युवा महोत्सवांना गंभीर प्रश्नांचे वावडे!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 10:55 PM2020-01-21T22:55:07+5:302020-01-21T22:56:19+5:30

सरकारला आपल्या खर्चाने युवकांना मनोरंजनात अडकवून ठेवायचे आहे व सरकारविरोधात गंभीर भूमिका घेण्यापासून परावृत्त करण्याचा हा डाव असल्याची टीका झाली.

serious and crucial questions not raised in youth festivals in goa | युवा महोत्सवांना गंभीर प्रश्नांचे वावडे!

युवा महोत्सवांना गंभीर प्रश्नांचे वावडे!

Next

- राजू नायक

गोव्यात हल्लीच दोन युवा महोत्सव झाले. सरकारला आपल्या खर्चाने युवकांना मनोरंजनात अडकवून ठेवायचे आहे व सरकारविरोधात गंभीर भूमिका घेण्यापासून परावृत्त करण्याचा हा डाव असल्याची टीका झाली.

येथे होणा-या सर्वात मोठय़ा महोत्सवात असेच घडले. सरकारने निधी दिला. परंतु महोत्सवस्थळी म्हादई नदीसंदर्भातील सर्व फलक काढून टाकायला लावले. मुख्यमंत्री येण्यापूर्वी कोणतीही राजकीय संघर्ष दर्शविणारी गोष्ट त्यांना पाहायची नव्हती आणि युवकांनीही हे होऊ दिले. याच युवा महोत्सवात या पूर्वी माजी मुख्यमंत्र्यांना नेहमी काळे बावटे दाखवलेले आहेत. प्रतापसिंग राणे असूद्यात किंवा मनोहर पर्रीकर.. सामाजिक-राजकीय प्रश्नांवर खवळलेल्या युवकांनी त्यांना जाब विचारून त्यांचा जाहीरपणे निषेध नोंदविण्यात कुचराई केलेली नाही.

मनोहर पर्रीकर यांनी भाषा माध्यम प्रश्नावर घूमजाव केल्यानंतर हेच युवक त्यांना प्रखर विरोध करण्यात पुढे होते. पर्रीकरांनी युवकांचा राजकीय कारणासाठी वापर केल्यामुळे युवक भडकणे स्वाभाविकही होते. परंतु गोव्यातील युवक आजच्याइतके शांत व नेमस्त कधीच नव्हते. कारण सध्या देशभर फी वाढ तसेच नागरिकत्व प्रश्नावर युवक रस्त्यावर आले आहेत. प्रत्येक राज्याने त्यात सहभाग दर्शविला आहे. गोव्यात मात्र युवकांची नाराजी फारशी जाणवलेली नाही. गोव्यात म्हादईसारखा प्रश्न गाजतो आहे. त्यात गोव्याच्या अस्तित्वालाच आव्हान दिलेले आहे. शिवाय बेरोजगारी, विद्यापीठातील राजकीय हस्तक्षेप, लैंगिक अत्याचार, विद्यापीठात सतत होणारा हिंसाचार आदी प्रश्न आहेत. परंतु युवक त्यावर आक्रंदन करतोय असे घडलेले नाही.

युवा महोत्सवात केवळ ढोल-ताशे वाजविण्यात व नाचण्यात बहुतांश युवा गर्क होते. गंभीर चर्चा सुरू असताना, मुलाखतींचा कार्यक्रम चालला असताना त्यात त्यांना स्वारस्य दिसले नाही. असे गंभीर कार्यक्रम चालू असताना हे युवक सभागृहाबाहेर फिरत होते. कार्यक्रमाच्या समारोपात राजकीय नेते विजय सरदेसाई- जे स्वत: विद्यार्थ्यांचे नेते होते- यांनी तेथील तरुणांच्या डोळ्यांत चांगलेच अंजन घातले. ते म्हणाले : पोलीस आदेश देतात आणि सरकारविरोधी फलक तुम्ही काढून टाकता? हे गोव्याला ग्रासणारे प्रश्न आहेत. त्यात तुमचेही भविष्य दडलेले आहे. तुम्ही अशा ज्वलंत प्रश्नांवर भूमिका घेऊ शकणार नसाल तर हे राज्य तुमच्या हातात राहणार नाही! तुमच्यातूनच भविष्यातील नेते घडले पाहिजेत. त्यातून युवा महोत्सव आपले तेज नष्ट करून निस्तेज होत असल्याचे सत्य सामोरे आले.

अशा युवा महोत्सवांचे स्वरूप आता बदलले पाहिजे. सरकारी अनुदान अशा महोत्सवांसाठी घेऊ नये, अशी प्रतिक्रिया उमटली.
एक प्राध्यापक म्हणाला, मी विद्यार्थ्यांना फुकट पुस्तके वाचायला दिली. ती सोप्या भाषेतील, वाचनीय पुस्तके होती. परंतु कोणीही ती वाचली नाहीत. अशा अनास्थेमुळे विद्यार्थ्यांची विचार करण्याचीही क्षमता खुंटली आहे.

गोवा नेहमी बुद्धिवाद्यांचे केंद्र असल्याचा आव आणतो. परंतु येथील शैक्षणिक संस्थांनीही युवकांमध्ये वैचारिक मंथन घडावे म्हणून फारसे कार्यक्रम राबविलेले नाहीत. राजकीय पक्षांना तर तशी गरजच भासत नाही. राजकीय पक्षांच्या दावणीला बांधलेले युवक काही कठीण प्रश्न विचारताना दिसत नाहीत आणि सरकारने वर्षाकाठी अंदाजे १०० कोटी सांस्कृतिक कार्यक्रमांवर उधळणे सुरू केल्यापासून युवकांमधली चेतनाच मनोरंजनाकडे केंद्रित झाली आहे. दुस-या बाजूला अमली पदार्थ आणि ‘सनबर्न’सारखे महोत्सव आहेतच. युवकांना ते गंभीर प्रश्नांपासून दूर नेऊन नशेत रममाण बनवू लागले आहेत.

 

Web Title: serious and crucial questions not raised in youth festivals in goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा