पोलिसांच्या प्रतिष्ठेसाठी सर्वांनीच भान बाळगायला हवे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 04:29 AM2020-09-18T04:29:37+5:302020-09-18T07:35:48+5:30

१९९२ व १९९३ साली मुंबईत झालेल्या दंगली आणि नंतर झालेले भयावह बॉम्बस्फोट या काळात मुंबईकर सुरक्षित राहिले, ते पोलिसांमुळेच.

For the reputation of the police ... | पोलिसांच्या प्रतिष्ठेसाठी सर्वांनीच भान बाळगायला हवे...

पोलिसांच्या प्रतिष्ठेसाठी सर्वांनीच भान बाळगायला हवे...

Next

कोरोनाच्या संकटामुळे मार्चच्या अखेरीपासून लाखो लोकांना घरातच बसून काम करावे लागत आहे, देशभरात कैक कोटी लोकांचा रोजगार गेला आहे. या आजाराचे केवळ आरोग्यावरच नव्हे, तर समाजस्वास्थ्यावर, अर्थव्यवस्थेवर, शिक्षणावर आणि दैनंदिन आयुष्यावर विपरीत परिणाम झाले आहेत. या काळात घरात बसावे लागल्याने लोक चिडले आहेत. मात्र मार्चपासून आजपर्यंत न चुकता रस्त्यांवर उभे राहून रोज आपले कर्तव्य बजावताना पोलिसांची जी बिकट अवस्था झाली आहे, त्याचा आपण फारसा विचार केलेला नाही. जेवणाची तर सोडाच; पण चहा मिळण्याची खात्री नसताना संसर्ग टाळण्यासाठी लोकांनी शारीरिक अंतर पाळावे यासाठी त्यांना आजही उन्हा-पावसात उभे राहावे लागत आहे. त्यामुळे राज्यातील ९७ हजारांपैकी २० हजारांहून अधिक पोलिसांनाच कोरोनाचा संसर्ग झाला आणि २०८ जणांचा तर बळीच गेला.

आतापर्यंत १६ हजार पोलीस बरे झाले असले तरी सर्वांना कामावर येणे अद्याप शक्य नाही. या पार्श्वभूमीवर पोलीस दलात आणखी १२ हजार ५२८ जणांची भरती करण्याचा जो निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, त्याचे स्वागतच करायला हवे. कोरोनाचे संकट किती काळ राहणार, हे सांगणे कठीण आहे. त्यातच कांदा निर्यातबंदीच्या विरोधात आणि मराठा आरक्षणासाठी लोक रस्त्यांवर उतरू लागले आहेत, इतर कारणांसाठीही आंदोलने होऊ लागली आहेत. आंदोलने असोत, अतिवृष्टी वा पूरपरिस्थिती असो वा गुन्हेगारी असो, सर्वांची भिस्त असते ती पोलिसांवरच. त्यामुळे ही पोलीस भरती लवकरात लवकर आणि अतिशय पारदर्शक पद्धतीने व्हायला हवी. अलीकडील काळातील ही सर्वात मोठी भरती आहे.

याआधी आर. आर. पाटील गृहमंत्री असताना मोठी पोलीस भरती झाली होती आणि मुख्य म्हणजे त्यात अजिबात वशिल्याचे तट्टू शिरले नव्हते. आताही सरकारने मंत्री, आमदार, नेते, कार्यकर्ते, अधिकारी यांच्या वशिलापत्रांना वा दबावाला बळी न पडता केवळ गुणवत्तेवर भरती करावी. पदवी, पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण झालेले तरुण आता मिळेल ती नोकरी करायला तयार असतात. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक क्षमता तपासण्याबरोबर पोलीस दलात चांगले शिकलेले तरुण येतील, असा प्रयत्न करायला हवा. पोलिसांना कामाचे आठ तास आणि आठवड्यातून एक दिवस सुटी अशा घोषणा नेहमी होतात आणि अंमलबजावणी मात्र कधीच होत नाही.

या भरतीनंतर तरी ते होईल, अशी अपेक्षा आहे. कामाचा ताण, कित्येक तास काम, जेवणाची आबाळ, त्यामुळे मिळेल ते खाणे, त्यातून रक्तदाब, मधुमेह असे अनेक आजार, स्वत:ची आणि कुटुंबाची हेळसांड, राहायला घर नाही अशा अवस्थेत हजारो पोलीस कर्तव्ये पार पाडतात. त्यांच्याकडून समाजाच्या अपेक्षा प्रचंड असतात आणि सहानुभूती मात्र नसते. त्यामुळेच पोलिसांची बदनामी करण्याचे धाडस मुंबईशी संबंध नसलेली कंगना रानौतसारखी अभिनेत्री करते आणि आपणही गप्प बसून तिचे अप्रत्यक्ष समर्थन करतो. त्यावेळी अशोक कामटे, विजय साळसकर, हेमंत करकरे, तुकाराम ओंबाळे यांचे बलिदानही विसरतो. १९९२ व १९९३ साली मुंबईत झालेल्या दंगली आणि नंतर झालेले भयावह बॉम्बस्फोट या काळात मुंबईकर सुरक्षित राहिले, ते पोलिसांमुळेच.

आपल्याला केवळ संकटे आणि अडचणीच्या वेळीच पोलिसांची आठवण होते आणि एरवी मात्र सर्व पोलीस लाचखोर आहेत, हफ्ते गोळा करतात, अशी सरसकट विधाने आपण करीत राहतो. पोलिसांकडे गुन्हेगार म्हणून पाहण्याची ही वृत्ती भयावह आणि घातक आहे. ही यंत्रणा आपल्यासाठी आहे, तिची प्रतिष्ठा ही आपलीही जबाबदारी आहे, याचे भान सर्वांनीच बाळगायला हवे. तसे केले तरच पोलिसांमधील आत्मविश्वास वाढीस लागेल आणि त्यांची कार्यक्षमताही सुधारेल. पुरेसे मनुष्यबळ असेल तरच हे शक्य होते. त्यामुळे पोलीस भरतीचे स्वागत करताना त्यांचे इतर प्रश्नही सोडविले जातील, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

Web Title: For the reputation of the police ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.