Birth anniversary : पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदयाचा उद्गाता!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 09:56 AM2021-09-25T09:56:37+5:302021-09-25T09:59:54+5:30

दीनदयालजींनी अंत्योदयाची कल्पना मांडली, म्हणजे आर्थिक विचार करत असताना समाजातील अखेरच्या पायरीवर उभे असलेल्या गोर-गरिबांचे कल्याण केले गेले पाहिजे. जन-धन खाते, अटल पेन्शन योजना ही याच विचारांच्या रूपाला आलेली फळं आहेत.

The originator of Antyodaya Deen Dayal upadhyaya Birth anniversary | Birth anniversary : पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदयाचा उद्गाता!

Birth anniversary : पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदयाचा उद्गाता!

googlenewsNext

स्व. दीनदयाल उपाध्याय केवळ रा. स्व. संघाचे प्रचारक नव्हते तर तत्कालीन भारतातील जनसंघांचे नेते होते. आर्थिक क्षेत्र,  राष्ट्रवाद,  वैश्विक रचनेविषयीचे त्यांचे विचार आज  काळाच्या कसोटीवर उतरलेले दिसतात. 

तत्कालीन भारत आणि एकूण जगभरामध्येच साम्यवाद व भांडवलशाही अशा दोन विचारसरणी प्रभावशाली होत्या. अंतिम सत्याचा मार्ग यातल्या कुठल्या तरी एका विचारसरणीतूनच जातो, अशी ठाम भूमिका तत्कालीन विचारवंताची, राजकीय नेतृत्वाची  होती. परंतु, भारतीय जनसंघाच्या नेतृत्वाखाली दीनदयालजींनी सातत्याने  संतुलित समन्वयवादी भूमिका घेतली.  समाजजीवनाच्या सर्वच क्षेत्रांमध्ये भारतीय विचार केला गेला पाहिजे, असा त्यांचा आग्रह!

स्वातंत्र्यानंतरचा कालखंड हा जागतिक स्तरावर शीतयुद्धाचा कालखंड होता. पंडित नेहरुंसह देशातील बहुसंख्य नेते साम्यवादी व अलिप्त राष्ट्र धोरणांच्या विचारांचे पुरस्कर्ते होते.  दीनदयालजींनी राष्ट्रवादाचा पुरस्कार केला. एक सशक्त, स्वयंभू विकसित राष्ट्र म्हणून आपण उभे राहिले पाहिजे, ही त्यांची भूमिका सातत्याने राहिली होती. काळाच्या ओघात भारताने आता हीच भूमिका स्वीकारली आहे. 

विद्यमान काळामध्ये देशात नव्हे तर जगात ‘पर्यावरण’ हा परवलीचा शब्द झाला आहे.  दीनदयालजी म्हणत, निसर्गाचे दोहन करू नका. जेवढे निसर्गाकडून आपण घेतो, तेवढे निसर्गाला दिले पाहिजे ही भूमिका त्यांनी मांडली. परंतु त्यावेळी त्यांची चेष्टा केली गेली. एकीकडे समाजवाद व भांडवलशाही याच्या द्वंद्वामध्ये एकात्ममानवतावादाचा विचार त्यांनी विजयवाडा येथील जनसंघाच्या ऐतिहासिक अधिवेशनामध्ये प्रबंधाच्या माध्यमातून सादर केला.  विकास आणि वाढ यात फरक असतो, हे त्यांचे सूत्र होते.  

प्राथमिक आरोग्य केंद्र, सर्वसामान्यांची शेती, साक्षरता, महिलांची प्रगती अशा निकषांवरसुद्धा आर्थिक प्रगतीचे मोजमाप केले पाहिजे, असे ते म्हणत. मनुष्य हा केवळ भाकरीकरिता जगतो आणि त्याची पूर्तता करणे हेच शासनाचे काम असले पाहिजे, या विचारांनी भारलेल्या वातावरणात त्यांनी मानवजातीचा, त्याच्या कल्याणाचा विचार करताना माणसाचा समग्र विचार केला पाहिजे, ही भूमिका  मांडली. जगातल्या अनेक देशांचा वाढीचा दर चांगला असतानासुद्धा या देशांना आपली जनता सुखी आहे किंवा नाही, हे पाहण्याकरिता Happiness Index वापरावा लागतो. यातच दीनदयालजींनी मांडलेल्या मूलगामी विचारांचे यश आहे.

ऋजुतापूर्ण व्यवहार,  बडेजावाला फाटा, आपली वैचारिक बांधिलकी प्रखरपणे पण नम्रतेने मांडत राहणे, ही दीनदयालजींच्या विचारांची आणि व्यवहारांची वैशिष्ट्य होती. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी जनसंघाचे काम देशभरात तर वाढवलेच, पण हे करत असताना  अटलजी, अडवाणीजी यांच्यासह अनेक तरुण नेत्यांना तयार करण्याची जबाबदारीही त्यांनी उचलली.  त्यांच्या अकाली व संशयास्पदरित्या झालेल्या मृत्यूने केवळ जनसंघाचे नव्हे, तर या देशातल्या राष्ट्रवादी विचारांचे अतोनात नुकसान झाले. त्यांना  श्रद्धांजली वाहताना अटलजी म्हणाले होते, ‘‘दीनदयालजी जरी गेले तरी त्यांचे विचार  आमच्यात राहतील व दीनदयालजींच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून राष्ट्रवादी विचारसरणीचे कार्यकर्ते निर्माण होतील!’’ अटलजींची ही भविष्यवाणी आज खरी ठरल्याचे आपण अनुभवत आहोत.

दीनदयालजींनी अंत्योदयाची कल्पना मांडली, म्हणजे आर्थिक विचार करत असताना समाजातील अखेरच्या पायरीवर उभे असलेल्या गोर-गरिबांचे कल्याण केले गेले पाहिजे. जन-धन खाते, अटल पेन्शन योजना ही याच विचारांच्या रूपाला आलेली फळं आहेत.  जागतिक राजकारणामध्ये दादागिरी न करता “वसुधैव कुटुंबकम”चा आग्रह भारताने धरला पाहिजे, ही भूमिका दीनदयालजींनी मांडली होती. आज भारताने जगाबरोबर केलेली “लसमैत्री” हे त्याचेच एक स्वरूप आहे.  
          
आर्थिक, सामाजिक, राष्ट्रीय विचारांच्याबाबतीत काळाच्या कसोटीवर चोख उतरलेली राष्ट्रवादाची भूमिका मांडत असताना  संपूर्ण मानवतेचा विचार ज्यांनी काळाच्या पुढे जाऊन मांडला, अशा या महान नेत्याला त्यांच्या जयंतीनिमित्त शत शत अभिवादन !
- अतुल भातखळकर, आमदार, भारतीय जनता पक्ष
 

Web Title: The originator of Antyodaya Deen Dayal upadhyaya Birth anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.