Solapur vidhansabha election 2019;voting, Politics | नेते जमींपर !
नेते जमींपर !

- सचिन जवळकोटे

कुणी काहीही ठरवू दे.. कुणी कुठंही जाऊ दे...कुणी कसंही बोलू दे...परंतु सोलापूरच्या जनतेनं जे करायचं तेच करून दाखविलं. या जिल्ह्यावर कुण्या एकाच पक्षाचा रुबाब राहणार नाही, हेही दाखवून दिलं. आयाराम-गयाराम इथं चालत नसतात, हेही नीट समजावून सांगितलं...कारण आपल्या सोलापूरचा मतदारराजा लय हुश्शाऽऽर. त्यानं बरोबर ‘नेते जमींपर’ आणून ठेवले.

अण्णा म्हणत होते, ‘हुवा...हुवा’
तब लोग बोले,‘वैसाच हुआ !’

जिल्ह्याच्या इतिहासात जायंट किलर ठरलेल्या ‘सचिनदादां’नी अक्कलकोटमध्ये इतिहास घडविला. ज्या ‘दादां’ना शेवटच्या दिवसांपर्यंत आपल्याला तिकीट मिळेल की नाही याची खात्री नव्हती, त्यांनी चमत्कार घडवून दाखविला. खरंतर ‘सचिनदादां’च्या यशात ‘सिद्धूअण्णा दुधनीकर’ यांचाच मोठा वाटा.
‘कमळ’ हातात घेण्याची इच्छा असल्यानं त्यांनी लोकसभेला ‘हाता’चा प्रचारच न केलेला. त्यानंतर तीन महिने ‘अण्णा जाणारऽऽ जाणार’ सांगत त्यांच्या कार्यकर्त्यांनी कन्नडमध्ये ‘हुवाऽऽ हुवाऽऽ’ अशी कमळाच्या फुलाची स्वत:हूनच हवा केलेली. त्यात पुन्हा शेवटच्या क्षणी त्यांना नाईलाजानं ‘घरवापसी’ करावी लागलेली. या साºयाचा परिपाक म्हणजे पराभूत मानसिकतेतूनच त्यांच्या गटानं निवडणूक लढविलेली. त्यामुळं सारखं ‘हुवाऽऽ हुवाऽऽ’ ऐकून लोकच म्हणाले, ‘अण्णाऽऽ तुम बोले वैसेच हुआ !’ लगाव बत्ती...

अनगरकरां’चं 
वजन अधिकच वाढलं !

मोहोळमध्ये पुन्हा एकदा ‘घड्याळ’ फिरलं. मूळचे भूमिपुत्र ‘माने’ खºया अर्थानं ‘यशवंत’ ठरले. मात्र हा विजय शंभर टक्के ‘अनगर’च्या वाड्याचा. ‘राजन मालकां’चा. एखादा उमेदवार स्वत:साठीही करत नसेल इतकं स्वत:ला झोकून देऊन त्यांनी गावोगावी प्रचार केलेला. ऊन-पाऊस-वारा न पाहता वाड्या-वस्त्या पालथ्या घातलेल्या. यामुळं एक झालं. ‘थोरले काका बारामतीकरां’च्या नजरेत ‘अनगरकरां’चं वजन अधिकच वाढलं.

आर्यन’ फायद्याचा...
‘आर्यन’ तोट्याचा !

बार्शीत व्हायचं तेच घडलं. चिन्ह बदलूनही अपयश पदरी पडलं. ‘दिलीपरावां’च्या चिन्हाची परंपरा जनतेनंच मोडीत काढली. सोबतीला असलेली ‘आंधळकर’ अन् ‘मिरगणे’ जोडगोळीही मताधिक्य खेचण्यात कमी पडली. प्रशासकीय कागदी वाघ प्रत्यक्षातल्या रणांगणावर चालत नसतात. त्यांच्या जीवावर लढायचं नसतं, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. ‘बारा महिने चोवीस तास बंगल्याचे दरवाजे उघडे ठेवून जनतेसोबत राहिलं तरच अंगणात खºया अर्थानं दिवाळी साजरी होते,’ हे ‘राजाभाऊं’नी सिद्ध करून दाखविलं. खरंतर यंदा ‘आर्यन नातू’ तरुणाईच्या प्रचारात खूप मदतीला आला. मात्र ‘आर्यन कारखाना’ दगा देऊन गेला.

अपयशाची मालिका ‘मामां’नी केली खंडित !

विधानसभा अन् लोकसभा अशा दोन्ही निवडणुकीत पराभव स्वीकारणाºया ‘संजयमामां’नी यंदा मात्र अपयशाची ही मालिका खंडित केली. गेली पाच वर्षे अत्यंत शांतपणे माढा-करमाळा पट्ट्यात झेडपीच्या माध्यमातून केलेली कामं त्यांच्या मदतीला धावली. त्यात ‘नारायणआबां’ना मिळालेली सहानुभूती ‘रश्मीदीदीं’साठी घातक ठरली. एकाच घराण्यात दोन भाऊ आमदार झाले. ‘निमगावा’त आज ख-या अर्थानं दिवाळी साजरी झाली. ‘तानाजीरावां’ना ‘धन्यवाद’ची मिठाईही म्हणे कौतुकानं पाठविण्यात आली.

पंढरीत ‘मालक’शाही उलथून टाकली !

‘पंतांच्या पंढरी’त अनाकलनीय धक्क्याचा हा तिसरा महापूर. ‘धाकट्यां’चं अपयश पाच वर्षांपूर्वी सहन करण्याजोगं होतं; मात्र ‘मोठ्यां’चा हा दुसरा पराभव. खुद्द शहरातही पंतांच्या साम्राज्याला सुरूंग लागल्याची आकडेवारी समोर आलेली. हक्काच्या मंदिर परिसरात कमी लीड मिळाला हे जेवढं आश्चर्यकारक, तेवढंच ‘नेहतरावां’सारख्या सहका-यांच्या पट्ट्यातही साडेसातशेची पिछाडी, हेही धक्कादायक. ‘मनीषानगर’सारख्या सुशिक्षित परिसरातही लोकांनी ‘भारतनानां’नाच आपली पसंती द्यावी, हे कशाचं लक्षण ? काळ बदलतोय. पूर्वीची सहनशील पिढी गेली. आता स्वत:चा ‘आत्मसन्मान’ जपणाºया तरुण पिढीचा जमाना आलाय. ‘थोरल्या पंतां’पर्यंत ‘मालकशाही’ ठीक होती; मात्र ‘प्रशांत-उमेश’ तर सोडाच, ‘प्रणव’ही स्वत:ला ‘मालक’ म्हणवत मिरवू लागले, तर जनता जो निर्णय घ्यायचा, तो घेतच असते. यंदा ‘पंतां’च्या वाड्यावर अनेक नेत्यांचा राबता होता. ‘भारतनानां’कडं वजनदार कार्यकर्तेसुद्धा नव्हते. तरीही सर्वसामान्यांसोबत जुळलेली त्यांची नाळ नव्या समीकरणांना जन्म देऊन गेली.

शिंदे’निष्ठ 
घराणं ‘कोठे’ ?

‘सुशीलकुमार’ मुख्यमंत्री असताना ‘उज्ज्वलातार्इं’चा पराभव सुभाषबापूंनी केलेला. तेव्हा त्याचं सारं खापर ‘कोठे’ घराण्यावर फुटलेलं. त्यावेळी हे घराणं अत्यंत कळवळून सांगत होतं की, ‘शिंदे घराण्याच्या पराभवाचा विचार आम्ही या जन्मातदेखील करू शकणार नाही,’ तेव्हाची ती शपथ ‘कोठे’ घराण्यानं यंदा सार्थक केली. ‘प्रणितीतार्इं’च्या विरोधात केवळ ‘दिलीपरावां’चं ‘धनुष्यबाण’ असतं तर थेट लढतीतून ‘हाता’ला नक्कीच धोका निर्माण झाला असता. तेव्हा संकटात सापडलेल्या ‘शिंदे’ घराण्याला वाचविण्यासाठी ‘महेशअण्णां’नी स्वत:ची राजकीय कारकीर्द धोक्यात घातली. जिल्हाप्रमुखपदाची झूल अंगावरून फेकून दिली. ताकद नसतानाही जीवापेक्षा जास्त खिसा रिकामा केला... अन् सर्वांच्या नाकावर टिच्चून ‘प्रणितीतार्इं’ना निवडून आणलं. पंधरा वर्षांपूर्वीचा शब्द पुन्हा एकदा खरा करून दाखविला. साठा उत्तराची कहाणी सफल संपूर्ण. लगाव बत्ती...

(लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)

Web Title: Solapur vidhansabha election 2019;voting, Politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.