ऋतु हरविणारे वर्ष!

By वसंत भोसले | Published: December 29, 2019 12:10 AM2019-12-29T00:10:20+5:302019-12-29T00:23:30+5:30

अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला महामंदीचे चटके बसले; पण आपण वाचलो होतो. त्याचे कारणच एका वेगळ्या कृषी संस्कृतीवर जगणारे आपण भारतीय आहोत. यासाठी तिन्ही ऋतू सारखेच आले पाहिजेत. त्यात बिघाड झाला तर काहीतरी गडबड आहे. ती दुरुस्त न करता येण्याजोगी आहे, असे वाटू लागते. २०१९ या वर्षाची कायमची आठवण कशासाठी राहील? तर या ऋतुमान बदलासाठी लक्षात राहील !

Season to lose the season! | ऋतु हरविणारे वर्ष!

ऋतु हरविणारे वर्ष!

googlenewsNext
ठळक मुद्देरविवार विशेष जागर कारण २०१९ हे महापूर, दुष्काळ आणि थंडी गायब होणे यासाठी कायमचे लक्षात राहील. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

- वसंत भोसले

सूर्य मृग नक्षत्रात आला म्हणजे पावसाळा सुरू होतो. चित्रा नक्षत्रात गेला म्हणजे पावसाळा बहुतेक संपतो. म्हणून मृग नक्षत्रापासून हस्त नक्षत्रापर्यंत नऊ नक्षत्रे पावसाची मानलेली आहेत. या नक्षत्रांत आपल्या देशात सर्वत्र पाऊस पडतो. मात्र, दरवर्षी तो सारखाच पडतो, असे नाही. सर्वत्र सारखा पडतो, असेही नाही, तर तो कमी-जास्त पडत असतो. अधिक पडला तर महापुरासारखी संकटे येतात. पडलाच नाही तर दुष्काळाचे संकट ओढवते. त्याचे आगाऊ अनुमान मांडण्याचा प्रयत्न दोन पद्धतीने होतो. हवामान खात्याच्या वैज्ञानिकांच्या अभ्यासातून अंदाज बांधला जातो. तो बऱ्यापैकी खरा येतो. मान्सूनच्या पावसाची सुरुवात मे महिन्याच्या प्रारंभापासूनच दक्षिण अमेरिकेपासून होते. त्याला एकप्रकारचे निम्म्या पृथ्वीचे वातावरण कारणीभूत ठरते. तसा अंदाज बांधणे अवघड आहे, असे सांगितले जाते. त्याहून महत्त्वाचे म्हणजे भारत हा अजूनही कृषिप्रधान आहे, त्याची अर्थव्यवस्था चांगली राहण्यासाठी पर्जन्यमान उत्तम हवे असते. त्यामुळे हवामान खात्याचे पुढील वर्षाचे पर्जन्यमान अंदाज बांधणे महत्त्वाचे ठरते.
२०१९ हे वर्ष नेहमीपेक्षा वेगळे होते. एकविसावे शतक हे तंत्रज्ञानाचे असेल, ज्ञानाला सर्वाधिक महत्त्व येईल, तिसरे महायुद्ध होईल. मात्र, ते प्रदेश जिंकण्यासाठी नाही तर पाण्यासाठी असेल, मानव हा यंत्रयुक्त होईल, पर्यावरणाचा ºहास असाच होत राहिला तर उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे मुख्य तीन ऋतूही बदलतील असे एक ना अनेक विषय विसाव्या शतकाच्या अखेरीस चर्चेत होते. एकविसावे शतक उजाडले. जागतिकीकरणाच्या पातळीवर अर्थकारणाने गती घेतली होती. तंत्रज्ञानाच्या विकासाने माहितीचा महास्फोट होत होता. प्रसारमाध्यमे वेगाने बदलत होती. अशा पार्श्वभूमीवर एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दिवसाचा १ जानेवारी २००० रोजी सूर्योदय झाला. परवा येणाºया १ जानेवारीस या शतकातील दुसºया दशकाचे अखेरचे वर्ष असणार आहे. एकविसाव्या शतकाची चर्चा करीत असतानाच पटापट दोन दशके संपत आली. अखेरचे वर्ष सुरू होईल. या पार्श्वभूमीवर जागतिक वातावरण, हवामान आणि पर्यावरण याचा अधिकच गांभीर्याने विचार चालू झाला आहे.

आपल्या देशावर जागतिक पर्यावरण किंवा बदलाचे दूरगामी परिणाम खूप उशिरा होत असतात, असे आपण मानतो. २००८-०९ या आर्थिक वर्षात आलेली महामंदी खूप कमी परिणाम करून गेली. कारण आपण अजूनही पूर्ण औद्योगिक राष्ट्र बनलेलो नाही. आपण भारतीय कृषक अर्थकारणावर अवलंबून आहोत. अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला महामंदीचे चटके बसले; पण आपण वाचलो होतो. त्याचे कारणच एका वेगळ्या कृषी संस्कृतीवर जगणारे आपण भारतीय नागरिक आहोत. यासाठी प्रमुख तिन्ही ऋतू नियमीतपणे ठरल्यावेळी आले पाहिजेत. त्यात बिघाड झाला तर मात्र काही तरी गडबड आहे. ती दुरुस्त न करता येण्याजोगी आहे, असे वाटू लागते. मला वाटते की, २०१९ या वर्षाची कायमची आठवण कशासाठी राहील? तर या ऋतुमान बदलासाठी ! प्रमुख तीन ऋतूंपैकी हिवाळा हा हरविलेला आहे का? असा प्रश्न पडावा इतकी कमी थंडी यावर्षी आहे. मुळात पाच महिने पाऊस पडत होता. तो मान्सून संपला कधी, परतीचा आला कधी आणि तो अवकाळीमध्ये परिवर्तीत कधी झाला? हे समजतच नव्हते. भरपूर पाऊस झाल्याने येणारा हिवाळा कडक असणार, असे मानले जात होते. नोव्हेंबरअखेरपर्यंत पाऊस होत राहिला. थंडीची सुरुवात झाली आहे, याची चाहूल डिसेंबरच्या मध्यावर लागली. २०२० साल उजाडण्याचा दिवस जवळ आला तरी कडक थंडी नाही. मकर संक्रांती म्हणजे पंधरवड्याने सूर्याचे उत्तरायण सुरू होणार ! थंडी कमी-कमी होत येणार. उन्हाळा सुरू होण्याची चाहूल लागणार ! रब्बी हंगामाची कापणी, मळणी जवळ येणार ! वैशाखीस पंजाबमध्ये गव्हाच्या मळण्या सुरू होतात. तशा यात्रा-जत्रा आणि रब्बी कापणी आपल्याकडेही होते. गहू, हरभरा काढणी होते. उन्हाळी कांद्याची लागवड करण्याची घाई सुरू होते. आंब्याचा बहार फुलू लागतो. फणस, करवंदे, जांभूळ यांची रेलचेल होत असते.

यापैकी अनेक नैसर्गिक प्रक्रियाच थांबल्या आहेत, असे वाटू लागले आहे. महाराष्ट्रात तरी मान्सूनचा पाऊस वेळेवर आला, असे दिसू लागले, पण तो पुरेसा पडलाच नाही. मात्र, त्याचवेळी पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये प्रचंड कोसळत होता. दरवर्षी पडतो त्याच्या दुप्पट त्याचा वेग होता. नद्यांना महापूर आले. कोयनासारख्या मोठ्या धरणांत दहा दिवसांत पन्नास टीएमसी पाणीसाठा झाला होता. जेवढी पाणीसाठवण क्षमता आहे त्याच्याबरोबर दुप्पट पाणी (२१९ टीएमसी) सोडून देण्यात आले. सह्याद्री पर्वतरांगांमध्ये उगम पावणा-या नद्यांवरील प्रत्येक धरणाची ही अवस्था होती. मराठवाड्यात पावसाचा एक थेंब नसतानाही गोदावरी नदीवरील पैठणचे जायकवाडी धरण वेगाने भरून वाहत होते. हा सर्व चमत्कारच होता. पश्चिम महाराष्ट्राचा पूर्व भाग, मराठवाडा, उत्तर कर्नाटक, पश्चिम विदर्भ हा सर्व कोरडा ठणठणीत असताना या नद्यांच्या उगमावर मात्र प्रचंड पाऊस होत होता. बांदा ते पालघरपर्यंतची सातशे किलोमीटरची कोकण किनारपट्टी ओलीचिंब झाली होती. या पट्ट्यातील सर्वच सातही जिल्ह्यांनी पावसाचा विक्रम मोडीत काढत नवा इतिहास नोंदविला. तसे अतिवृष्टीची केंद्रे असलेल्या हरिश्चंद्रगड, लोणावळा, महाबळेश्वर, भाटघर, कोयना खोरे, चांदोली, आंबा, गगनबावडा, दाजीपूर, आंबोली, तिलारी परिरसर आदी ठिकाणी पावसाने नवे विक्रम स्थापन केले. काय घडते आहे? हेच समजत नव्हते. सातारा जिल्ह्यातील सांगली जिल्ह्याच्या सीमेवरील पाथरपूंज या गावच्या परिसरातून वारणा नदीचा उगम होतो. तेथे नऊ हजार मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

सरासरी साडेचार हजार मिलिमीटर पाऊस पडतो. असे अतिवृष्टीसाठी प्रसिद्ध असणाºया प्रत्येक ठिकाणी घडत होते. राधानगरीजवळील दाजीपूर अभयारण्यातून उगम पावणाºया भोगावती नदीच्या पाणलोट क्षेत्रात पाच आॅगस्ट रोजी एका दिवसात चारशे मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सर्व अजब घडत होते. उर्वरित महाराष्ट्र कोरडा ठणठणीत होता. त्याला समजत नव्हते की, नाशिक, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत नेमके होते आहे तरी काय?
या पार्श्वभूमीवर २०१९ या वर्षाकडे पाहिले तर दोनच ऋतूत वर्ष संपले अशीच नोंद करावी लागेल. ही चिंतेची बाब आहे. आपल्या परिसराचे पर्यावरणच (किंवा हवामान म्हणूया.) बदलत चालले आहे का? ते वेगाने बदलते आहे का? त्याचे परिणाम काय होणार आहेत? त्याची २०१९ हे वर्ष झलक होती का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. याचा गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. जेमतेम आठ-पंधरा दिवसांच्या सर्वसाधारण हिवाळ्यानंतर उन्हाळा सुरू होणार आहे, असे दिसते. कोकणात वर्षअखेरला प्रवास करताना अनेक दºया-खोºयात पाण्याचे लोट वाहताना दिसतात. कुंभार्ली घाटातील काही धबधबे आजही कोसळत आहेत. हे सर्वकाही वेगळे आहे. कारण तीन ऋतूंपैकी एकाचे आगमन होऊन प्रस्थापन होऊ नये, ही घटना परिणामकारक असणार आहे. याचा शास्त्रीय पातळीवर अभ्यास करण्याची गरज आहे.

लोकसभा आणि आपल्या राज्यात विधानसभेच्या निवडणुका यात २०१९ या वर्षाचे निम्मे दिवस गेले. केंद्रात नवा इतिहास घडला. काँग्रेसेतर सरकार सत्तेवर येण्याचे चार प्रसंग आले. त्यापैकी आत्ताचे सरकार चौथे आहे. यापूर्वीची सरकारे (जनता पार्टी-१९७७, जनता दल-१९८९ आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी-१९९८) पुन्हा सत्तेवर आली नाहीत. त्यामुळे उत्सुकता या वर्षात होती की, काँग्रेसेतर सरकार पुन्हा कोसळते का? पण ऐतिहासिक नोंद झाली की, भाजपचे सरकार स्पष्ट बहुमताने सत्तेवर आले. त्या पाठोपाठ चार महिन्यांत राज्य विधानसभेची निवडणूक झाली. कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही. भाजप- शिवसेनेची तीन वर्षांची युती तुटली. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीसोबत महाआघाडी करण्याचा निर्णय घेतला. या दोन दूरगामी परिणाम करणाºया घटना याच वर्षात झाल्या आहेत. यासाठीदेखील २०१९ हे वर्ष कायमचे स्मरणात राहणार आहे.

लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या पातळीवर सत्ताकारणाच्या ऐतिहासिक वळणावरही २०१९ च्या वातावरण बदलाची नोंद कोणी गांभीर्याने घेतील असे वाटत नाही. कारण राज्य किंवा केंद्र सरकारला हा विषय काळजी करण्याजोगा आहे, असे वाटतच नाही. अशा बदलत्या वातावरणाचा परिणाम बदलायचा असेल तर त्याची नोंद घ्यावी लागणार आहे. त्यासाठी सरकार असते. आपल्या महाबळेश्वरवर हवामानातील बदलांचा अभ्यास करण्यासाठी पाच वर्षांपूर्वी एक केंद्र स्थापन करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या हवामान खात्यानेच ते सुरू केले आहे.


अत्याधुनिक यंत्रांचा उपयोग करून अभ्यास करणारे ते केंद्र आहे. हवेचा वेग, त्यातील बदल, पावसाचे प्रमाण, त्यातील बदल, आदींचा अभ्यास करण्यात येतो. ३६५ दिवसांपैकी एका क्षणाचीदेखील नोंद चुकविली जात नाही. इतके सूक्ष्म काम करण्यात येत आहे. याची सुरुवात झाली आहे, पण त्यावर अधिक लक्ष द्यायला हवे आहे. त्यासाठी अधिक निधी खर्च केला पाहिजे. तज्ज्ञांचा मोठा वर्ग यासाठी उभा केला पाहिजे. पावसाच्या थेंबाचाही अभ्यास करण्यात येतो. त्या पावसाच्या थेंबात हवेतील प्रदूषणाचा परिणाम किती जाणवतो, याची नोंद घेण्याची यंत्रणादेखील आहे. २०१९ वर्ष हे यासाठी अधिक चिंताजनक वाटते की, प्रमुख तीन ऋतूंपैकी एक ऋतूच गायब होतो आहे. उत्तर भारतातही आता कोठे कडाक्याची थंडी पडू लागली आहे. नागपूरला वर्षअखेरीस थंडीचा जोर वाढला अशा बातम्या येऊ लागल्या आहेत. अशा पार्श्वभूमीवर येणारा उन्हाळा आणि त्यानंतरचा पावसाळा कसा असेल? याची भीतीयुक्त उत्सुकताही आहे. कारण २०१९ हे महापूर,
दुष्काळ आणि थंडी गायब होणे यासाठी
कायमचे लक्षात राहील. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

Web Title: Season to lose the season!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.