‘प्रयोग’ही आणि मोठी बचतही! 

By Karan Darda | Published: September 23, 2021 10:59 AM2021-09-23T10:59:29+5:302021-09-23T10:59:43+5:30

ही कहाणी सध्या जगभरात चर्चेची ठरली आहे; ...'याच' तंत्रज्ञानाचा फायदा घेते ब्रिटनच्या एका महिलेनं ‘ऑनलाइन बाळ’ ईर्फ ‘ई-बेबी’ जन्माला घातलं आहे. 

Stephanie gives birth to 'online baby'! ‘Experiment’ and big savings too! | ‘प्रयोग’ही आणि मोठी बचतही! 

‘प्रयोग’ही आणि मोठी बचतही! 

googlenewsNext

तंत्रज्ञानानं अख्या जगाला हादरे द्यायची सुरुवात कधीच केली आहे. या तंत्रज्ञानानं कौटुंबिक व्यवस्थेचा तर ढाचाच जणू मुळापासून बदलायला घेतला आहे. तुम्हाला मूल हवं असेल, तर  जोडीदाराची गरज नाही, नवरा नको,  बायको नको.. आपल्या स्वत:च्या गर्भातही बाळाला वाढवण्याची गरज नाही.. इतके मोठमोठे टप्पे तंत्रज्ञानानं अल्पावधीतच पार पाडले! 

हे तंत्रज्ञान कुटुंबव्यवस्थेसाठी, त्या त्या व्यक्तीसाठी, त्याच्या स्वातंत्र्याच्या अधिकारासाठी उपयोगी की घातक, ते ‘नैतिक’ की ‘अनैतिक’ हे त्या - त्या व्यक्तीवर आणि कुठल्या चष्म्यातून आपण त्याकडे पाहतोय त्यावर अवलंबून.. पण या क्षेत्रातले बदल खरोखरच ‘क्रांतिकारक’ म्हणावेत असेच... याच तंत्रज्ञानाचा फायदा घेते ब्रिटनच्या एका महिलेनं ‘ऑनलाइन बाळ’ ईर्फ ‘ई-बेबी’ जन्माला घातलं आहे. 

ही कहाणी सध्या जगभरात चर्चेची ठरली आहे. ब्रिटनमधील ननथॉर्प येथील स्टेफनी टेलर ही ३३ वर्षीय महिला. तिचं  लग्न झालेलं आहे. तिला फ्रँकी नावाचा पाच वर्षांचा एक मुलगाही आहे. पण नवरा-बायकोचं एकमेकांशी पटत नसल्यानं दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आधीचा एक मुलगा असला तरी आपल्याला आणखी एक मूल व्हावं, असं स्टेफनीला खूप मनापासून वाटत होतं, पण त्यासाठी तिला ना पुन्हा कुठल्या बंधनात अडकायचं होतं, ना दुसरं लग्न करायचं होतं, ना तिला दुसरा कोणी जोडीदार हवा होता.

काय करावं याचा बरेच दिवस तिनं विचार केला. ‘प्रायव्हेट फर्टिलिटी क्लिनिक्स’मध्येही बऱ्याच ठिकाणी तिनं चौकशी केली, पण त्यासाठीची फी ऐकूनच तिचं धाबं दणाणलं. एवढे पैसे खर्च करणं तिला शक्यच नव्हतं. त्यामुळे दुसऱ्या मुलाचं आपलं स्वप्न केवळ स्वप्नच राहील, असं तिला वाटायला लागलं. पण तिनं हार मानली नाही. ‘स्वस्त आणि सुरक्षित’पणे आपल्याला आई कसं होता येईल, यासाठीचं ऑनलाइन संशोधन तिनं सुरूच ठेवलं. 

बरीच शोधाशोध केल्यानंतर नेटवर तिला ‘जस्ट अ बेबी ॲप’चा शोध लागला. तिथे एक स्पर्म डोनरही तिला सापडला. त्याच्याशी ऑनलाइन संवाद साधून त्याच्याकडून तिनं स्पर्म मागवलं. काही आठवड्यात हा डोनर स्वत:च तिच्या घरी येऊन तिला स्पर्म देऊन गेला. पण आता पुढे काय? पुरुषाच्या या वीर्याचं गर्भात रोपण कसं करायचं? कारण त्यासाठी कुठल्या फर्टिलिटी क्लिनिकमध्ये जाऊन पैसे खर्च करण्याची तिची तयारी नव्हती. पण स्पर्म मिळाल्यानंतर काय करायचं याचा अभ्यास तिनं आधीच करून ठेवला होता. अनेक यूट्यूब व्हिडिओ बारकाईनं पाहिले होते. स्पर्मचं गर्भाशयात रोपण कसं करायचं हे शिकून घेतलं होतं. 

स्पर्म डोनर शोधल्यानंतर स्टेफनीनं ‘इनसेमिनेशन’ (गर्भाधान) किटही ऑनलाइन मागवून ठेवलं होतं. ‘डीआयवाय’ (डू इट युवरसेल्फ) करून या स्पर्मचं तिनं स्वत:च ‘घरच्या घरी’ रोपणही केलं! आश्चर्याची गोष्ट म्हणजे काही वेळा पहिला प्रयत्न फेल जातो, पण पहिल्याच प्रयत्नात तिनं स्पर्मचं यशस्वी रोपण केलं आणि ‘हेल्दी’ बाळाला जन्म दिला. आपल्या मुलीचं नाव तिनं एडन असं ठेवलं आहे. 

स्टेफनी म्हणते, मी पुन्हा आई बनले, हे केवळ स्वप्नच नाही, तर एक मोठं आश्चर्य आहे. तंत्रज्ञानाची मदत नसती तर मी पुन्हा आई बनू शकले नसते. स्फेटनीनं गेल्या वर्षी जानेवारीमध्ये डोनरकडून स्पर्म घेतलं होतं. त्यानंतर १५ ऑक्टोबरला तिनं बाळाला जन्म दिला. स्पर्म डोनरला मेसेज करून तिनं ही आनंदाची बातमी कळवली. स्पर्म डोनरला आपलं नाव गुप्त ठेवायचं असून, स्टेफनीला भविष्यात पुन्हा स्पर्मची गरज पडली तर ते देण्यास मी तयार आहे, असं म्हटलं आहे.

स्टेफनीच्या आई आणि बहिणीलाही घरात नवं बाळ आल्यामुळे खूप आनंद झाला आहे, पण त्यासाठी स्टेफनीनं जे - जे ‘प्रयोग’ केले, ते मात्र तिच्या वडिलांच्या डोक्यात शिरले नाहीत. नंतर मात्र त्यांनीही ‘ब्रिलिअन्ट डिसिजन’ म्हणून स्टेफनीचं कौतुक केलं. 

ही संपूर्ण घटना आता सोशल मीडियावर खूपच मोठ्या प्रमाणावर व्हायरल होते आहे आणि यूजर्स स्टेफनीचं कौतुकही करीत आहेत. एकटीनं ‘ऑनलाइन बेबी’ जन्माला घालण्याचं तिचं धाडस खरंच आगळंवेगळं आहे. मुख्य म्हणजे इतकं ‘डीआयवाय’ करूनही एक दिवसही तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागलं नाही! याबद्दलही आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. स्टेफनीनं अम्हाला नवा मार्ग दाखवला, असं अनेक युजर्सचं म्हणणं आहे. 

‘प्रयोग’ही आणि मोठी बचतही! 
स्टेफनीनं दुसरं मूल जन्माला घालण्याचा निर्णय घेतला, याचं कारण आपला पहिला मुलगा फ्रँक एकटा पडू नये, असं तिला वाटत होतं. दुसरं लग्न करून मुलाच्या मनावर काही विपरीत परिणाम व्हावा, असंही तिला वाटत नव्हतं. त्यामुळे कुठल्याही ‘अनहॅपी रिलेशनशिप’पासून दूर राहण्याचा निर्णय तिनं घेतला. आपली फॅमिली ‘कम्प्लिट’ हवी असं तिला वाटत होतं. ‘फर्टिलिटी क्लिनिक’मध्ये तिनं गर्भधारणा केली असती, तर त्यासाठी १६०० पाऊंड्स (सुमारे १.६१ लाख रुपये) तिला लागले असते, हा प्रयोग करून हे पैसेही तिनं वाचवले!
 

Web Title: Stephanie gives birth to 'online baby'! ‘Experiment’ and big savings too!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.