Songs of hope in industry and business ... | उद्योग व्यवसायात आशेचे गीत...

उद्योग व्यवसायात आशेचे गीत...

- किरण अग्रवाल

अंधार कितीही व्यापून असला तरी त्याची अखेर कुठेतरी उजेडातच होत असते, त्या प्रकाशाची तिरीप जेव्हा चमकून जाते तेव्हा निराशेचे ढग दूर होऊन आशेची पालवी अंकुरून जाणे स्वाभाविक ठरते. कोरोनामुळे एकूणच उद्योग जगतावर आलेले संकट, त्यातून ओढवलेली बेरोजगारी अशा साऱ्या वातावरणात आता ई-कॉमर्स क्षेत्रात सुमारे तीन लाख नोकºया उपलब्ध होऊ घातल्याच्या व अन्य मोठ्या उद्योगात गुंतवणूक वाढत असल्याच्या वृत्ताकडे असेच आशेने पाहता यावे. विशेषत: आगामी दसरा, दिवाळी सणांच्या पार्श्वभूमीवर बाजारातली व मनामनांमध्ये दाटून असलेली भीतीची छाया दूर होण्यास नक्कीच मदत होईल.

कोरोनाच्या संकटाने देशाच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडेच मोडले. अनेक उद्योग, व्यवसायांना घरघर लागली, तर बाजारपेठा मंदावल्या. आता अनलॉक अवस्थेत पुनश्च हरिओम करण्यात आला असला तरी बाजारातील मंदीचे सावट काही हटलेले नाही. विशेषत: कोट्यवधी लोकांच्या हाताचे काम गेले, ते बेरोजगार होऊन घरी बसल्याने त्यांच्यापुढे उदरनिर्वाहाचा व एकूणच भविष्याचा प्रश्न आ वासून उभा आहे. अजूनही अनेक उद्योग पूर्ववत सुरू होऊ शकलेले नाहीत, त्यामुळे आहे ते काम टिकून राहील याची शाश्वती नाही. अशात कुठून तरी वाºयाची एक झुळूक यावी तशी एक वार्ता आली आहे. रेड सिरच्या अहवालानुसार ई-कॉमर्स क्षेत्रातील उद्योग आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या उद्योगवाढीस चालना देण्यासाठी सुमारे तीन लाख लोकांची बंपर भरती करणार असल्याची ही वार्ता आहे. अ‍ॅमेझॉनफ्लिपकार्टसारख्या तसेच लॉजिस्टिक क्षेत्रातील ई-कॉम एक्स्प्रेससारख्या नामवंत व आंतरराष्ट्रीय जाळे असलेल्या कंपन्यांकडून ही भरती केली जाणार असल्याने बेरोजगारीमुळे खचलेल्या मनांवर फुंकर घालणारी ही आशेची झुळूकच म्हणायला हवी.खरे तर, या कोरोनाच्या संकटकाळात ग्राहकांना घरी बसल्या वस्तू पुरवठ्याची सवय लागली आहे. बाहेर मार्केटमध्ये जाऊन गर्दीत संसर्गाचा धोका स्वीकारण्याऐवजी ग्राहक ई-प्लॅटफॉर्मवरून व्यवहार करू लागला आहे, यात ई-कॉमर्स क्षेत्रातील कंपन्यांना सुगीचे दिवस आले आहेत. कोरोनापूर्वी देशात हा व्यवसाय ६ टक्क्यांवर होता, तो आज २४ टक्क्यांवर गेला आहे. इतकेच नव्हे तर, सध्या ४५ बिलियन डॉलर असलेला ई-कॉमर्स बाजार २०२६पर्यंत तब्बल २०० बिलियन डॉलर्सपर्यंत जाण्याची शक्यता आहे. देशात इंटरनेट व स्मार्टफोन वापरकर्त्यांची संख्या मोठी असून, यापुढील काळात ती आणखी वाढणार असल्याने त्याचा परिणामही ई-कॉमर्स उद्योगवाढीवरच होण्याची चिन्हे आहेत. हीच बाब लक्षात घेता कॉन्फेडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्स (कॅट)नेही ई-कॉमर्स पोर्टल भारत या ई-मार्केटला लॉन्च करण्याची तयारी केली आहे. काळाची गरज लक्षात घेता नवीन ई-कॉमर्स धोरण आखतानाच, या व्यवसायाचे संचालन सुरळीत होण्यासाठी एक ई-कॉमर्स नियंत्रण प्राधिकरण स्थापन करण्याची मागणीही कॅटने केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे नुकतीच केली आहे. एकूणच आगामी काळ हा ई-कॉमर्सचा राहणार असून, त्यात मोठ्या प्रमाणात संधी व स्पर्धा राहण्याची चिन्हे आहेत. अर्थात उद्योगांमधील स्पर्धा जेवढी मोठी तेवढी रोजगाराला संधी अधिक, हे गणित लक्षात घेता यातून सकारात्मक परिणाम घडून येण्याची अपेक्षा आहे.

ई-कॉमर्स उद्योग मोठी भरती करणार असल्याच्या वार्तेबरोबरच आणखी एक बातमी याचदरम्यान पुढे आली आहे, ती म्हणजे मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपला नवीन भिडू लाभणार आहे. कोरोनाच्या गेल्या पाच-सहा महिन्यांच्या काळात या ग्रुपला फेसबुक, गुगलसारखे मोठे गुंतवणूकदार मिळालेत, आता अमेझॉन पुढे आले आहे. शिवाय प्रसिद्ध इक्विटी फर्म जनरल अटलांटिकनेही भागीदारीची तयारी दर्शविली आहे. या बलाढ्य कंपन्यांमधील गुंतवणुकीची टक्केवारी व कोट्यवधींचे आकडे पाहता, यापुढील काळात ई-कॉमर्स व रिटेल उद्योगात एक नवीन क्रांतिपर्व आकारास आलेले दिसू शकेल. भारतीय कंपन्या तर त्यादृष्टीने प्रयत्नशील आहेतच, परकीय कंपन्याही गुंतवणुकीला व व्यवसायवाढीला चांगली संधी म्हणून भारतीय बाजारपेठेकडे पहात आहेत, त्यामुळे ग्राहकोपयोगी वस्तू व सेवांसोबतच आरोग्यविषयक सेवांमध्ये नवनवीन संधी उपलब्ध होणार आहेत.

महत्त्वाचे म्हणजे, प्रख्यात टाटा समूहदेखील रिटेल उद्योगात उतरण्यास सज्ज झाला असून, मिंटने याबाबतचे वृत्त दिले आहे. या ग्रुपतर्फे एक डिजिटल सुपरअ‍ॅप्स विकसित केले जात असल्याची माहिती पुढे आली आहे. बहुराष्ट्रीय नेटवर्क असलेली वॉलमार्टसारखी मातब्बर कंपनी २० ते २५ अब्ज डॉलर्सपर्यंत यात गुंतवणूक करणार असल्याचे सांगितले जात असून, बेवरजेस, ज्वेलरी, रिसॉर्ट्स, इलेक्ट्रॉनिक बिल पेमेंट, हेल्थ केअर आदी विविध क्षेत्रात ते उतरणार असल्याचे वृत्त आहे. यासर्वच वार्ता मरगळलेल्या अवस्थेला उभारी देणाºयाच ठराव्यात. येऊ घातलेल्या नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी सणाच्या निमित्ताने त्याचा बिगुल वाजून गेला असून, कोरोनानंतरच्या नकारात्मक मानसिकतेला छेद देऊन आशेचे नवे गीत गायिले गेलेले यातून दिसून येण्याची अपेक्षा आहे. 

Web Title: Songs of hope in industry and business ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.