भीमा कोरेगावच्या लढ्यातून समता, बंधुतेची प्रेरणा घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 12:32 PM2018-12-31T12:32:49+5:302018-12-31T12:35:45+5:30

भीमा नदीच्या तीरावर असणाऱ्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी एक जानेवारीला भीमसैनिक मोठ्या संख्येने येतात. अन्याय, अत्याचार करणारी विषम व्यवस्था उलथून टाकणाºया लढवय्या सैनिकांचे स्मरण यानिमित्ताने केले जाते. यंदा या लढ्याला २०१ वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक लढ्याच्या शौैर्याचे स्मरण करून सर्वांनीच सामाजिक सलोखा जपावा. बंधुभाव कायम ठेवावा. समतावादी समाजव्यवस्था निर्माण करण्याची प्रेरणा घ्यावी...

take the inspiration of equality, fertility from koregaon bhima fight | भीमा कोरेगावच्या लढ्यातून समता, बंधुतेची प्रेरणा घ्या!

भीमा कोरेगावच्या लढ्यातून समता, बंधुतेची प्रेरणा घ्या!

Next

धनाजी कांबळे

‘जगाला युद्ध नको, बुद्ध हवा’ म्हणण्याची वेळ आली आहे. इतिहासात वर्ण, वर्ग आणि जातवर्चस्वातून अनेक युद्धे झालेली आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा लढाऊ इतिहास सर्वांच्या डोळ्यांसमोर आहे. विषम व्यवस्थेच्या विरोधात विद्रोह करणाऱ्या माणसांचा देशाला इतिहास आहे. पेशवाईच्या काळात देखील अमानुष व्यवहाराच्या विरोधातील खदखद होती. ती १८१७ मध्ये बाहेर आली. त्यातूनच ३१ डिसेंबर १८१७ मध्ये दुसरा बाजीराव पेशवा व इंग्रज यांच्यात घनघोर लढाई झाली. १ जानेवारी १८१८ रोजी या युद्धाचा शेवट झाला. पेशव्यांचा पराभव झाला. दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या नेतृत्वाखाली ३० हजार सैन्य होते, तर इंग्रज सैन्याचे नेतृत्व कॅप्टन स्टॉटन करीत होता. त्याच्याकडे अवघे ५०० महार शूर सैनिक व ३०० इंग्रज सैनिक असे एकूण ८०० सैनिक होते. ५०० शूर महार सैनिकांनी पेशव्यांच्या सैनिकांचा पराभव करून इतिहास घडविला. या लढाईत जसे पूर्वाश्रमीचे अस्पृश्य होते, तसेच मराठा, धनगर, ओबीसी समाजाचे लोकदेखील होते. कोरेगाव भीमाची लढाई पेशवे विरुद्ध इंग्रज अशी असली, तरी महार सैनिकांनी पेशव्यांच्या अन्याय, अत्याचारी, वर्णव्यवस्थेच्या विरोधात लढलेले ते सामाजिक क्रांतीचे युद्धच होते. पेशवाईत अस्पृश्य समाजाला दिल्या जाणाऱ्या अमानवी, हीन वागणुकीमुळे महार सैनिकांनी जिवाची बाजी लावून पेशव्यांच्या ३० हजारांहून अधिक सैनिकांचा पराभव केला. यात अनेक सैनिक मारले गेले, तर काही सैनिक शरण आले होते. आपल्या समाजबांधवांना अमानुष वागणूक देणाऱ्या पेशवाईतून समाजमुक्त करण्यासाठी महार सैनिकांनी आपल्यापेक्षा साठपटीने अधिक असलेल्या सैनिकांना धूळ चारली. 

शूर महार सैनिकांचा पराक्रम पाहून तत्कालीन इंग्रज अधिकारी आश्चर्यचकित झाले. कारण त्यांना अनपेक्षित विजय मिळाला होता. ८०० सैन्यांनी पेशव्यांच्या ३० हजार सैनिकांवर विजय मिळविणे ही  इंग्रजांसाठी  ऐतिहासिक घटना होती. या युद्धात २३ महार सैनिक धारातीर्थी पडले. या युद्धाची आठवण राहावी तसेच युद्धात वीरमरण आलेल्या सैनिकांचे स्मरण व्हावे यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने बहुजन समाजाचे लोक  कोरेगाव भीमा येथे येतात. युद्ध केवळ संख्येवर लढले जात नाही, तर ते शौर्यावरच लढले आणि जिंकले जाते, हाच संदेश या युद्धाने जगाला दिला आहे. या युद्धात पहिली गोळी ज्या ठिकाणी झाडली गेली, त्या ऐतिहासिक ठिकाणी २६ मार्च १८२१ रोजी ब्रिटिश कंपनी सरकारने विजयस्तंभाची पायाभरणी केली. १८२२ रोजी त्याचे काम पूर्ण झाले. हा विजयस्तंभ पुणे-अहमदनगर रस्त्यावर कोरेगाव भीमा येथे पेरणे गावाच्या हद्दीत आहे. भीमा नदीच्या काठावर ३३ बाय ३३ फूट चौथऱ्यावर काळ्या दगडात ७५ फूट उंचीचा स्तंभ उभारून त्यावर युद्धात वीरमरण आलेल्या सैनिकांची नावे कोरली आहेत. शौर्याचा इतिहास जागृत ठेवण्यासाठी ब्रिटिश सैन्य व आताचे भारतीय सैन्य १ जानेवारीला मानवंदना देण्यासाठी या ठिकाणी येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर १ जानेवारीला या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी आले होते. त्यावेळी शूर महार सैनिकांचे शौर्य बघून ते म्हणाले होते, ‘‘मी महार लोकांचा अतिशय ऋणी आहे. महार लोकांच्या बळावर मी हे करू शकलो. हा माझा ३० वर्षांचा अनुभव आहे,महार रणशूर आहेत. लढू शकतात, त्याग करू शकतात. त्यामुळे माझ्या दृष्टीने त्यांचे अनेक उपकार आहेत. मी येथे जातिवाचक शब्द उच्चारतो, असा काही लोक आरोप करतील, पण मी या जातीत जन्मलो, याचा मला अभिमान आहे.’’ महार सैनिकांच्या शौर्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवंदना देऊन आपल्याला शौर्यशाली जातीचा अभिमान असल्याचे सांगितले होते. १९२७ मध्ये बाबासाहेब यांनी १०९ व्या वर्धापनदिनी कोरेगाव भीमाला भेट दिली होती.
 
विजयस्तंभाचा हा गौरवशाली इतिहास बहुजन समाजाच्या लढाईची प्रेरणा आहे. त्यामुळे जुलमी व्यवस्थेविरुद्ध आवाज उठविण्याचे बळ मिळावे याची प्रेरणा इथूनच घेतली जाते. समाज निकोप आणि सुदृढ होण्यासाठी प्रस्थापित समाजव्यवस्थेमध्ये तथागत गौैतम बुद्ध, छत्रपती शिवाजीमहाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहूमहाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची पेरणी करण्याची आवश्यकता आहे. १८१७-१८ मध्ये झालेल्या युद्धाचा इतिहास पाहिल्यास अन्याय, अत्याचार करणाऱ्या व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवणारी लढाऊ बाण्याची माणसे तेव्हाही होती आणि आजही आहेत. मात्र, आजची परिस्थिती काही प्रमाणात बदलेली आहे. आजही स्वतंत्र भारतात जातीच्या आणि धर्माच्या नावाने माणसाचा द्वेष केला जात आहे. हा द्वेष नष्ट होऊन माणसाला माणूस म्हणून जगण्याचा संविधानाने अधिकार दिला आहे, याचे सर्वांनीच भान ठेवण्याची गरज आहे. समाजात समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय प्रस्थापित होण्यासाठी सक्रिय सहभाग दिला पाहिजे. आता २१ व्या शतकात शारीरिक लढाईची गरज नाही. आता वैचारिक आणि तात्त्विक लढाई महत्त्वाची आहे. त्यामुळेच तत्त्वाशी प्रामाणिक राहून वैचारिक लढाईसाठी प्रबुद्ध व्हा, हीच या लढ्यातील शूरवीरांना आदरांजली ठरेल. या शौैर्यदिनी नवीन वर्षाची नवी पहाट यानिमित्ताने बहुजनांच्या आयुष्यात यावी हीच अपेक्षा!
 

Web Title: take the inspiration of equality, fertility from koregaon bhima fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.