पाहुण्यांचा दंगा... ... नव्हे पंगा !

By सचिन जवळकोटे | Published: August 10, 2020 07:58 AM2020-08-10T07:58:18+5:302020-08-10T08:00:03+5:30

लगाव बत्ती...

Riot of guests ... ... not a mess! | पाहुण्यांचा दंगा... ... नव्हे पंगा !

पाहुण्यांचा दंगा... ... नव्हे पंगा !

Next

- सचिन जवळकोटे

संगमनेरचे ‘बाळासाहेब’ अन् अमरावतीच्या ‘यशोमतीताई’ सोलापुरात येऊन म्हणतात, ‘कामं होत नसतील तर दंगा करा’.. त्याचवेळी जिल्ह्याचे ‘पालकत्व’ स्वीकारलेले ‘भरणेमामा’ हळूच बोलून जातात, ‘हातवाले म्हणजे सोलापूरचे पाहुणे’.. आता या दोन डायलॉगमुळे भोळ्या भाबड्या सोलापूरकरांच्या डोक्यात प्रचंड गोंधळ निर्माण झालाय. अगोदरच लॉकडाऊनमध्ये जिल्हा हैराण झालेला असताना महिनाभरापासून ही बाहेरची नवनवीन पाहुणे मंडळी सोलापुरात येऊन ‘वैचारिक दंगा’ घालू लागलीत.

...मग बारामतीकरही पाहुणेच की !

‘जिल्ह्याबाहेरून आलेले नेते म्हणजे सोलापूरचे पाहुणे’ हा ‘भरणेमामां’चा भौगोलिक निकष मान्य केला, तर गेल्या काही दिवसांपासून ‘हेल्थ कम पॉलिटिकल’ दौरा करणारी सारीच नेतेमंडळी मग ठरतात पाहुणे. विशेष म्हणजे आजपर्यंत आलेले हे नेते केवळ सोलापूरकरांच्या तब्येतीची काळजी करण्यासाठी आले होते की प्रत्येकाच्या दौ-याचा मूळ उद्देश वेगळा होता, याचीही कुजबुज कार्यकर्त्यांमध्ये सुरू झालेली.
‘होम मिनिस्टर देशमुख’ बार्शी तालुक्यात जवानाच्या फॅमिलीला भेटण्यासाठी आलेले. ‘थोरले काका बारामतीकर’ विश्वासू सहकारी ‘युन्नूसभाई’ यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन करायला घरी गेलेले. ‘बाळासाहेब’ही निलंग्याकडे चाललेले. जाता-येता या सा-याच मंडळींनी सोलापुरात काही काळ थांबून ‘हेल्थ’विषयी इकडची-तिकडची चर्चा केलेली. आता आलं का लक्षात ?

सोलापूरकरांना ‘दंगा’ शिकवायला लागतो ?

दंगा घालण्याचा सल्ला देणा-या या नेत्यांना कदाचित सोलापूरचा इतिहासच माहीत नसावा. दुधाचं रतीब घातल्यासारखं दर आठवड्याला रस्त्यावर उतरणा-या पूर्वभागातील ‘मास्तुरेंऽऽ’च्या आंदोलनाचं वार्षिक कॅलेंडर त्यांना ठावूक नसावं. खरंतर सोलापूरकरांच्या नसानसात राजकारण भिनलेलं. इथले राजकीय पक्ष तर सोडाच, वारकरी संघटनांमध्येही कसं अस्सल राजकारण खेळलं जातं, हे निराळे वस्तीतल्या इंगळे महाराजांकडून त्यांनी ऐकलं नसावं.
प्रत्येक गोष्टीत आक्रमक असलेल्या सोलापूरकरांची गोची केवळ ‘पालकत्वा’मुळं झालीय. एक नव्हे दोन नव्हे अकरा आमदार देणाºया या जिल्ह्याला तिन्ही वेळा स्थानिक पालकमंत्री मिळू नये, ही जेवढी अवहेलना.. तेवढीच तीन-तीन पक्षांचे चार आमदार असूनही जिल्ह्याबाहेरचं नेतृत्व स्वीकारण्याची वेळ यावी, हीही कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास खचविणारी नवी प्रथा.

सुशीलकुमारांच्या तब्येतीची चर्चा गरजेची होती ?

पंढरपुरात ‘उद्धव’ सरकार अन् सोलापुरात ‘थोरले काका बारामतीकर’ यांना ‘प्रणितीताई’ भेटल्याचा उल्लेख गेल्या ‘लगाव बत्ती’त आल्यानंतर अनेकांचे कान टवकारले गेले. मात्र या कार्यकर्त्यांना कोण सांगणार की, सोलापूरचं भवितव्य ठरविण्यासाठी या नेत्यांना भेटण्याची वेळ ‘ताईं’वर आलेली. केवळ स्थानिक ‘पालकत्व’ नसल्यानं परिस्थितीशी अ‍ॅडजेस्टमेंट करण्याची गरज निर्माण झालेली.
मात्र याच ‘ताई’ त्यांच्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते सोलापुरात आल्यानंतर का नाहीत दिसल्या, या प्रश्नाचंं उत्तर देताना ‘बाळासाहेब संगमनेरकर’ यांनी ‘सुशीलकुमारां’च्या आजारीपणाचा मुद्दा मीडियासमोर नेला. यातून उगाच नवनव्या चर्चांना ऊत आला. सोलापुरात येऊन सोलापूरच्या नेत्याविषयी विनाकारण कमेंट करण्यामागे या बाहेरच्या पाहुण्यांचं नेमकं प्रयोजन काय होतं, हे त्यांनाच माहीत. खरंतर, केवळ ‘रुटीन चेकअप’ असं सांगून हा विषय संपविता आला असता. असो, आता सोलापूरचं नेतृत्वच पाहुण्यांच्या ताब्यात गेलंय ना.

हात’वाल्यांचं ‘बाण’वाल्यांना निमंत्रण..

‘बाण’वाल्यांना ढुंकूनही किंमत न देणाºया ‘भरणेमामां’चा गवगवा झाल्यामुळं ‘हात’वाले सावध झालेले. ‘बाळासाहेब’ अन् ‘यशोमतीतार्इं’च्या दौ-यात त्यांनी म्हणे ‘धनुष्य’वाल्यांना बोलाविलेलं; मात्र ‘पुरुषोत्तम’ दुस-या गावी अडकलेले, तर ‘देगाव’चे जिल्हाप्रमुख ‘गणेश’ हे नाल्यातील मगरीच्या शोधात रमलेले. आता चार तालुक्यांचे हे प्रमुख केवळ गावापुरतेच राहिलेत की काय, असा खोचक सवाल करू नका, म्हणजे मिळविली.  
 ‘हात’वाल्यांनी दाखविलेलं औदार्य पाहून तरी ‘घड्याळ’वाल्यांना उपरती होईल, अशी आशा बाळगायला हरकत नाही; मात्र ‘भरणेमामां’च्या एका गोष्टीचा नक्कीच उल्लेख करावा लागेल. जिथं आपले काही स्थानिक नेते अजूनही घराबाहेर पडायला तयार नाहीत, तिथं हे ‘मामा’ आपलं घरदार-गाव सोडून सोलापुरात येतात अन् इथल्या लोकांच्या तब्येतीची काळजी करतात, हेही तसे थोडके.
  जिल्ह्याला दीड तपानंतर प्रथमच बाहेरचा ‘पालक’ बघावा लागलेला. त्यामुळेच इंदापूरचे नेते सोलापुरात येऊन बाहेरच्या पाहुण्यांचं स्वागत करतात अन् बिच्चारे सोलापूरकर ‘पाहुण्यांचा दंगा’ गुपचूपपणे सहन करतात; कारण ‘पाहुण्यांचा पंगा’ घेण्याची मानसिकता आता कुणातच राहिलेली नसावी. लगाव बत्ती...

( लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)

Web Title: Riot of guests ... ... not a mess!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.