फुकाची भाजी...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 05:23 AM2019-10-14T05:23:07+5:302019-10-14T05:23:19+5:30

ज्या माणसाला गरजच नव्हती त्याच्यासाठी हा मोबाइल आणि त्याचा डाटा आज अत्यावश्यक गरज बनली आहे. एक वेळचे जेवण नाही मिळाले तरी चालेल, रिचार्ज मात्र वेळेतच व्हायला हवे, ही त्याची आजची मानसिकता. आजच्या बाजारपेठेला हेच तर हवे आहे.

mobile and data is important than food | फुकाची भाजी...

फुकाची भाजी...

googlenewsNext

ज्या माणसाला गरजच नव्हती त्याच्यासाठी हा मोबाइल आणि त्याचा डाटा आज अत्यावश्यक गरज बनली आहे. एक वेळचे जेवण नाही मिळाले तरी चालेल, रिचार्ज मात्र वेळेतच व्हायला हवे, ही त्याची आजची मानसिकता. आजच्या बाजारपेठेला हेच तर हवे आहे.

फुकटची चटक लागली की तोंड पोळणारच ! हे खोटे वाटत असेल, तर मोबाइल ग्राहकांना विचारायला हवे. मोबाइल घेण्याचे स्वप्नही न पाहिलेल्या सर्वसामान्यांना अगदी कमी पैशांत आधी मोबाइल मिळाला. सोबत अमर्याद डाटाही मिळाला. हा सर्वसामान्य माणूस या डाटाच्या भरोशावर अख्खे जग खिशात घेऊन फिरू लागला. किराणा मालात काटकसर होईल; पण तारखेला रिचार्ज टळणार नाही, इतका हा मोबाइल सवयीचा झाला. फुकटात मिळालेले कधीच पुरत नाही, हे गावात ज्येष्ठांकडून ऐकविले जायचे. ‘फुकाची भाजी, हगवणीस काळ’ ही म्हण वारंवार ऐकविली जायची. परिस्थिती बदलली. खुल्या अर्थव्यवस्थेच्या घुसळणीत ग्राहकाला फुकटात, सवलतीत, हप्त्याने देण्याची सुविधा दिली जाऊ लागली. ‘इथे उधार मिळणार नाही’ अशा पाट्या लागायच्या त्या दुकानांवर आता ‘उधार मिळेल’ अशा पाट्या झळकू लागल्या. ‘एक रुपया द्या, लाखाची गाडी-मोबाइल हप्त्यावर घेऊन जा’ अशी आमिषे दिली जाऊ लागली. त्यामुळे कुवत नसलेला ग्राहकही या फुकटेगिरीला - सवलतीला बळी पडला. त्यातून शहर - खेडे, नोकरदार - शेतकरी कोणीही नाही सुटला. त्यामुळे बाजारपेठ तर फुगली; पण माणसाचा आनंद हिरावून घेतला गेला. अख्खे आयुष्य हप्ते फेडण्यातच जाऊ लागले. म्हणजे एक पैसाही खिशात नसताना आनंदाने जगणारा सर्वसामान्य माणूस, शेतकरी पैशांअभावी पावलोपावली नडला जाऊ लागला. खाण्यासाठी जे लागायचे तेच शेतकरी पिकवायचा; पण खुल्या अर्थव्यवस्थेने अधिक उत्पन्नाचे आमिष दाखवून या बळीराजाच्या आयुष्यातला आनंद संपवून टाकला. ज्वारी-जवस सोडून तो उसाच्या मागे लागला. नोकरदारांचे हालही तसेच. गेल्या ३० वर्षांत सर्वांच्याच आयुष्याचे बाजारीकरण झाले. शिक्षण हा बाजार बनला. फुकटात शिक्षण मिळायचे तिथे प्राथमिक शिक्षणाची किंमत लाखावर पोहोचली.

आरोग्याचा बाजार यापेक्षाही मोठा. म्हणजे मरणदेखील स्वस्त राहिले नाही. सण हे सण न राहता ‘इव्हेंट’ बनले आणि त्यांचीही स्वतंत्र अर्थव्यवस्था तयार झाली. जगाबरोबर राहणे, म्हणजे बाजारपेठेच्या इशाऱ्यावर धावणे हा जणू नियम झाला. तुमची ऐपत असो वा नसो, इच्छा असो अथवा नसो, तुम्हाला दमछाक होईपर्यंत पळायचेच आहे. पळताना कोसळले तरी तुमच्यासाठी कोणी थांबणार नाही. महामार्गावर अपघात झाल्यानंतर एक तर फोटो काढताना किंवा अपघातग्रस्त वाहनातील माल पळविताना अनेकांना आम्ही पाहिले आहेच की. या बाजारीकरणाचे एक गणित पक्के आहे. ग्राहकाला एखाद्या वस्तूची अगोदर सवय लावायची. त्यासाठी त्याला वाट्टेल ती सवलत द्यायची. त्याच्यासाठी ती वस्तू अपरिहार्य झाली की, मग हळूहळू किंमत वाढवायची. फुकटात दारू पाजणारा मित्र परवडत नाही, तो यामुळेच. सवय लागेपर्यंतच तो बिल देत असतो. एकदा का ती लागली की, तो मित्र आपला हात आखडता घेऊन त्यालाच पैसे द्यायला भाग पाडतो. हा मित्र आणि ही बाजारपेठ सारखीच. दोघेही ग्राहकाला फक्त सवय लागण्याची वाट पाहत असतात. आपली मॉल संस्कृती वेगळी थोडीच आहे? सवलती देऊन या संस्कृतीने अनेक छोट्या दुकानदारांचा बाजार बसविला. पूर्ण बाजारपेठ ताब्यात आल्यानंतर ते काय करतील, हे सांगण्यासाठी कुठल्या ज्योतिषाची गरज राहणार नाही.

भारतात व्यापारासाठी आलेल्या ईस्ट इंडिया कंपनीनेही सर्वात आधी हेच केले. आर्थिक नाड्या हातात येताच पुढे काय झाले ते सर्वज्ञातच आहे. त्यामुळे फुकटची गोष्ट चटकाच देते, हे कायम लक्षात ठेवायला हवे. मग तो मोबाइल असो वा अन्य कुठलीही वस्तू. मोबाइल आणि डाटा अगदी कमी पैशांत म्हणजे फुकटातच देऊन इतर कंपन्यांचा बाजार झोपविणाºया कंपनीने फुकटची ही कात टाकून गेल्या आठवड्यात आऊटगोइंग कॉलला पैसे आकारणे सुरू केले. ज्या माणसाला गरजच नव्हती त्याच्यासाठी हा मोबाइल आणि त्याचा डाटा आज अत्यावश्यक गरज बनली आहे. एक वेळचे जेवण नाही मिळाले तरी चालेल, रिचार्ज मात्र वेळेतच व्हायला हवे, ही त्याची आजची मानसिकता. आजच्या बाजारपेठेला हेच तर हवे आहे.

Web Title: mobile and data is important than food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jioजिओ