विशेष लेख: विरोधकांना हरवू नका, सत्तेच्या गाडीत बसवा!

By यदू जोशी | Updated: November 14, 2025 11:03 IST2025-11-14T11:03:12+5:302025-11-14T11:03:39+5:30

Maharashtra BJP News: शत्रू संपवायचे तर सर्वोत्तम उपाय म्हणजे त्यांना मित्र करणे. भाजप आणि त्याचे दोन मित्रपक्ष सध्या तेच करत आहेत. विरोधकांनाच ते सत्तेच्या गाडीत बसवत आहेत.

Special Article: Don't defeat your opponents, put them in the car of power! | विशेष लेख: विरोधकांना हरवू नका, सत्तेच्या गाडीत बसवा!

विशेष लेख: विरोधकांना हरवू नका, सत्तेच्या गाडीत बसवा!

- यदु जोशी
(राजकीय संपादक, लोकमत)

विधानसभा निवडणुकीत महायुतीला एकत्रित मते मिळाली होती ३ कोटी १८ लाख ४९ हजार ४०५, तर महाविकास आघाडीला मते मिळाली होती २ कोटी २७ लाख १० हजार २२०. याचा अर्थ महायुतीला महाविकास आघाडीपेक्षा ९१ लाख ३९,१८५ मते अधिक मिळाली होती. आता हाही फरक राहू नये म्हणून विरोधात लढले त्यांना आपल्यात घ्या असा नवीन फॉर्म्युला आणला गेला आहे. 

डोंबिवलीचे आमदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात उद्धवसेनेकडून विधानसभा लढलेल्या दीपेश म्हात्रेंच्या हातात परवा कमळ दिले गेले. नाशिकच्या चांदवडमध्ये भाजपचे आमदार राहुल आहेर यांच्याविरोधात लढलेले काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल यांना भाजपमध्ये ओढले गेले. नाशिक पूर्वमध्ये भाजपचे आमदार आहेत राहुल ढिकले. त्यांच्याविरोधात शरद पवार गटाकडून विधानसभा लढलेले गणेश गिते अलीकडे भाजपमध्ये गेले. नाशिक पश्चिमच्या भाजप आमदार सीमा हिरेंविरुद्ध लढलेले उद्धवसेनेचे सुधाकर बडगुजर यांना हिरेंच्या मनाविरुद्ध भाजपमध्ये आणले गेले. 

मुरबाडचे दिग्गज आमदार किसन कथोरे यांनी त्यांच्या विरोधात गेल्यावेळी लढून १ लाख २७ हजार मते घेतलेले सुभाष पवार यांनाच गुरुवारी भाजपमध्ये आणले. जळगावमध्ये भाजपचे आमदार आहेत सुरेश भोळे. त्यांच्याविरोधात विधानसभा लढलेल्या जयश्री महाजनही कमळाची शेती करू लागल्या आहेत. शिंदेसेना, अजित पवार गट हेही हाच फंडा ‘कॉपी-पेस्ट’ करत आहेत. ‘विरोधकांना जिंकायचे असेल तर त्यांना मित्र करा’ असा हा फंडा आहे. नगरपालिकेपासून त्याची सुरुवात झाली आहे, महापालिकेपर्यंत तो चालू राहील. 

भाजपची भूक मोठी आहे; लहान लहान जिवांना तो पोटात घेत राहील. आमदारकीच्या उमेदवारांबाबतच नाही तर स्थानिक पातळीवरील नेत्यांना आपल्यात घेत विरोधक शिल्लकच न ठेवण्याची महायुतीतील तीन पक्षांमध्ये स्पर्धा लागली आहे. विरोधकांना आपली ओळख देऊन त्यांची राजकीय प्लास्टिक सर्जरी करायची आणि आपला मतटक्का वाढवायचा असा हा प्रयोग आहे. विरोधात लढले त्यांना हायर करा, अशी ही नवीन नोकरभरती भाजप व मित्रांनी सुरू केली आहे. विरोधकांना हरवायची गरजच पडू नये, त्यांना भाजपमध्ये डाऊनलोड करण्यावर मोठा भर दिला जात आहे. मतांची गणिती फेरफार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आधीच पडझड झालेल्या महाविकास आघाडीला आणखी फटके बसत आहेत. नंबर गेममध्ये आपण कुठेही कमी पडता कामा नये याची पुरेपूर काळजी घेत निवडणुकीआधीच विरोधांना हरविण्याची नवीन शक्कल लढविली गेली आहे. 

बावनकुळे का परतले?
चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष असताना लोकसभा, विधानसभा निवडणूक झाली, मात्र तेव्हा पक्षाने वेगळे राज्य निवडणूक प्रमुख नेमले नव्हते. बावनकुळे यांच्याकडेच ती जबाबदारी होती. रवींद्र चव्हाण नऊ महिन्यांपूर्वी प्रदेश कार्याध्यक्ष तर पाच महिन्यांपूर्वी प्रदेशाध्यक्ष झाले, तरीही परवा पक्षाने बावनकुळे यांना राज्य निवडणूक प्रमुख नेमले. काहीजण म्हणतात की चव्हाण हे प्रदेशाध्यक्ष म्हणून पूर्ण पकड न मिळवू शकल्याने बावनकुळेंवर निवडणुकीची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोपविली. भाजपच्या फुलाला दोन माळी दिले तर शेती चांगली फुलेल असे वरच्या नेत्यांनाही वाटले असावे. तसेही बावनकुळे प्रदेशाध्यक्षपदावरून गेले तरी पक्षात लक्ष घालतच होते. पायाला भिंगरी लावून फिरणारे, शेवटच्या कार्यकर्त्यांशी बोलणारे बावनकुळे आणि त्या तुलनेने थोडे शहरी, थोडे रिझर्व्हड् असे चव्हाण यांच्यात कार्यकर्ते, पदाधिकारी तुलना  करत राहिले. बावनकुळेंचा हात मोकळा, त्यांनी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत कोणाला काही कमी पडू दिले नाही. त्यांच्या या स्वभावामुळेही त्यांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पक्षाच्या केंद्रस्थानी ठेवावे, असा एक सूर होताच. त्यातच तीन वर्षांत बावनकुळेंची म्हणून  माणसे पक्षात तयार झाली. त्यांची मते जाणून घेऊन वरच्यांनी बावनकुळेंना निवडणूक प्रमुख केले असे नाही, पण अशा मतांचा आवाज मोठा झाला की तो आपोआपच वरच्यांपर्यंत पोहोचतो. पक्षसंघटनेशी असलेली नाळ तुटू न देणे ही बाबही बावनकुळेंच्या पथ्यावर पडली. दर मंगळवारी प्रदेश कार्यालयात न चुकता घेतलेल्या जनता दरबाराने ही नाळ तुटू न देण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. 
चव्हाण मेहनती आहेत, धडाकेबाज आहेत, डेअरिंगबाजही आहेत, पण स्थानिक स्वराज्यसाठी पक्षसंघटनेचा रथ ते एकट्याने ओढू शकतील का अशी शंका पक्षनेतृत्वाला आली असावी आणि त्यातूनच त्यांच्या जोडीला बावनकुळे हा दुसरा घोडा दिला गेला. बावनकुळे ऐकतात सगळ्यांचे, पण कोण्या एका व्यक्तीने त्यांना बांधून जखडून ठेवलेले नाही. चव्हाण यांच्याबाबत काहीवेळा त्याच्या विपरित बोलले जाते. ते खरेच तसे आहेत की त्यांना स्थिरावू न देण्याची इच्छा असलेल्यांनी तशी प्रतिमा तयार केली हा प्रश्नही आहेच. चव्हाण यांची मांड आज तेवढी पक्की दिसत नाही, पण लवकरच ती पक्की होताना दिसेल. रवींद्र चव्हाण मराठा समाजाचे, बावनकुळे ओबीसी. भाजपने निवडणुकीच्या तोंडावर बरोबर मराठा-ओबीसी समीकरण जुळवून आणले आहे.
yadu.joshi@lokmat.com

Web Title : विरोधियों को हराओ मत, सत्ताधारी पार्टी में शामिल करो, लोकमत का कहना है

Web Summary : महाराष्ट्र में सत्तारूढ़ दल प्रतिस्पर्धा को खत्म करने के लिए विरोधियों को शामिल कर रहे हैं, यह रणनीति स्थानीय से नगरपालिका स्तर तक देखी जा रही है। बीजेपी नेता बावनकुले और चव्हाण की भूमिकाओं पर भी चर्चा की गई है।

Web Title : Don't Defeat Opponents, Induct Them Into Ruling Party, Says Lokmat

Web Summary : Ruling parties in Maharashtra are inducting opponents to eliminate competition, a strategy seen from local to municipal levels. BJP leaders Baawanakule and Chavan's roles are also discussed.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.