कोंडवाडा संपण्याची चिन्हे: काळजी घ्या, बाहेर पडा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 09:03 PM2021-09-27T21:03:04+5:302021-09-27T21:07:32+5:30

आज आंतरराष्ट्रीय पर्यटन दिवस. गेली दोन वर्ष कोरोना महामारीमुळे बंद दारांमागे कोंडल्या गेलेल्या व्यवसायाची चाकं पुन्हा सुरू होत असताना जगात काय चित्र आहे?

tourists activities started after corona crisis | कोंडवाडा संपण्याची चिन्हे: काळजी घ्या, बाहेर पडा!

कोंडवाडा संपण्याची चिन्हे: काळजी घ्या, बाहेर पडा!

Next

- वीणा पाटील, व्यवस्थापकीय संचालक, वीणा वर्ल्ड

विमान कंपन्या, हॉटेल्स आणि पर्यटक हे पर्यटन क्षेत्रातील तीन महत्त्वाचे घटक. या तीन घटकांमुळेच कोरोनापूर्व काळात पर्यटन  ही जगातली दुसऱ्या क्रमांकाची इंडस्ट्री होती. कोट्यवधी लोकांचं जगणं या क्षेत्रावर अवलंबून होतं, पण कोरोेनामुळे २०२०मध्ये पर्यटन क्षेत्राला अनपेक्षित धक्का बसला आणि सारं काही उलटंपालटं झालं. या क्षेत्राची इतकी दयनीय अवस्था झाली, की ते पु्न्हा उभं राहणार की नाही, अशी भीती सगळ्यांना वाटू लागली. या उद्योगाशी जोडलेल्या सगळ्यांची स्थिती अतिशय भयावह झाली.

सुरुवातीला पहिले तीन महिने अनेकांना या संकटाची दाहकता कळली नाही. काही दिवसांतच हे सारं काही संपेल, असं समजून हा काळ त्यांनी आनंदात, सुटी समजून काढला, पण  तीव्रता वाढायला लागली तसं गांभीर्य कळायला लागलं. या क्षेत्रातल्या अनेकांनी आपला व्यवसायच बदलला. अर्थार्जनासाठी हातपाय हलवणं भाग होतंही... मला मात्र आशा होती, हा स्थित्यंतराचा काळ आहे! चित्र बदलेल. ज्या वेगानं ही इंडस्ट्री खाली जाते आहे, त्याच्या दुप्पट वेगानं वर येईल आणि आवरणं कठीण होईल, याचा मला भरवसा वाटत होता. सध्या आम्ही तोच अनुभव घेतो आहोत.



गेल्यावर्षी कोरोनाचा पहिला उद्रेक कमी झाल्यानंतर,  सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये आठ-दहा महिन्यांनी लोक घराबाहेर पडले.  स्वत:च्या वाहनानं किंवा मिळेल ते वाहन घेऊन आवडेल, परवडेल त्याठिकाणी गेले. त्यावेळी आम्हाला पहिल्यांदा आशेचा पहिला किरण दिसला. दुसरा आशेचा किरण दिसला तो फेब्रुवारी-मार्चमध्ये. माझ्या ३५ वर्षांच्या कालखंडात जेवढे पर्यटक आम्ही काश्मीर, कुलू-मनाली, केरळला पाठवले नाहीत, तेवढे केवळ या दोन महिन्यांत पाठवले. एखाद्या बंदिगृहातून लोकं झुंडीनं बाहेर यावेत, तसं चित्र दिसत होतं.

त्यानंतर पुन्हा  कोरोनाची लाट आली आणि एप्रिल-मे-जूनमध्ये इंडस्ट्री पुन्हा ठप्प झाली. त्यावेळी सगळ्यांनी पुन्हा उमेद सोडली. या लाटा सतत सुरु रहिल्या तर काय, या निराशेनं  ग्रासलं.  आम्ही शांत राहिलो, दुसरा इलाजही नव्हता. नव्या योजना आखायला सुरुवात केली.

त्यानंतर जुलै-ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा लोक बाहेर पडले. यावेळी परदेश प्रवास बंदच असल्यानं आम्ही अनेकांना भारतांतर्गत पर्यटनाला पाठवलं. पर्यटकांनी याही काळात ‘न भूतो, न भविष्यती’ अशी गर्दी केली. पर्यटक स्वत:हूनच परस्परांना सांगत राहिले. ‘जा, बाहेर पडा, काही भीती नाही!...’ त्यामुळे पर्यटकांची संख्या वाढली. या वर्षात दोनदा आम्ही असा अनुभव घेतला. पहिल्यांदा फेब्रुवारी-मार्चमध्ये आणि त्यानंतर जुलै-ऑगस्टमध्ये.

आता जग उघडायला लागलंय. भारतीय पर्यटकांच्या स्वागतासाठी पहिल्यांदा दरवाजे उघडले ते स्वीत्झर्लंडनं!  कोरोनामुळे इतर देश भारतीय पर्यटकांना आपल्या देशात येऊ देण्यास नाखुश असताना स्वीत्झर्लंडनं मात्र भारतीय पर्यटकांचं मोठ्या उत्साहानं स्वागत केलं. त्यानंतर आईसलॅण्ड, रशियासारख्या इतर देशांनीही भारतीयांसाठी दारं उघडली. तिथेही आता नोव्हेंबरमध्ये टूर्स जाताहेत. तिथे ‘नॉर्दर्न लाईट’ म्हणजेच ‘ऑरोरा बोरिएलिस’ हा निसर्गाचा अलौकिक चमत्कार पाहायला मिळतो.

पृथ्वीवरचा अवकाशातील सर्वांत मोठा नैसर्गिक लाइट शो, असंही त्याला म्हटलं जातं. उत्तर ध्रुवाच्या अवकाशात या काळात दिसणारे अलौकिक रंग पाहण्यासाठी जगभरातून लोक येतात. मुख्यत्वे फिनलंड, कॅनडा, अलास्का, ग्रीनलॅण्ड, आईसलॅण्ड किंवा रशिया इथून निसर्गाचं हे मनोहारी दृष्य दिसू शकतं. यंदा आईसलॅण्ड आणि रशिया येथे मोठ्या प्रमाणात  ग्रुप टुर्स चालल्या आहेत. दुबई एक्स्पोसाठीही पर्यटक  उत्सुक आहेत.

एक गोष्ट मात्र कटाक्षानं पाळली गेली पाहिजे. सरकारनं पर्यटन खुलं करण्याचे संकेत दिल्यानंतरच प्रवासाचे बेत आखावेत. नियमांचा आदर राखावा. यात पर्यटन कंपन्या आणि पर्यटकांनीही कुचराई करता कामा नये. आम्हीही तेच केलं. यंदा लेह-लडाखलाही खूप पर्यटक आम्ही पाठवले. त्यामुळे विमान कंपन्या तर खूष झाल्याच, पण तिथल्या लोकांचाही ‘सिझन’ चांगला गेला.

सुदैवानं अलीकडे चांगल्या बातम्या येताहेत. अनेक देश पर्यटकांचं स्वागत करताहेत. पर्यटन पुन्हा सुरू झालंय. देवस्थानं, शाळा सुरू करण्याचं सरकारनं जाहीर केलंय. कोरोनाची तिसरी लाटही कमी क्षमतेची असेल, असं म्हटलं जातंय. एक पर्यटक किमान आठ हातांना काम देतो, असं म्हटलं जातं. वाहतूक आणि हॉटेलिंग व्यवसायातले लोक सुमारे वर्षभरापासून हातावर हात ठेवून बसून आहेत. ते लवकर मार्गी लागायला हवं. एक गोष्ट मात्र काळ्या दगडावरची रेघ आहे. पर्यटन क्षेत्र आता थांबणार नाही, ते पुढे पुढेच जात राहील. कारण माणसाची मूळ प्रेरणाच ‘भटक्या’ची आहे.

Web Title: tourists activities started after corona crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.