युवकांतील कौशल्यविकासाची गरज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 03:45 AM2020-01-11T03:45:21+5:302020-01-11T03:45:28+5:30

थोर विचारवंत स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस १२ जानेवारी हा राष्ट्रीय युवा दिवस म्हणून १९८५ पासून सर्वत्र साजरा केला जातो.

The need for skill development among the youth | युवकांतील कौशल्यविकासाची गरज

युवकांतील कौशल्यविकासाची गरज

Next

- डॉ. दीपक शिकारपूर
थोर विचारवंत स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस १२ जानेवारी हा राष्ट्रीय युवा दिवस म्हणून १९८५ पासून सर्वत्र साजरा केला जातो. ते एक समाजसुधारक, तत्त्वज्ञानी आणि विचारवंत होते. तरुणांची शाश्वत ऊर्जा जागृत करण्याचा तसेच देशाचा विकास करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. विविध शाळा-महाविद्यालयांमध्ये कवायत करून, स्वामी विवेकानंदांवर भाषण, वक्तृत्व -वादविवाद स्पर्धा, गाणी, निबंध-लेखन स्पर्धा, परिसंवाद इत्यादी साजरे केले जातात. युवापिढीला बऱ्याच कल्पनांना सामोरे जाण्यासाठी आणि प्रत्येक क्षेत्राचा योग्य मार्गाने विकास करण्यासाठी, योग्य योजना तयार करण्यासाठी राष्ट्रीय युवा दिन ही एक सुवर्णसंधी आहे.
२०२० या वर्षासाठी ‘राष्ट्र बांधणीसाठी युवाशक्ती एकत्रित करणे’ ही थीम आहे. पण त्याआधी आपण २०२० मधील युवकांच्या आशा, आकांक्षा समजून घेतल्या पाहिजेत. सध्या युवापिढीपुढे संभ्रम आहे आणि मोठी समस्या आहे ती रोजगार व करिअरची. विसाव्या शतकात पदवी म्हणजे यशस्वी करिअर हे समीकरण होते. फार संघर्ष न करता १९९० पर्यंत नोकºया उपलब्ध होत होत्या. आता ते चित्र पूर्णपणे बदलले आहे. अनेक द्विपदवीधरही हजारोंच्या संख्येने बेरोजगार आहेत. शिपायाच्या नोकरीला अनेक पदवीधर अर्ज करतात, ही बाब शैक्षणिक अध:पतन दर्शवते. शिकून नोकरी मिळणार नसेल; तर उच्च शिक्षण का घ्यायचे, हा प्रश्न युवापिढी आमच्या पिढीला विचारत आहे. यावर एकच उपाय म्हणजे कौशल्यवृद्धी. पदवी, कौशल्य, कार्यानुभव आणि दृष्टिकोन म्हणजे यशस्वी करिअर हे एकविसाव्या शतकातले समीकरण आहे.


कौशल्य हा सध्या परवलीचा शब्द झाला आहे. अनेक धुरिणांना कौशल्य म्हणजे कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्याची शिक्षणपद्धती असेच वाटते. हीच खरे तर शोकांतिका आहे. तेलाचे साठे सापडल्याने मध्य पूर्व देशांचा विकास झाला. भारताचे खरे भांडवल आहे आपली युवाशक्ती, तीसुद्धा ग्रामीण भागातील. तिच्यावर जर योग्य संस्कार झाले व कौशल्याची कल्हई दिली तरच चमकदार व्यक्तिमत्त्वे विकसित होतील. वेग, नवकल्पना, मूल्यवर्धन आणि बदल आत्मसात करणे हे आजच्या घडीचे मंत्र आहेत. बुद्धिमत्ता, आकलनशक्ती, व्यवहारज्ञान, माणुसकी या कुठल्याही बाबीत ग्रामीण युवाशक्ती कमी नाही. अनेक शहरी तरुण-तरुणींनी खरे तर या बाबी ग्रामीण मित्रांकडून शिकल्या पाहिजेत. ग्रामीण युवकांचे प्रश्न अगदी साधे आहेत. आत्मविश्वास, संभाषण कौशल्य, कार्यसंस्कृती, वेळ पाळणे व टापटीप या प्रमुख बाबींवर त्यांनी लक्ष दिले पाहिजे. व्यक्तीसापेक्ष अंगभूत कौशल्यांचा विकास करण्याकडे आपण खरोखरीच युद्धपातळीवर लक्ष दिले, तर भविष्यात आपला देश फार वेगळा दिसेल.
पुढील दशकामध्ये आपणा सर्वांच्या खासगी तसेच कामाच्या ठिकाणच्या जीवनशैलीत मोठे बदल होणार आहेत. विसाव्या शतकात जे नीतिनियम किंवा धोरणे लागू होती ती भविष्यकाळात कामास येणार नाहीत. त्यामुळे ‘अनुभवी’ असण्याची संकल्पनाच बदलणार आहे. व्यवहारज्ञान, प्रभावी संवाद साधण्याचे कौशल्य, समूहामध्ये काम करण्याची तयारी व क्षमता या व अशा बाबींना आजच्या तुलनेने असाधारण महत्त्व येणार आहे. दुर्दैवाने आज या बाबींचे महत्त्व कोणालाही फारसे जाणवत नाही आणि त्यामुळे मुलामुलींना त्या शिकवल्या गेल्या पाहिजेत, असेही वाटत नाही. जर आपल्याला जागतिक संधी हव्या असतील; तर व्यावसायिक इंग्रजी व आणखी एका परदेशी भाषेचे शिक्षण घेणे अनिवार्य आहे. यासाठी ई-शिक्षण, वेब, टीव्ही या माध्यमांचा वापर अत्यावश्यक आहे. यादृष्टीने जपान ही सुवर्णसंधी असू शकते. उगवत्या सूर्याचा हा देश भारतीयांचे योगदान जाणतो. जपानचे सरासरी आयुर्मान सत्तरच्या वर असल्याने आपला देश व आपली युवाशक्ती हा धोरणात्मक पर्याय अनेक जपानी विचारवंतांना पटला आहे. गरज आहे ती आपल्या देशातील शिक्षण पद्धतीला व युवापिढीला पटवून देण्याची. आज जर विवेकानंद हयात असते तर ते शिकागोऐवजी टोकियोला गेले असते.

आता एका अतिशय महत्त्वाच्या बाबीकडे मी वळणार आहे ती म्हणजे आजच्या जमान्यातले आपल्या समाजातील मुलींचे आणि महिलांचे स्थान. स्वत:चे विश्व साकार करण्यासाठी सरकारी मदतीवर आणि धोरणांवर अवलंबून न राहणाऱ्यांमध्ये आपल्या महिलाही आहेत. माहिती तंत्रज्ञानाच्या युगाने त्यांच्यासमोर एका नव्या विश्वाची दारे उघडली आहेत आणि त्या या संधीचा भरभरून फायदा घेत आहेत. बहुतेक सर्व आयटी कंपन्यांमध्ये महिला कर्मचाºयांची संख्या फार मोठी आहे. महिला म्हणून कोणत्याही सवलती न मागता, कोणत्याही आरक्षणाची मागणी न करताही आयटी आणि बीपीओच्या क्षेत्रात त्यांनी आघाडी मारली आहे. आजच्या, वेगळ्या पठडीतल्या, अनेकविध रोजगारांसाठी महिला पुरुषांइतक्याच योग्य आहेत किंबहुना काही बाबतीत त्या जास्त सरस आहेत. त्या आपले लक्ष दिलेल्या कामावर जास्त चांगल्याप्रकारे केंद्रित करू शकतात (क्रिकेट, राजकारण इ.च्या भानगडीत न पडता), नवीन गोष्टी शिकण्याची त्यांची मानसिक तयारी जास्त असते. त्यामुळे युवापिढीच्या विकासाचा विचार करताना त्यात स्त्री-पुरुष असा भेद न करता सर्वांगीण विचाराची गरज आहे.
(उद्योजक आणि संगणक साक्षरता प्रसारक)

Web Title: The need for skill development among the youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.