Publishers should take the change by taking the change | प्रकाशकांनी बदल स्वीकारून मार्ग काढावा
प्रकाशकांनी बदल स्वीकारून मार्ग काढावा

दिलीप माजगावकर

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने यंदाचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार मला देण्यात आला. यानिमित्ताने प्रकाशकांची आज नेमकी अडचण काय झालीय, याची कल्पना देतो. महागाई, नोटाबंदी, जीएसटी या व्यावहारिक गोष्टींबद्दलही मी बोलणार नाही. याची दोन कारणं - एक म्हणजे हे त्यासाठीचं व्यासपीठ नाही आणि दुसरं म्हणजे अशा स्वरूपाच्या अडचणी सर्वच व्यवसायात कमी-जास्त प्रमाणात येत असतात. ती मंडळी त्यातून मार्ग काढत असतात. तसाच मार्ग आम्हालाही काढावा लागेल.

अगदी अलीकडच्या काळापर्यंत असं म्हणता येईल की, पुस्तक प्रकाशन आणि लेखन-वाचन संस्कृती यांचं नातं एका नाण्याच्या दोन बाजू असाव्यात इतकं घट्ट होतं. पण आता मात्र वेगवेगळ्या दृक्श्राव्य माध्यमांमुळे, इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे पुस्तकांची आणि वाचकांची दुनिया एका विचित्र कोंडीत सापडली आहे. काही काळ का होईना पुस्तकांची विक्री कमी होताना दिसतेय, तर दृक्श्राव्य या माध्यमांचं आकर्षण वेगानं वाढताना दिसतंय. ई-बुक आणि ऑडिओ बुक ही अशा बदलाची दोन ठळक उदाहरणं आहेत. या बदलांकडे आम्ही कसं पाहतो, ते कसे आत्मसात करतो, नव्या तंत्रज्ञानाशी कसं जमवून घेतो, यावर आमचा पुढचा प्रवास ठरणार आहे.

आज मराठीपुरतं बोलायचं तर ई-बुक्स, ऑडिओ बुक्स यांचा प्रसार मर्यादित असला; तरी नजीकच्या काळात तो निश्चित वाढणार आहे. छापील पुस्तकांना हे पर्याय असणार आहेत. त्याच्याशी स्पर्धा न करता त्याच्याशी जमवून घेणं, तिथल्या केवळ तंत्रज्ञानापुरत्याच नाहीत, तर विषय, आशय आणि तो सादर करण्याच्या पद्धती याविषयीच्या गरजा पूर्ण करणारी यंत्रणा उभी करणं हे आवश्यक होणार आहे. मग त्यासाठीचे विषय असतील, लेखक असतील, लेखनशैली असेल, त्याचं लेखनशास्त्र असेल - हे शिकून घ्यावं लागेल. तसे लेखक शोधावे लागतील, संपादक शोधावे लागतील. हे एका अर्थी छापील पुस्तकांना समांतर जाणारं माध्यम असणार आहे. तरीही यापुढच्या काळात छापील पुस्तकांचं महत्त्वही कमी होणार नाही. आज जगभरचे पाहणी अहवाल हेच सांगतात. पण यापुढे केवळ छापील पुस्तकांवर अवलंबून राहता येणार नाही, त्याला या नव्या माध्यमांची जोड द्यावी लागणार आहे. प्रश्न असा आहे, की हे भोवताली जे बदल होताहेत त्याचा वेग इतका प्रचंड आहे, की त्याच्याशी जमवून घेताना आमची दमछाक होतेय. पण यावर आम्हालाच तोडगा काढावा लागणार आहे. या गोष्टीची प्रकाशकांना कल्पना नाही, असं मी म्हणणार नाही; पण यापुढे हे काम अधिक वेगानं हाती घ्यावं लागेल. तसा उशीर झालाच आहे, तो अधिक होऊन चालणार नाही.

या जोडीला अजून एक गोष्ट आम्हाला करता येणं शक्य आहे - ती म्हणजे ही आधुनिक माध्यमं आत्मसात करून आजवरच्या वाङ्मयीन वाटचालीचा सांधा नव्या युगाशी कसा जोडून घ्यायचा, हा विचार करावा लागेल. यात आम्ही नव्या माध्यमातून नवी पुस्तकं, नवे विषय, नवे लेखक हे तर पोहोचवणं अपेक्षित आहेच; पण आजवर जी अभिजात पुस्तकं मराठीत प्रकाशित झाली, तीही जगभर पसरलेल्या मराठी वाचकवर्गापर्यंत न्यायला हवीत. उदाहरणच द्यायचं तर लक्ष्मीबाई टिळक यांचं ‘स्मृतिचित्रं’ हे पुस्तक ऑडिओ स्वरूपात आकर्षक वाचनातून वाचकांपर्यंत गेलं; तर कोणीही ते ऐकू, वाचू शकेल. पुढच्या वर्षी लोकमान्यांची स्मृतिशताब्दी आहे. न. चिं. केळकरांनी तीन खंडांत टिळकचरित्र लिहिलं आहे. योग्य संपादन आणि आकर्षक वाचनातून ते सादर करणं सहज शक्य आहे. अशी अगदी ५० पुस्तकं आपण सादर केली, तरी वाचन संस्कृतीसाठी ते मोठं काम होऊ शकेल.

आज जगभरातून छापील पुस्तकं प्रकाशित होत असताना, त्याचवेळी त्यांच्या ई-आवृत्त्याही प्रकाशित होत असतात. त्या स्वस्त असतात, त्यात ओझं बाळगायचं नसतं. हे म्हणजे पूर्वी हार्डबाउंड आवृत्तीचं प्रकाशन होत असताना पेपर बॅक आवृत्त्याही प्रकाशित होत असत, तसंच आहे. अशा प्रयोगाचं अर्थकारणही व्यवहारात आणायचं आहे. या नव्या माध्यमांच्या आगमनानं केवळ मराठीच नव्हे, तर जगभराच्या वाचन संस्कृतीत उलथापालथ होत आहे. एका अर्थी हा संक्रमणाचा काळ आहे. या संक्रमणाला बिचकून चालणार नाही, तर हे बदल आपल्याला स्वीकारून आणि ते आत्मसात करूनच यातून मार्ग काढावा लागणार आहे. शेवटी प्रत्येक काळाची म्हणून अशी काही आव्हानं असतात आणि त्या काळात वावरणाऱ्या सर्वांनाच त्याचा सामना करावा लागतो.

हा सामना समर्थपणे करायचा असेल, तर आम्ही प्रकाशक मंडळींनी प्रथम एक गोष्ट करायला हवी, ती म्हणजे - ‘पूर्वी असं होतं, पूर्वी तसं होतं, पूर्वी फार कसदार लेखन करणारे लेखक होते, आता फार उथळ लेखन करणारे लेखक आहेत, पूर्वी फार मोठा वाचकवर्ग होता, आता तो नाही, - हे असे उसासे टाकणं बंद करायल हवं, आताही कसदार लेखन करणारा तरुण लेखकवर्ग ग्रामीण भागातून येतो आहे. तो शोधायला हवा, त्याच्यापर्यंत पोहोचायला हवं. आताही वाचकवर्ग आहे. अनेक प्रकाशकांच्या निवडक पुस्तकांच्या आवृत्त्या अल्पावधीत संपतात. हे कशाचं लक्षण आहे? पूर्वीचा काळ फार मनोहारी होता आणि आताचा नाही असं म्हणणं, म्हणजे ‘पूर्वी बर्फ फार गार होता’ असं म्हणण्यासारखं आहे. या छायेतून जितकं लवकर आपण बाहेर पडू; तितक्या लवकर आपण नव्या काळाच्या आव्हानांना सामोरं जाऊ.

(लेखक ज्येष्ठ प्रकाशक आहेत) 


Web Title: Publishers should take the change by taking the change
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.