अग्रलेख - पुलवामाबाबत नापाक पाकिस्तानची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 03:05 AM2020-10-31T03:05:41+5:302020-10-31T07:21:39+5:30

Pakistan : पंतप्रधान इम्रान खान यांचे विश्वासू असलेले चौधरी यांनी असेंब्लीमध्ये जाहीर केले की, काश्मीरमधील पुलवामा येथे भारताच्या राखीव पोलीस दलाच्या तुकडीवर आम्हीच हल्ला केला. भारताला घरात घुसून मारले, अशी वल्गनाही त्यांनी केली. पाक किती नापाक आहे हे त्यांनी स्वत:च जगाला सांगितले आहे.

Pulwama Attack : Pakistan's confession about Pulwama | अग्रलेख - पुलवामाबाबत नापाक पाकिस्तानची कबुली

अग्रलेख - पुलवामाबाबत नापाक पाकिस्तानची कबुली

Next

पोटात असते ते कधी ना कधी ओठावर आल्याशिवाय राहात नाही. पाकिस्तानने अनेक वर्षे पोटात लपवून ठेवलेले वास्तव पाकिस्तानचे तंत्रज्ञान मंत्री चौधरींच्या ओठातून अखेर बाहेर पडलेच. पाकिस्तान आणि दहशतवाद हे समानार्थी शब्द आहेत असे भारत जगाला कळकळीने सांगत होता. पण त्याला जगातून प्रतिसाद मिळत नव्हता. दहशतवादाचा चटका बसला तरी पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र म्हणून घोषित करण्याची तयारी अमेरिकेसह अनेक राष्ट्रे दाखवित नाहीत. राष्ट्रीय स्वार्थ व हितसंबंधाची जपणूक यामुळे पाकला दहशतवादी म्हणणे अडचणीचे ठरत होते. या राष्ट्रांची अडचण आता पाकिस्तानने स्वत:च दूर केली. पंतप्रधान इम्रान खान यांचे विश्वासू असलेले चौधरी यांनी असेंब्लीमध्ये जाहीर केले की, काश्मीरमधील पुलवामा येथे भारताच्या राखीव पोलीस दलाच्या तुकडीवर आम्हीच हल्ला केला. भारताला घरात घुसून मारले, अशी वल्गनाही त्यांनी केली. पाकिस्तानच्या सर्वोच्च सभागृहात हे वक्तव्य केले गेल्याने पाकिस्तानच्या दुष्ट हेतूंबद्दल आतातरी जगाला शंका वाटायला नको. भारताला ती शंका नव्हतीच. पाक किती नापाक आहे हे चौधरींनी जगाला सांगितले आहे. या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे कौतुक केले पाहिजे. त्यांच्या एका वक्तव्यामुळे पाकिस्तानला दोषी ठरविण्याचे ओझे भारताच्या डोक्यावरून उतरले.

चौधरी यांचे हे वक्तव्य पाक सभागृहातील विरोधी पक्षाचे नेते अय्याज सादिक यांना प्रत्युत्तर म्हणून दिलेले होते. भारताकडून मोठा हल्ला होण्याच्या भीतीपोटी भारतीय वायूदलाचे वैमानिक अभिनंदन याची सुटका केली गेली असा गौप्यस्फोट सादिक यांनी केला व भारतीय हल्ल्याची माहिती देताना पाकचे लष्करप्रमुख बाज्वा यांचे पाय थरथरत होते, असे सादिक म्हणाले. भारताने तशी तयारी केली होती अशी माहिती एअर चीफ मार्शल धनोआ यांनीही दिली आहे. आवेशात येऊन भारताच्या विरोधात आततायी कारवाई केल्यानंतर पाकिस्तानचे हातपाय थंड पडतात, असा इतिहास आहे. कारगिलमधील घुसखोरी अंगाशी येणार हे लक्षात आल्यावर क्लिंटन यांच्यासमोर नवाझ शरीफ यांच्या उडालेल्या घाबरगुंडीचा दस्तावेज सीआयएच्या खात्यात उपलब्ध आहे. भारताला डिवचायचे आणि भारताने प्रतिहल्ला केला की जगासमोर रडायचे हे पाकिस्तानचे धोरण आहे. भौगोलिक स्थान, जगातील सत्तास्पर्धा यामुळे पाकिस्तानला युरोप-अमेरिका पाठीशी घालते आणि भारताला परस्पर छळणारा हाताशी असावा म्हणून चीनने पाकिस्तानला मांडलीक करून घेतले आहे.


आर्थिक व राजकीय सार्वभौमत्व गहाण पडले असले तरी भारतद्वेषाने पछाडलेल्या तेथील राज्यकर्त्यांना त्याची फिकीर नाही. ही पछाडलेली मानसिकता चौधरींच्या भाषेत ठळकपणे दिसते. पाकच्या या कबुलीचा भारत कसा उपयोग करून घेतो हे आता महत्त्वाचे आहे. चौधरींच्या उद‌्गारांचा वापर करून घेऊन पाकिस्तानची जास्तीत जास्त आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न भारताकडून होईल असा अंदाज आहे. पाकिस्तानला उघडपणे आर्थिक मदत करणे अन्य देशांना आता कठीण होईल. मात्र छुपी मदत थांबेल असे नव्हे. राष्ट्रीय स्वार्थाचा विषय आला की दहशतवाद हाही गुण ठरतो हे लक्षात घेता पाकच्या कबुलीमुळे जग बदलेल अशा भ्रमात राहण्याचे कारण नाही. देशातील शांततावादी गट व आंतरराष्ट्रीय प्रचाराकडे दुर्लक्ष करून गेली काही वर्षे भारताने पाकिस्तानच्या विरोधात कठोर भूमिका घेतली. बालाकोट व त्याआधीचा सर्जिकल स्ट्राइक याची चेष्टा करण्यापर्यंत काही नेत्यांची मजल गेली असली तरी भारताचे हे कठोर धोरण योग्य होते हे चौधरींच्या कबुलीतून सिद्ध झाले आहे.

शांततेची बोलणी ही समंजस शेजाऱ्याबरोबर शक्य असतात, घरात घुसून मारण्याची भाषा करणाऱ्याबरोबर नाही. भारताची शस्रसज्जता आणि परराष्ट्रीय धोरणाला पाकच्या कबुलीमुळे आधार मिळाला आहे. तरीही जोपर्यंत पाकिस्तानी नेत्यांची व लष्कराची भारतद्वेषी मानसिकता बदलत नाही तोपर्यंत अद्यावत रितीने शस्रसज्ज राहणे ही भारताची गरज आहे. पुलवामासारखे भेकड हल्ले करणे हेच शौर्य असे मानणाऱ्या पाक सत्ताधाऱ्यांचे मनसुबे फोल ठरवायचे असतील तर अत्याधुनिक टेहळणी साधणे, शत्रुपक्षात खोलवर शिरून अचूक माहिती मिळविणारी गुप्तचर यंत्रणा आणि प्रसंग पडल्यास जबर तडाखा देणारी शस्रे यावर भारताला लक्ष केंद्रित करावे लागेल. सीमेच्या दोन्ही बाजूंवर हे करावे लागणार आहे, कारण पाकिस्तानला मदत होईल असे लष्करी उद्योग करण्याची संधी चीन सोडणार नाही. चौधरींच्या कबुलीमुळे आम्ही म्हणालो होतो ते खरे झाले असे म्हणून स्वस्थ बसता येणार नाही. बावचळलेला पाकिस्तान अधिक उपद‌्व्याप करण्याचा धोका आहे.

Web Title: Pulwama Attack : Pakistan's confession about Pulwama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.