आजचा अग्रलेख: क्रांतिकारी शांतिदूत गेला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2022 06:54 AM2022-09-01T06:54:53+5:302022-09-01T06:56:06+5:30

Mikhail Gorbachev: तीस वर्षांपूर्वी पडलेल्या सोविएट रशियाची शकले पुन्हा एकत्र बांधण्यासाठी क्रिमिया बळकावणारे, युक्रेनवर आक्रमण करणारे, तो चिमुकला देश बेचिराख करणारे व्लादिमीर पुतीन यांच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेची जगभर छी: थू होत असताना मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी जगाचा निरोप घेतला आहे

Today's Editorial, Mikhail Gorbachev: Revolutionary Peacemaker Gone | आजचा अग्रलेख: क्रांतिकारी शांतिदूत गेला

आजचा अग्रलेख: क्रांतिकारी शांतिदूत गेला

Next

इतिहासाचे कालचक्र उलटे फिरविण्याच्या प्रयत्नात तीस वर्षांपूर्वी पडलेल्या सोविएट रशियाची शकले पुन्हा एकत्र बांधण्यासाठी क्रिमिया बळकावणारे, युक्रेनवर आक्रमण करणारे, तो चिमुकला देश बेचिराख करणारे व्लादिमीर पुतीन यांच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेची जगभर छी: थू होत असताना मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी जगाचा निरोप घेतला आहे.अमेरिकेचे समकालीन अध्यक्ष रोनाल्ड रिगन यांच्या मदतीने शीतयुद्ध संपविणारा, शांततेचा नोबेल  विजेता असा हा जागतिक नेता विघटनानंतरच्या तीन दशकांत रशियन जनतेच्या दु:स्वासाचा धनी ठरला. सव्वादोन कोटी चौरस किलोमीटर क्षेत्रफळ व अकरा टाइम झोनच्या आपल्या विशाल, महाशक्तिमान देशाचे या माणसामुळे तुकडे झाले, असा राग गतवैभवात रमणाऱ्या बहुसंख्य रशियनांनी त्यांच्यावर धरला. क्रांतिकारी शांतिदूत अशी त्यांची जगभर प्रतिमा असली तरी बोरिस येल्त्सीन यांच्यापासून ते सध्याच्या पुतीन यांच्यापर्यंत सगळ्यांच्या राजवटीत गोर्बाचेव्ह यांच्या वाट्याला अपमानच आला. असे असले तरी जगाच्या राजकारणाची, अर्थकारणाची, शस्त्रास्त्र स्पर्धेची दिशा बदलणारा, सामान्य माणसाचे स्वातंत्र्य केंद्रस्थानी ठेवणारा थोर नेता ही गोर्बाचेव्ह यांची प्रतिमा त्यांच्या देशातील कुणालाच पुसता आली नाही. हेच त्यांचे वेगळेपण आणि थोरपणही.

विशेषत: रशियन राज्यक्रांतीनंतरच्या पाऊणशे वर्षांत तिथल्या एकपक्षीय हुकूमशाही राजवटीचे, रक्तरंजित घटनांचे, साम्यवादाच्या पोलादी भिंतींचे चटके अनुभवलेल्या जगासाठी मिखाईल गोर्बाचेव्ह शांतिदूत ठरले. ग्लासनोस्त व पेरेस्त्राेयका हे दोन शब्द, सामान्य माणसांवरील निर्बंधांचे फास सैल करणारी, त्यांना मोकळ्या हवेत श्वासाची संधी देणारी धोरणे हे त्यांचे जगाला मोठे योगदान ठरले. ग्लासनोस्त म्हणजे सरकारच्या कारभारात पारदर्शकता आणणारा, खुलेपणाचा, आपल्याकडील माहितीच्या अधिकारासारखा कार्यक्रम, तर पेरेस्त्रोयका म्हणजे सर्व पातळ्यांवरील पुनर्रचना. रशियन कवी येवगेनी येवतुशेन्को यांच्या रूपकानुसार, ग्लासनोस्त व पेरेस्त्रोयका म्हणजे अनुक्रमे हवा आणि जमीन. जमिनीचा पोत सुधरवण्यापेक्षा हवा शुद्ध करणे सोपे. या विचारांचे मूळ गोर्बाचेव्ह यांच्या बालपणात होते.

१९१७ च्या बोल्शेविक क्रांतीनंतर व्लादिमीर लेनिनच्या नेतृत्वात पूर्व यूराेप व उत्तर आशियातील अनेक प्रांत सोविएट युनियनच्या नावाने एकत्र आले. जगाच्या राजकारणाची फेरमांडणी झाली. गोर्बाचेव्ह यांच्या जन्मापूर्वी लेनिनचा मृत्यू झाला होता. त्याच्या दोन पावले पुढे असलेला जोसेफ स्टॅलिन नवा हुकुमशहा होता. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी बालपणीच दुष्काळाची होरपळ, दोन काका व आत्याचा त्यात मृत्यू, दोन आजोबांचा लेबर कॅम्पमधील छळ हे सारे अनुभवले. १९५३ मध्ये स्टॅलिनच्या मृत्यूनंतर निकिता क्रुश्चेव्ह यांच्या राजवटीत साेविएट रशियाचे डिस्टॅलिनायझेशन तरुण कम्युनिस्ट कार्यकर्ता म्हणून त्यांनी जवळून अनुभवले. ५० व ६० च्या दशकात उद्योग, पायाभूत सुविधांपासून ते अंतराळापर्यंत सर्व क्षेत्रांमध्ये सोविएट रशियाने जी भरभराट केली, ती सामान्य माणसाच्या शोषणातून उभी राहिली होती. अमेरिकेला आव्हान देणाऱ्या त्या महासत्तेच्या विज्ञान, तंत्रज्ञानातील प्रगतीचा पाया पोकळ होता. शेकडो बळी घेणारा चेर्नोबिल अणुभट्टीचा अपघात हा त्याचा पुरावा होता. त्या चुकीची गोर्बाचेव्ह यांनी जगापुढे कबुली दिली. अफगाणिस्तानावरील आक्रमण ही चूक व युद्धगुन्हा असल्याचेही निर्मळपणे मान्य केले.

अमेरिकेसोबत अण्वस्त्रबंदीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न पूर्णत: यशस्वी झाले नाहीत. तरीही त्या प्रयत्नांनी जगभर संदेश गेला, की महाशक्ती बनण्यासाठी अण्वस्त्रांचा साठा करणे ही सामान्यांची फसवणूक आहे. त्यातून जगाच्या वाट्याला दु:खच येणार आहे. गोर्बाचेव्ह यांच्यामुळे केवळ लिथुआनिया, इस्टोनिया, लॅटव्हिया, युक्रेन, उझबेक, किरगिझ, ताझिक वगैरे देशांना स्वातंत्र्याचे सूर्यदर्शन घडविले असे नाही, तर रशियाची बाजारपेठ जगासाठी खुली झाली, साम्यवादाला जागतिकीकरण व खासगीकरणाचे दर्शन घडले. ज्वलंत मुद्द्यावर जगाने एकत्र येण्याच्या प्रक्रियेचा पाया घातला गेला. कष्टकऱ्यांनी स्वप्ने पाहायला सुरवात केली आणि मध्यमवर्गीयांच्या आयुष्यातही आनंदाची पेरणी झाली. त्या माध्यमातून आयुष्यभर स्वातंत्र्य व लोकशाही मूल्यांचा ध्यास घेतलेला हा नेता सहजपणे सत्तेच्या झगमगाटाबाहेर पडला. व्याख्याने देत, वर्तमानपत्रांमध्ये स्तंभ लिहीत राहिला. ध्येयासक्तीची अमीट छाप जगावर सोडून त्याने निरोप घेतला.

Web Title: Today's Editorial, Mikhail Gorbachev: Revolutionary Peacemaker Gone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.