयश पदरी पडल्यास तो धोका संभवतो. त्यामुळे भविष्यातील मोहिमांत अशा चुका पुन्हा होऊ नयेत, यासाठी अधिक काटेकोर उपाययोजना राबविणे फार आवश्यक झाले आहे. दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज नक्कीच निर्माण झाली आहे.