मोदींच्या भाषणात मोदी, मोदी आणि मोदी!

By सुधीर लंके | Published: April 13, 2019 11:16 AM2019-04-13T11:16:05+5:302019-04-13T11:17:02+5:30

नरेंद्र मोदींच्या सभेने पुन्हा एकदा मोदी लाट निर्माण होईल अशी भाजपला आशा आहे. मोदींच्या सभांना गर्दीही जमते. मात्र, त्यांच्या भाषणांमध्ये तेच ते मुद्दे मांडले जाताना दिसत आहे.

Modi, Modi and Modi in Modi speech! | मोदींच्या भाषणात मोदी, मोदी आणि मोदी!

मोदींच्या भाषणात मोदी, मोदी आणि मोदी!

Next

सुधीर लंके 

अहमदनगर: नरेंद्र मोदींच्या सभेने पुन्हा एकदा मोदी लाट निर्माण होईल अशी भाजपला आशा आहे. मोदींच्या सभांना गर्दीही जमते. मात्र, त्यांच्या भाषणांमध्ये तेच ते मुद्दे मांडले जाताना दिसत आहे. राज्यातील चारही सभांमध्ये ते चित्र दिसले. नगरच्या सभेत मोदी यांच्या भाषणात एकही नवीन मुद्दा नव्हता.
या लोकसभा निवडणुकीसाठी मोदी यांनी राज्यात आजपर्यंत चार सभा घेतल्या. शुक्रवारी अहमदनगर शहरात झालेल्या सभेत मोदी यांनी साईबाबांचा उल्लेख करुन भाषणाला सुरुवात केली. रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या. लातूरमध्ये तुळजाभवानी, सिद्धेश्वर महाराज, शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा तर वर्ध्यात महात्मा गांधी, विनोबा भावेंचा उल्लेख त्यांनी केला. नांदेडला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत सुरुवात केली. स्थानिक अस्मितांचा ते प्रारंभी उल्लेख करतात. सणांच्या शुभेच्छा देतात. त्यातून समुदाय प्रभावित होतो. नगरच्या सभेत त्यांनी उमेदवारांच्या नावांचा उल्लेख केला नाही. अगदी मुख्यमंत्र्यांचाही. इतर सभांमध्येही ते उमेदवारांचा उल्लेख करताना दिसत नाहीत. विखे परिवाराचा ते उल्लेख करतील अशी शक्यता होती.
नगरला २०१४ साली त्यांनी उमेदवारांची नावे घेतली होती. त्यावेळी भारत निर्माणासाठी भाजपला सत्ता द्या असे ते म्हणाले होते. ‘महागाई’, कॉंग्रेसचा भ्रष्टाचार हे त्यावेळी त्यांच्या भाषणाचे प्रमुख मुद्दे होते. ‘कॉंग्रेसचे लोक महागाईवर बोलतात का?’हा प्रश्न त्यांनी जनसमुदायाला त्यावेळी विचारला होता व त्याचे उत्तरही लोकांकडून घेतले होते.
यावेळी महागाई, बेरोजगारी हे शब्दच त्यांच्या भाषणात नव्हते. ‘फिर एक बार मोदी सरकार’ ही घोषणा त्यांनी लोकांकडून दोन-तीनदा म्हणवून घेतली. त्यांनी स्वत:ला ‘चौकीदार’ ही उपमा दिली आहे. ती घोषणाही ते स्वत: उच्चारतात व लोकांकडून वारंवार म्हणवून घेतात. तीनही सभांमध्ये ही बाब सामायिक दिसते. ‘कमळ’, ‘धनुष्य’ हे कुठलेही बटन दाबा. आपले मत सरळ मोदींना मिळेल, असे त्यांनी नगरलाही सांगितले. शिवसेनेचेही मत ते ‘मोदी’ नावाच्या खात्यातच जमा करतात.
नगरच्या भाषणात भाजप सरकारमधील एकाही मंत्र्यांचे नाव त्यांच्या भाषणात आले नाही. इतर सभांमध्येही ही नावे नसतात. राष्टÑवादीवर टीका करताना ते शरद पवारांपासून अगदी अजित पवारांपर्यंत बोलले. मात्र भाजपच्या कारकिर्दीचे कौतुक करताना ते आपल्या एकाही मंत्र्याच्या कामाचा दाखला देताना दिसले नाहीत. राष्टÑीय सुरक्षा, सर्जिकल स्ट्राईक, जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा, चौकीदार, शेतकऱ्यांचे प्रश्न हे त्यांच्या भाषणाचे सामायिक मुद्दे आहेत. वर्धा, नांदेड, लातूर व नगर या सभांत हेच मुद्दे होते. बंजारा समुदायाबाबत भाजपने घेतलेला निर्णय त्यांनी आवर्जून सांगितला. राज्यातील यापूर्वीच्या इतर सभांत हा मुद्दा आला. मात्र, आरक्षणांच्या प्रश्नावर वेगवेगळ्या राज्यांतून पुढे आलेली मागणी, महाराष्टÑातील धनगर आरक्षण, मराठा आरक्षण या मुद्यांना त्यांनी स्पर्श केला नाही.
लोकांना प्रश्न विचारुन त्याचे हवे ते उत्तर वदवून घ्यायचे व सभेत ‘मोदी’, ‘मोदी’ हा गजर करायचा ही मोदी यांच्या सभेची ‘शैली’ दिसत आहे. निवडणुकीसाठी मोदी यांचा जयजयकार करणारे गीत बनविण्यात आले आहे. हे गीत त्यांच्या सभेपूर्वी व सभेनंतर वाजविण्यात आले. त्यातून एक माहोल तयार होतो. या गाण्यावर नगरला तरुणाई नाचताना दिसली.
प्रथमच मतदान करणाºया मतदारांचा ते आवर्जून मुद्दा करतात. देशाच्या सुरक्षिततेच्या मुद्दाला तुम्ही प्राधान्य देता की नाही? असा प्रश्न करत ते थेट भावनांना हात घालण्याचा प्रयत्न करतात. जवानांच्या शौर्याचा त्यांनी प्रचारात खुबीने वापर करुन घेतला आहे. नगरलाही त्यांनी तीच पद्धत वापरली. नवोदित मतदारांना राष्टÑवादाच्या मुद्यावर त्यांनी साथ घातली. मात्र, बेरोजगारीचा मुद्दा दुर्लक्षित केला.
मोदी स्वत:च्याच भाषणात त्यांच्या नावाचा अनेकदा उल्लेख करतात. हा ‘मोदी, मोदी’चा गजर जाणवण्याइतपत होता.

नेत्यांच्या गाठीभेटी
मोदी यांचा आवाज नगरच्या सभेत व्यवस्थित नव्हता. त्यामुळे नगरच्या सभेत ते नेहमीपेक्षा कमी बोलले, असे भाजपच्या सूत्रांचे म्हणणे आहे. मोदी व्यासपीठावर आल्यानंतर त्यांची सर्व आमदारांनी भेट घेतली. खासदार दिलीप गांधी हेही त्यांना भेटले. सुजय विखे यांचा त्यांनी हातात हात घेतला.

 

Web Title: Modi, Modi and Modi in Modi speech!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.