धर्म, पंथ वेगळे असतील; सत्य वेगळे नसते!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 08:56 AM2021-10-28T08:56:40+5:302021-10-28T08:59:19+5:30

हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन या साऱ्या एकाच मूळ वृक्षाच्या फांद्या! विभिन्न पंथ आणि उपासना पद्धती या एकाच मुक्कामाकडे जाणाऱ्या निरनिराळ्या वाटा असतात! 

Religions, sects will be different; The truth is no different! | धर्म, पंथ वेगळे असतील; सत्य वेगळे नसते!

धर्म, पंथ वेगळे असतील; सत्य वेगळे नसते!

Next

- स्वामी रामदेव
(संस्थापक, पतंजली योगपीठ, हरिद्वार)

समाज आणि समाजातील प्रत्येक घटकाचे प्रेमभावनेने  एकत्रितपणे घडलेले आनंदाचे सहअस्तित्व ही प्रत्येक धर्माच्या तत्त्वज्ञानाची पूर्वअट आहे, असे म्हणता येऊ शकेल. सर्व लोकांना मिळून सौहार्दाने वागण्याची दिशा धर्मच देतो. धर्माचे मूळ तत्त्वच ते आहे. निसर्गाचा नियम कुणीही मोडू शकत नाही व त्याचे सर्वांना पालन करावेच लागते. हे नियम सर्वांसाठी सारखेच असतात. सर्व जग देवाने रचलेल्या विधीनुसारच चालते, जगातील सर्व देश त्यांच्या त्यांच्या संविधानानुसारच चालतात, तसेच संपूर्ण समाज हा नैतिक, आध्यात्मिक व मानवी मूल्यांमुळेच मार्गक्रमण करू शकतो. ही मूल्ये शाश्वत असतात, त्या अर्थाने खरा धर्म हा एकच असतो, असे मी मानतो. हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन या साऱ्या एकाच मूळ वृक्षाच्या फांद्या! अनेकानेक पंथ आणि उपासना पद्धती या एकाच मुक्कामाकडे जाणाऱ्या निरनिराळ्या वाटा मात्र असतात! 

खरे तर ‘सर्वधर्मसंमेलन’ नव्हे, तर ‘सर्वपंथसंमेलन’ असे नाव असले पाहिजे. सर्व धर्म नव्हे, सर्व पंथ म्हटले पहिजे. धर्म एकच असतो. तो म्हणजे मानवता, सत्य, न्याय! धर्म वेगळे असूच कसे शकतात? पाण्याचा एक धर्म, आगीचा एक धर्म, वारा, पृथ्वी, सूर्य व चंद्र यांचाही एकच धर्म असतो. त्यामुळे सर्व मानव जातीचा धर्म हा एकच आहे. मानवता हाच खरा धर्म आहे.
मत, पंथ, संप्रदाय वेगळे असू शकतात, परंतु त्यांचे सत्य वेगळे असू शकत नाही. एकत्व हेच सत्य आहे. न्याय, मैत्री हे सत्य आहे. सहअस्तित्व, विश्वबंधुत्व, सौहार्द, एकता, समानता हाच वेद व सर्व धर्मग्रंथांचा उपदेश आहे. संस्कृतीचा एकच संदेश आहे. आपण सर्व एकाच ईश्वराचे पुत्र असून, आपले पूर्वजही समान होते. त्यांची परंपरा व संस्कृती घेऊन आपल्याला एकत्रितपणे पुढे जायचे आहे. भाषा, धर्म, जाती, प्रांतवाद यांच्या उन्मादापासून दूर हटत, आध्यात्मिक राष्ट्रवाद व सात्विक विचारांचा प्रसार करण्याची आवश्यकता आहे. या दृष्टिकोनातूनच देशाचा विकास होईल व खऱ्या अर्थाने धर्माचे काम होईल. असे झाले तरच भारत परत संपूर्ण जगाचे नेतृत्व करण्यास समर्थ होईल व विश्वगुरूपदी विराजमान होईल. 

जगातील समस्त धर्माचार्य एकाच स्वरात म्हणाले की, आम्ही सारे एक आहोत, आपण सगळे एकाच ईश्वराची मुले आहोत, एकाच पृथ्वीमातेचे भक्त आहोत, तर किती चांगले होईल! धर्मगुरूंनी आम्ही सर्वांना हिंदू बनवू, मुस्लीम बनवू, इसाई बनवू, यापेक्षा आम्ही सर्वांना माणूस बनवू, असे म्हटले पाहिजे. 
पण वास्तव तसे नाही. ते बिकट आहे. प्रत्येकाच्या अस्मितेला टोक येते आहे. कोणी म्हणतो ब्राह्मण महान, ओबीसी महान, क्षत्रिय महान, शूद्र महान... हे काय चालले आहे? आपण सारे एक असू, तर एकमेकांशीच भांडण का?
ज्ञान, तंत्रज्ञान, संशोधनाचा वापर मानवाच्या विकासासाठी करणे हा धर्म आहे. ज्ञानाचा उपयोग सर्वांच्या कल्याणासाठी केले पाहिजे, हाच खरा धर्म व अध्यात्म होय! 
तुमच्या विचारात दोष असू नये. तुम्ही किती कुठून शिकलात, कुठून आलात, हे महत्त्वाचे नाही. महत्त्वाचे आहेत ते तुमचे विचार! सर्व सृष्टी देवाच्या विधानाने चालते, देश संविधानाच्या आधाराने चालतो, तर समाज अध्यात्माच्या आधारे चालतो. साधने वेगवेगळी असू शकतात; साध्य वेगळे असू शकत नाही. सर्वात मोठा धर्म म्हणजे आपले कर्म! आपले कर्म पवित्र असावे, यासाठी विवेक आणि भावनेची पवित्रता असावी लागते. हीच धर्माची भाषा आहे. तुमच्या विचारांमध्ये दुर्भावना नको व तुमच्या आचरणात दुर्गुण नको. सद्विचार, सद्भाव व सद्गुणांच्या आधारावरच समाज प्रगती करू शकतो. सम्यक मति, सम्यक भक्ती, सम्यक कृती, सम्यक संस्कृती व सम्यक प्रकृती हेच तर प्रगतीचे आधार आहेत.

कोरोनाने जगाला योगाभ्यासाचे महत्त्व समजले आहे. योगासने केली नाहीत, तर श्वास थांबेल, हे लोकांना आता पटले आहे. जो योगयुक्त असेल, तोच रोगमुक्त जीवन जगू शकेल. योगाच्या शक्तीमुळेच व्यक्ती व्यसन, हिंसा यांच्यापासून दूर राहू शकते. ज्यांच्या जीवनात आध्यात्मिक मूल्यांची प्रतिष्ठापना होते, त्यांना स्वप्नातही नशा करण्याची इच्छा होत नाही. जो नियमित योग करेल, नैराश्य त्याच्या आसपासही फिरकणार नाही. माझे वडील, आजोबा निरक्षर होते; त्यांना हुक्का, तंबाखू यांचे व्यसन होते. मात्र, त्यांना योगसाधनेच्या बळावर मी व्यसन सोडण्यास भाग पाडले. योगाचा जगभरात प्रसार होत असून, याचे सकारात्मक परिणाम जगाच्या पाठीवर सर्वत्र दिसून येत आहेत. योगशक्ती व अध्यात्माच्या बळावर हळूहळू एका सुंदर जगाची पुनर्निर्मिती आपण करू शकू, असा मला विश्वास आहे. एकता, अखंडता, समानता असली, तर देशाच्या चारित्र्यातील महानता निश्चित टिकून राहील.  समानतेचा विचार, सौहार्द याच बाबी देशाला नवीन दिशा देतील. याच मार्गाने भारत परमवैभव प्राप्त करेल, यात तीळमात्रही शंका नाही.

(शब्दांकन : योगेश पांडे, नागपूर)
 

Web Title: Religions, sects will be different; The truth is no different!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.