युवकांना जोडण्यासाठी काँग्रेसचा संदेश... मूल्य तीच, मुलं नवी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 05:10 AM2019-11-29T05:10:27+5:302019-11-29T05:12:12+5:30

नवीन तरुणांना पक्षात संधी देऊन नव्या महाराष्ट्राचा पाया रचणे हा उद्देश घेऊन आम्ही काम सुरू केलंय. महाराष्ट्रात कुणाचे सरकार येणार हे मंथन गत महिन्यापासून सुरू होते. भाजप हा केंद्रातील सत्ताधारी पक्ष लोकशाहीचा वापर कशा पद्धतीने करतो आहे हेही यानिमित्ताने पुन्हा एकदा दिसले.

The message of Congress to connect youth ... value is the same, children are new | युवकांना जोडण्यासाठी काँग्रेसचा संदेश... मूल्य तीच, मुलं नवी

युवकांना जोडण्यासाठी काँग्रेसचा संदेश... मूल्य तीच, मुलं नवी

googlenewsNext

- सत्यजीत तांबे
(प्रदेशाध्यक्ष, युवक काँग्रेस, महाराष्ट्र) 

महाराष्ट्रात कुणाचे सरकार येणार हे मंथन गत महिन्यापासून सुरू होते. भाजप हा केंद्रातील सत्ताधारी पक्ष लोकशाहीचा वापर कशा पद्धतीने करतो आहे हेही यानिमित्ताने पुन्हा एकदा दिसले. अगदी चहाच्या टपरीपासून ते १० जनपथ व ७ रेसकोर्सपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणाचीच चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात काँग्रेस संपली, अशी चर्चा सुरू झाली होती. कारण लोकसभेला पक्षाचा फक्त एकच खासदार निवडून आला. मात्र त्या परिस्थितीतून भरारी घेत आज राज्यात काँग्रेस सत्तेपर्यंत पोहोचू शकली.

१९७७ च्या पराभवानंतर इंदिराजी जेव्हा नागपूरला आल्या होत्या तेव्हा पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाल्या, ‘हारे है तो क्या हुआ, फिर जितेंगे.’ तेव्हा ‘लोकमत’मध्ये हा मुख्य मथळा होता. या त्यांच्या एका वाक्याने वातावरण भारावले व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोश संचारला. ‘फिर जितेंगे’ हा आशावाद काँग्रेस पक्ष सतत ठेवत आला. आज राज्यात काँग्रेसची अवस्था खूप चांगली नसली तरीही जनता मात्र काँग्रेसची परिस्थिती सुधारावी, पक्षाने पुढाकार घेऊन जनतेचे प्रश्न सोडवावेत याची आस लावून बसली आहे. एखाद्या पक्षाबाबत जनतेचे असे आश्वासक मत असणे याला खूप महत्त्व आहे. विधानसभा निवडणूक ताकदीने न लढताही जनतेने काँग्रेसला साथ दिली. याचा अर्थ जनता व काँग्रेस यांचे एक नाते आहे. हे नाते पक्षाच्या युवक कार्यकर्त्यांनी ओळखणे आवश्यक आहे.


जयप्रकाश नारायण म्हणाले होते, ‘मै धुनी युवकों के तलाश मे हूँ.’ माओही म्हटला, ‘कॅच देम यंग.’ हे ते राष्टÑनिर्मितीसाठी म्हणाले होते. राजकीय पक्षाचे कार्य हाही राष्ट्रनिर्मितीचाच भाग असतो. त्यामुळे राज्यात काँग्रेस उभी करावयाची असेल तर भारावलेली युवा पिढी शोधावी लागेल. २३ ऑक्टोबरला झालेल्या मतमोजणीनंतर आम्ही तसा प्रयत्न सुरूही केला आहे. ‘मूल्य तीच, मुलं नवी’ हा युवक काँग्रेसचा नारा आहे. आम्हाला नवी मुलं हवी आहेत. पण, आमची लोकशाहीची मूल्य मात्र तीच आहेत. देशात लोकशाही व मूल्यव्यवस्थाच मोडीत काढण्याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू आहेत. लोकांनी स्वत: विचारच न करता अंधपणे आमच्या पाठीशी यावे, असा काही राजकीय पक्षांचा व संघटनांचा प्रयत्न आहे. काँग्रेसचे मात्र ते धोरण नाही. लोकांनी लोकशाही, राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता, समाजवाद ही घटनेला अभिप्रेत असलेली मूल्ये पाळावीत असा आग्रह काँग्रेसने सतत धरला. समाजात जाती, धर्माच्या आधारे भेद पाडणे, दुर्बलांवर अन्याय करणे हे काँग्रेसला कदापिही मान्य नाही. आम्हाला ही मूल्यव्यवस्था जपणारी नवी पिढी हवी आहे.

म्हणून तरुण मुले शोधा व त्यांना जोडा हा आमचा कार्यक्रम आहे. यशवंतराव चव्हाण जर रत्नपारखी नसते तर कॉलेजच्या राजकारणातील शरद पवार आज आपणाला कदाचित दिसलेच नसते. आता काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी यशवंतराव चव्हाणांची भूमिका वठवून नवे चेहरे शोधावेत ही आम्हा युवकांची अपेक्षा आहे. युवक काँग्रेस अध्यक्षपदाच्या एक वर्षाच्या कारकिर्दीत आम्ही ‘वेक अप महाराष्ट्र’, ‘मैं भी नायक’, ‘निषेधासन’, ‘सुपर ६०’, ‘चलो पंचायत अभियान’, ‘चलो घर-घर अभियान’, ‘युवा क्रांती यात्रा’ हे कार्यक्रम राबविले. आंदोलने केली. आता आम्ही संघटन बांधणीवर लक्ष देत आहोत. सामान्य परिवारातील, राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी आहे मात्र संधी मिळाली नाही, जुन्या पिढीतील निष्ठावान काँग्रेस परिवारातील मुले अशा सर्वांना जोडण्याचा प्रयत्न आहे. मागील आठवड्यात मी मुंबईला अनेक तरुणांना भेटलो. संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून तरुण मुंबईला आले होते. पूर्ण वेळ प्रचारकांची टीम, बौद्धिके, प्रशिक्षण असा आमचा कार्यक्रम असेल. वर्धा येथील सेवाग्राम आश्रमात नेऊन बौद्धिक घेतले जाईल. युवक काँग्रेस ही काँग्रेसची प्रशिक्षण शाळाच आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांत ८० टक्के नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा मानस आहे.

विधानसभा निवडणुकीत आम्ही युवकांच्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून ठळक मुद्दे समोर आणले. त्याची अंमलबजावणी करून घ्यावयाची आहे. मधल्या काळात अनेक नेते पक्ष सोडून गेले़ त्या वेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात सांगत होते, ‘हीच संधी आहे, नवीन नेतृत्व तयार करण्याची.’ काँग्रेसचा विचार हा शाश्वत व स्थिर आहे. नवीन पिढीला तो भावतो. हा विचार जनतेला आश्वासक व नैसर्गिक वाटतो. फक्त गरज आहे हा विचार तरुणांपर्यंत पोहोचविण्याची.
 

Web Title: The message of Congress to connect youth ... value is the same, children are new

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.