‘अरे ला कारे’ करणारा भारतीय बॅडमिंटनचा नवा चेहरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2022 12:09 PM2022-05-17T12:09:21+5:302022-05-17T12:10:14+5:30

बॅडमिंटनच्या थॉमस चषक विजेतेपदानं भारतीय खेळाडूंनी १९८३ च्या क्रिकेट विश्वचषक विजयाची आठवण करून दिली आहे. आता नवा इतिहास लिहिला जाईल.

new face of indian badminton playing after thomas cup winning | ‘अरे ला कारे’ करणारा भारतीय बॅडमिंटनचा नवा चेहरा!

‘अरे ला कारे’ करणारा भारतीय बॅडमिंटनचा नवा चेहरा!

Next

- मयूर पठाडे, नाशिक

रांगड्या कपिल देवच्या नेतृत्वाखाली भारताने १९८३चा क्रिकेट विश्वचषक जिंकला आणि भारतीय क्रिकेटने कात टाकली. तोपर्यंत क्रिकेटच्या जगात लिंबूटिंबू समजला जाणारा हा देश नंतर क्रिकेटच्या अतिरथी -महारथींना त्यांच्या तोंडासमोर ‘अरे ला कारे’ करू लागला. या एकाच घटनेनं भारतीय क्रिकेटचं रूपडं बदललं ते बदललंच.. यानंतर जगातल्या कोणत्याच देशानं भारताला कमी समजण्याची हिंमत केली नाही आणि आता तर भारत क्रिकेटच्या क्षेत्रातला सर्वार्थानं अनभिषिक्त सम्राट आहे. १९८३ची ती एक घटना. त्यानं सगळंच काही बदलून टाकलं. विशेषत: भारतीय खेळाडूंची मानसिकता. नेमकी तशीच घटना आता बॅडमिंटनच्या सांघिक क्षेत्रात घडली आहे. गेल्या रविवारी भारतानं थायलंडमध्ये झालेल्या थॉमस चषकावर आपलं नाव कोरलं आणि ७३ वर्षांनंतर इतिहास घडविला. १९८३ च्या घटनेशी या घटनेची तुलना करणं अनेकांना अतिशयोक्ती वाटेल; पण अनेक तज्ज्ञांच्या मते या घटनेचं महत्त्व त्यापेक्षाही जास्त आहे. १९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघाचा प्रमुख खेळाडू सुनील गावस्करनं तर म्हटलं आहे, बॅडमिंटनच्या क्षेत्रातील ही क्रांतिकारी घटना आहे. भारतीय खेळाडूंचा धाक आता जागतिक बॅडमिंटनच्या क्षितिजावर पहायला मिळेल. 

१९८३ ची वर्ल्ड कप ही जशी ‘अचानक’ घडलेली घटना नव्हती, तसंच भारताचा थाॅमस चषकावरचा कब्जा ही ‘अचानक’ घडलेली घटना नाही. फायनलमध्ये भारतानं गतविजेत्या आणि तब्बल १४ वेळा हा चषक जिंकणाऱ्या इंडोनेशियावर मात केली. मलेशिया आणि डेन्मार्क या तगड्या देशांनाही अस्मान दाखवलं. अशा घटना अचानक घडत नाहीत. त्यात भारतीय खेळाडूंच्या मेहनतीचा वाटा फार मोठा होता, आहे. एचएस प्रणॉय तर जणू ‘मॅन ऑफ द सिरिज’ ठरला. सेमीफायनलमध्ये भर मॅचमध्ये प्रणाॉय जखमी झाला. त्याच्यावर कोर्टवरच उपचार करावे लागले. तरीही त्यानं विजय मिळवला. स्पर्धेच्या सुरुवातीलाच भारतीय कर्णधार लक्ष्य सेनला फूड पाॅइझनिंग झालं होतं. फायनलच्या पहिल्याच मॅचमध्ये लक्ष्य आपला पहिला गेम हारला होता; पण प्रतिस्पर्धी अँथनी गिंटिंगनं मारलेल्या एका जबरदस्त शाॅटला लक्ष्यनंही तितकंच जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे लक्ष्यचा आत्मविश्वास तर परत आलाच; परंतु गिंटिंगसह अख्खं जग आश्चर्यचकित झालं. त्यानंतर लक्ष्यनं गिंटिंगला मान वर करू दिली नाही. किदम्बी श्रीकांत तर संपूर्ण स्पर्धेत एकही मॅच हारला नाही.

भारतात बॅडमिंटनकडे गांभीर्यानं पाहायला लावण्याची सुरुवात केली ती प्रकाश पदुकोन यांनी. १९८०मध्ये ऑल इंग्लंड ओपनचं जेतेपद जिंकून अख्ख्या जगाचं लक्ष त्यांनी आपल्याकडे वळवलं. त्यानंतर पी. गोपीचंदनं २००१ मध्ये पदूकोन यांचाच कित्ता गिरवताना हे विजेतेपद परत भारताकडे आणलं. त्यानंतर सायना नेहवालचं युग सुरू झालं. चिनी खेळाडूंना आपणही पाणी पाजू शकतो, असा विश्वास तिनं जागतिक पटलावरही जागवला. तिचाच कित्ता गिरवताना पी. व्ही. सिंधू रिओ ऑलिम्पिकच्या रौप्यपदकापर्यंत पोहोचली. त्यानंतर २०१९ मध्ये तिनं जागतिक विजेतेपदही खिशात घातलं.. या घटनांच्या स्मृती खेळाडूंच्या मन:पटलावर कोरल्या गेल्या नसत्या तरच नवल! त्याचंच प्रतिबिंत आज थॉमस चषकाच्या रूपानं दिसत आहे.. ‘अरे ला कारे’ करण्याची हीच हिंमत आता भारतीय बॅडमिंटनचा चेहरा नव्यानं घडवायला घेईल हे नक्की..
 

Web Title: new face of indian badminton playing after thomas cup winning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.