...आता सगळ्याच खिडक्या उघडल्या पाहिजेत!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2021 05:24 AM2021-03-06T05:24:16+5:302021-03-06T05:25:56+5:30

आपण मोठ्या विश्व संस्कृतीचे घटक आहोत. छोटी संकुचित वर्तुळं पुसू शकतो. परिवर्तनाला घाबरता कामा नये आणि परंपरेलाही नाकारता कामा नये.

... Now all the windows should be open! | ...आता सगळ्याच खिडक्या उघडल्या पाहिजेत!

...आता सगळ्याच खिडक्या उघडल्या पाहिजेत!

Next

- डॉ. अरुणा ढेरे
ख्यातनाम लेखक, संशोधक


वेगवेगळ्या ज्ञान शाखांमध्ये अभ्यास करणारी  तरुण मुलं मी आज पाहाते तेव्हा संधीची समृद्धी पाहून खूप आनंद होतो. अर्थात, आम्हाला एक गोष्ट उदंड मिळाली, जी या मुलांना मिळत नाही - ती म्हणजे आपण जे करतो त्याचा आनंद घेण्याइतका वेळ! ताणरहित वेळ! मी तर पुस्तकांच्याच संगतीत वाढले. मनमुराद वाचत आले.  भाषेची, साहित्याची, कवितेची गोडी त्या वाचनातूनच लागली. आज मागे वळून बघताना कळतं की वाचन नुसता फुरसतीचा वेळ घालवण्यासाठी नसतं आणि लेखन तर तसं नसावंच! नुसती हौस, नुसती करमणूक यांच्या पलीकडे हळूहळू जात राहतो आपण. आपला आनंद सुद्धा त्यामुळे हळूहळू शहाणा होत जातो. 


 पुस्तक कसला आनंद देतात?- तो आनंद कधी असतो  समाधानाचा, कधी वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव समोर आल्याचा! आपण जगतो त्यापेक्षा वेगळं जगणारी , वेगळं अनुभवणारी, आयुष्याकडे वेगळ्या दृष्टीनं पाहणारी माणसं, त्यांचं  आयुष्य - माणसामाणसांमधले संबंध कळतात.  सुख दु:खांमधून जाणारी माणसं कशी वागतात, कशा तडजोडी करतात, कशी मोडतात, वाकतात, ताठ उभी राहतात, कशी विकली जातात, फसवली जातात, कशी रडतात किंवा लढतात - या सगळ्यांमधून  माणसाचं जगणं कळतं. पुस्तक वाचताना होणारा आनंद आणखीही एका गोष्टीचा असतो - भाषा समजल्याचा! लेखक हा तसा आपल्यासारखाच  सामान्य माणूस. तीच भाषा - जी आपण बोलतो, पण किती परींनी वापरतो, नव्यानं किती अर्थपूर्ण करतो! एकच भाषा; पण शैली प्रत्येकाची वेगळी. नेमाड्यांच्या ‘कोसला’ची वेगळी आणि गौरी देशपांड्यांची वेगळी. प्रवीण बांदेकरची  वेगळी आणि प्रणव सखदेवची वेगळी. ग्रेसची कविता, सुरेश भटांची कविता, विंदांची कविता किंवा मंगेश नारायणराव काळेची कविता - एकसारखी नसते. एकच मराठी भाषा वापरतात हे कवी पण प्रत्येकानं केलेला भाषेचा वापर वेगळा असतो. हे समजून घेण्यात केवढा आनंद मिळतो! भाषेवर प्रेम केलं तर भाषा आपल्याला केवढं तरी देणं देते. पण त्यासाठी एक पूर्वअट मात्र आहे -  प्रेम करणं! आपली भाषा आपल्याला  आवडली पाहिजे आणि आवडत्या माणसाला समजून घेण्यासाठी आपण करतो तशी धडपड  भाषा समजून घेण्यासाठी पण केली पाहिजे ! 


जागतिकीकरणाचे भले-बुरे दोन्ही परिणाम  दिसतात. जगातल्या खूपशा भाषा मरू घातल्या आहेत. कारण ती भाषा बोलणाऱ्या मानवी समूहांची स्वतंत्र सांस्कृतिक वैशिष्ट्य नाहीशी होत आहेत. गेल्या शतकात आर्थिक, राजकीय, वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानात्मक अशा चार महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये क्रांती म्हणावी अशा घडामोडी जगभर होत गेल्या. त्यात करोडो लोकांच्या जगण्याची मुळं  उखडली गेली. भारतात  एका बाजूला नव्या शिक्षणाच्या आणि व्यवसायाच्या शोधातली तरूण पिढी जमिनीपासून तुटली आणि एकेकाळच्या ग्रामजीवनाला - शेती उद्योगाला कमालीची अवकळा आली.  तरूण पिढी ना शेतीकडे किंवा गावाकडे आणि ना नव्या व्यवस्थेत अशी अधांतरी झाली.
आपण परिवर्तनाला घाबरता कामा नये आणि परंपरेलाही  नाकारता कामा नये. फक्त विवेकानं, विचारपूर्वक त्यातलं योग्य-अयोग्य पारखून घेता आलं पाहिजे. आपण काही अधांतरी आकाशातून पडलेलो नाही. आपल्याला एक इतिहास आहे. आपल्यामागे सांस्कृतिक परंपरा आहेत, कला परंपरा आहेत, वाड्:मय परंपरा आहेत, त्या समजून नव्या दृष्टीनं त्यांचा अभ्यास करायला हवा.


परंपरा आणि संस्कृती म्हटलं की जुनाट काहीतरी असं मानू नये.  नव्या काळाशी भूतकाळ जोडलेलाच असतो आणि भविष्यकाळही  वर्तमानातूनच उदयाला येत असतो.  हे जुनं-नवं साधत पुढे जायचं असतं. जी मूल्यं आपल्या परंपरेनं दिली, उदारता, सहिष्णुता दिली, सर्वांचा विचार करण्याचं जे विश्वात्मक भान दिलं, ‘वसुधैवकुटुंबकम’ म्हणण्याचे जे संस्कार दिले तो आपल्या संस्कृतीचा गाभा आहेत. संपत्ती आणि सत्ता टिकाऊ  नसते. जगात खरी सत्ता श्रेष्ठ निर्धनांनीच मिळवली आहे. संत ज्ञानेश्वरांनी, तुकारामांनी , विवेकानंदांनी आणि गांधीजींनी, आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी ती मिळवली . 
आज आपण  मोठ्या विश्व संस्कृतीचे घटक आहोत .  छोटी संकुचित सांस्कृतिक वर्तुळं  पुसू शकतो.  कळ दाबली की खिडक्या उघडतात हल्ली.  फक्त मंत्र - पासवर्ड माहीत  हवा. पण आपल्या  समाधानाचं, आनंदाचं दार खुलं करण्याचा पासवर्डही मिळवला पाहिजे.  


माणूस म्हणून ओळख मिळवून देईल असा पासवर्ड आणि ही ओळख मिळवायची तर आपल्याला आपल्या  परिसराकडे, भोवतीच्या माणसांकडे, नाते संबंधाकडे, संस्कृतीकडे, इतिहासाकडे, परंपरांकडे नीट डोळे उघडून पहावं लागेल. चांगल्या गोष्टींवर प्रेम करायला शिकावं लागेल. प्रेमाबरोबर जबाबदारी येते हे समजून घ्यावं लागेल. भाषेवर, साहित्यावर प्रेम करायचं तर भाषा जबाबदारीनं वापरणं शिकावं लागेल. भाषा किंवा साहित्य ही नुसती हौस म्हणून लिहिण्याची, टाळ्या मिळतात म्हणून ऐकवण्याची गोष्ट नाही आणि नुसती ‘टू किल  द टाइम’ म्हणून वाचण्याचीही गोष्ट नाही. मुळात  वेळ हा काही ‘किल’ करण्यासारखा स्वस्त नाही. ती फार मौल्यवान गोष्ट आहे आणि साहित्य ही आयुष्य समजून घेण्याची एक सुंदर वाट आहे.
सौजन्य : गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिक येथील एचपीटी आर्ट्स आणि आरवायके सायन्स महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे डॉ. अरुणा ढेरे यांनी दूरसंवादाद्वारे केलेल्या भाषणाचे संपादित रूप.

Web Title: ... Now all the windows should be open!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.