पांडुरंगशास्री : ज्ञान, भक्ती आणि कर्माचा त्रिवेणी संगम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2020 04:45 AM2020-10-21T04:45:12+5:302020-10-21T04:45:21+5:30

खऱ्या अर्थाने आधुनिक ‘संत’ ठरलेल्या शास्रीजींनी आध्यात्मिकतेला स्वाध्याय आणि सेवा या माध्यमांद्वारे लोकाभिमुख केले.

Pandurangashastri A triune confluence of knowledge, devotion and karma | पांडुरंगशास्री : ज्ञान, भक्ती आणि कर्माचा त्रिवेणी संगम

पांडुरंगशास्री : ज्ञान, भक्ती आणि कर्माचा त्रिवेणी संगम

googlenewsNext

डॉ. विनय सहस्रबुद्धे (राष्ट्रीय उपाध्यक्ष, भाजप, राज्यसभा सदस्य)

समाजात अंधश्रद्धा असू नये व बुवाबाजीमुळे होणारी भोळ्या-भाबड्या लोकांची फसवणूक थांबावी याबाबत कोणाचेही दुमत असणार नाही. पण अंधश्रद्धेचे निर्मूलन करतानाच डोळस श्रद्धा जागरणही आवश्यक आहे. आपल्या वैचारिक विश्वात अंधश्रद्धा निर्मूलन म्हणजेच पुरोगामित्व अशी घट्ट सांगड घालणाऱ्यांनी डोळस श्रद्धा जागरणाचे काम सतत दुर्लक्षित केले. हे सर्व आठवण्याचे कारण, परवा १९ ऑक्टोबरला साजरी झालेली पांडुरंगशास्री आठवले यांची जन्मशताब्दी ! खऱ्या अर्थाने आधुनिक ‘संत’ ठरलेल्या शास्रीजींनी आध्यात्मिकतेला स्वाध्याय आणि सेवा या माध्यमांद्वारे लोकाभिमुख केले. प्रत्येक माणसातला नारायण जागविण्याचे काम आयुष्यभर करणाऱ्या पांडुरंगशास्रींनी भक्तियोग आणि कर्मयोग हातात हात घालून कसे जाऊ शकतात त्याचे जणू एक प्रतिमानच विकसित केले. त्यांचा जन्मदिवस त्यामुळेच ‘मनुष्यगौरव’ दिवस म्हणून साजरा होण्याचे विशेष औचित्य आहे.

संत-महंत, समाजसुधारक वा अव्वल दर्जाचे समाज संघटक यांची आपल्या देशात कधीच कमतरता नव्हती; पण आठवले यांनी स्वाध्याय चळवळीच्या माध्यमातून ज्ञान, भक्ती आणि कर्म यांचा जो असाधारण त्रिवेणी संगम साधला तो वैशिष्ट्यपूर्ण म्हणता येईल. त्यामुळेच ‘स्वाध्याय चळवळ’ हे त्यांच्या कार्याचे नामाभिधान सार्थक ठरते. भगवद्गीता आणि उपनिषदांमधील तत्त्वज्ञान सोपे करून समाजातील अशिक्षित आणि निरक्षर मानल्या गेलेल्या वंचितांपर्यंत पोहोचवायचे आणि भक्तिभाव जागरणाच्या वाटेने या सर्वांना कर्मयोगाचे महत्त्व पटवून द्यायचे ही त्यांच्या स्वाध्याय चळवळीची कार्यपद्धती ! त्यांनी वृक्ष-मंदिरे उभी केली, गावागावात भक्ती फेऱ्या काढल्या, शिव-पार्वती, विष्णू, सूर्य आणि गणेश अशी आदी शंकराचार्यप्रणीत ‘पंचायतन पूजेची’ परंपरा सुरू केली. व्यक्तिमात्रात ईश्वराचा अंश असतोच त्यामुळे आपण जे कमावतो त्यातही ईश्वराचा वाटा आहे व तो स्थानिक मंदिराच्या माध्यमातून (त्याला ते ‘अमृतालयम’ म्हणत!) समाजातल्या आपल्यापेक्षाही गरीब, वंचित वर्गापर्यंत पोहोचला पाहिजे याबाबत ते आग्रही होते. महाराष्ट्र आणि गुजरातमधील मच्छिमार समाजात तसेच किनारी भागातील अनेक खेड्यांमध्ये त्यांना जसे मोठ्या प्रमाणात अनुयायी मिळाले तसेच ते महानगरांमधील धनिक व्यापारीवर्गातही मिळाले.

पांडुरंगशस्रींनी आपल्या चळवळीच्या बळकटीसाठी आणि आपल्या विचारांना कृतिरूप देण्यासाठी अनेक प्रयोग केले. भक्तिमार्गाने संघटित झालेल्या शेतकऱ्यांना सामूहिक शेतीच्या वाटेने घेऊन जाणारी ‘योगेश्वर कृषी’ ही अभिनव संकल्पना त्यांनी अनेक गावांमधून यशस्वी करून दाखविली.

१९९९मध्ये अटलजी देशाचे पंतप्रधान असताना शास्रीजींना ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने सन्मानित केले गेले. तत्पूर्वी १९९७मध्ये त्यांना विश्वविख्यात टेम्पलटन पुरस्काराने व १९९६ मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्काराने गौरविण्यात आले होते. टेम्पलटन पुरस्कार स्वीकारतानाच्या आपल्या भाषणात शास्रीजी म्हणाले, ‘आपल्या आर्थिक विषमतेची अनेक कारणे मानवी नियंत्रणाच्या पलीकडे आहेत. शिवाय संधींची समानता देतानाही मूलभूत सामाजिक-आर्थिक असमानतेच्या स्वरूपात राहतातच. त्यामुळेच ही विषमता, असमानता दूर करण्यासाठी जगण्यातील संघर्षाला सामोरे जाण्याची क्षमता अक्षम लोकांमध्ये निर्माण करणे हाच एकमेव मार्ग आहे हे मला जाणवले. आमच्या देशातील परस्पर सामाजिक संबंधांच्या मूळ परंपरांमधील हेच सूत्र आहे.’ - हे त्यांचे विचार आजही मानवतेला मार्गदर्शक आहेत. त्यांच्या ‘‘स्वाध्याय’’ चळवळीने व्यक्ती परिवर्तनासाठीचा एक सामूहिक संस्कार-पाठ निर्माण केला आणि परस्पर, सामाजिक संबंधांचे एक काल सुसंगत ‘प्रारूप’ही विकसित केले यात शंका नाही.

पांडुरंग शास्रींनंतर आज त्यांच्या कन्या जयश्री ‘दीदी’ तळवलकर त्यांचे कार्य पुढे नेत आहेत. ‘स्वाध्याया’चा अनुयायी वर्ग आज डझनभराहून अधिक देशात आहे. ज्ञान, भक्ती आणि कर्माच्या त्रिवेणी संगमातून त्यांनी निर्माण केलेला हा ‘स्वाध्याय’ प्रवाह त्याच्या आंतरिक सामर्थ्यामुळे निरंतर प्रवाही राहिला आहे आणि भविष्यातही तो तसाच राहणार आहे.
 

Web Title: Pandurangashastri A triune confluence of knowledge, devotion and karma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.