Dr. Babasaheb Ambedkar: सामाजिक क्रांती, परिवर्तनाची नांदी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 06:08 AM2021-10-15T06:08:11+5:302021-10-15T06:09:02+5:30

Dr. Babasaheb Ambedkar: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचे चक्र भारतात गतिमान केले. त्यानिमित्त तीन प्रमुख संज्ञांचा विचार करणे आपल्याला क्रमप्राप्त आहे. ‘समाज’, ‘क्रांती’ आणि ‘परिवर्तन’...

Social revolution, the precursor of change | Dr. Babasaheb Ambedkar: सामाजिक क्रांती, परिवर्तनाची नांदी

Dr. Babasaheb Ambedkar: सामाजिक क्रांती, परिवर्तनाची नांदी

Next

- संजय भगत
(लोकमत संदर्भ विभाग, नागपूर)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचे चक्र भारतात गतिमान केले. त्यानिमित्त तीन प्रमुख संज्ञांचा विचार करणे आपल्याला क्रमप्राप्त आहे. ‘समाज’, ‘क्रांती’ आणि ‘परिवर्तन’...
समाज ही संज्ञा लॅटिन भाषेतील ‘सोशियस’ म्हणजे सहचर, सवंगडी यामधून घेतलेली आहे. समाज हा शब्द उच्चारला तरी त्याचा अर्थबोध होतो. स म्हणजे सर्व; संपूर्ण, मा म्हणजे मानव; माणूस, ज म्हणजे जमात; जाती आणि म्हणून ‘समाज’ म्हणजे सर्व मानव जमात होय. वेगळ्य़ा शब्दांत संपूर्ण मानव जातिसमूहाचे रूप ‘समाज.’
‘व्हॉइस ऑफ अमेरिका’ या केंद्रावर भाषण देताना डॉ. आंबेडकर म्हणाले होते, समाज म्हणजे परस्परपूरक अशा मानवाचा संघ होय. ते सर्व परस्परांच्या उपयोगी पडणे, हे कर्तव्य मानतात व त्याचप्रमाणो वागतात, अशा एकात्म लोकांचा संघ म्हणजे समाज. 
क्रांती म्हणजे आमूलाग्र बदल, परिवर्तन, चक्राकार फिरणे होय. क्रांतिकारक बदल म्हणजेच परितर्वन. विषमता हे क्रांतीचे मूळ आहे. विषमतेने आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, बौद्धिक यातील विषम वाटणीच्या स्वरूपातून निर्माण झालेली अन्यायाची भावना क्रांतीबद्दलची मुख्य प्रेरणा असते, असे ॲरिस्टॉटल मानतो, तसेच जुलमी व शोषक वर्गापासून मुक्तता मिळविणे हीसद्धा परिवर्तनामागची प्रेरणा असते. क्रांती यशस्वी होण्याकरिता शिस्तबद्ध व निष्ठावंत क्रांतीच्या अग्रभागी असणे गरजेचे आहे, असे लेनीन मानीत होता. माणूस समप्रवृत्त असून, त्याच्याकडून सौजन्य अपेक्षित आहे. या तत्त्वज्ञानानुसार संपूर्ण क्रांती ही माणसाच्या मन परिवर्तनाने साध्य होऊन ती नवीन समाज निर्माण करेल. भारतीय समाजात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक क्षेत्रात असलेल्या विषमतेत आमूलाग्र बदल घडून प्रत्येक नागरिक स्वतंत्र असेल. अशा क्रांतीला, जयप्रकाश नारायण ‘लोकक्रांती’ म्हणत असत.  
परिवर्तन हे समाजाशी संबंधित आहे. परिवर्तन अचानक होत नाही किंवा तत्काळ दिसून येत नाही, तर एकाकी घडून येते ती क्रांती. समाजाने कधीही विचार केलेला नव्हता, असे बदल क्रांतीमुळे घडून येतात. भारतातसुद्धा फार मोठी क्रांती घडून आली ती म्हणजे बुद्ध धम्म क्रांती. ही क्रांती सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्रांती. ही रक्तविहीन क्रांती होती. बुद्धाने प्रस्थापित वैदिक व्यवस्था नाकारली आणि समतावादी व्यवस्था मांडली. विचाराने क्रांती घडवून आणली. समतेचा विचार, न्यायाचा विचार, बंधुतेचा विचार, स्वातंत्र्याचा विचार दिला. भगवान बुद्ध स्वत: म्हणतात, ‘जगातील गोष्टी अनित्य आहेत.’ समाजजीवनात सतत परिवर्तन होत असते. मात्र, फक्त बाह्यांगात होणारे परिवर्तनच यात अभिप्रेत नाही, तर व्यक्तीच्या मनात, विचारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतातील प्रस्थापित, विषमतेवर आधारित हिंदू समाजव्यवस्थेच्या संरचनेत परिवर्तन हवे होते. म्हणून यासंदर्भात ते म्हणतात, ‘आपली समाजरचना बदलल्याशिवाय प्रगतीच्या मार्गावर तुम्हाला फारसा लाभ होऊ शकणार नाही. भारतात प्रचलित असलेल्या विषमतेवर आधारित समाजव्यवस्थेशी टक्कर घेऊन सामाजिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय सुधारणा केल्यावाचून कोणतीही क्रांती किंवा परिवर्तन या देशात संभवत नाही.’             
 डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रांतीविषयी बोलताना म्हणतात, ‘जगातील कोणतीही गोष्ट अपरिवर्तनशील नाही. कोणतीही वस्तू सनातन नाही. सर्व वस्तूत घडून येणारा बदल म्हणजे व्यक्तीच्या तसेच समाजाच्या जीवनाला मर्यादित करणारा निसर्गाचा नियम आहे. बदलत्या समाजामध्ये जुन्या व कुजलेल्या जीवनमूल्यांत सतत क्रांती घडून यावयास हवी.’ प्रस्थापित व्यवस्था बदलून दुसऱ्या व्यवस्था ज्या विचाराने निर्माण होतात, तो विचार क्रांतिकारी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दृष्टिकोन म्हणजे, ‘नवीन जीवन सुरू होण्यापूर्वी व हृदयाचे ठोके सुरू होण्यापूर्वी जुन्याचा अंमल संपायलाच हवा’ असा आहे. 

Web Title: Social revolution, the precursor of change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app