फिटो अंधाराचे जाळे...! उद्याच्या सुवासाचा आस्वाद घेण्यासाठी सर्वांना बळ मिळाे, हीच आज प्रार्थना!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 06:23 AM2021-04-13T06:23:53+5:302021-04-13T06:24:59+5:30

Editorial : लाॅकडाऊनच्या उंबरठ्यावर असताना ‘लक्ष्मीची पाऊले’ चित्रपटातील गाणे ओठावर येते. त्यात सुधीर माेघे यांनी केलेल्या शब्दांच्या पेरणीतून उद्याचा सुवास दरवळताे आहे.

May all have the strength to enjoy the fragrance of tomorrow, this is the prayer today! | फिटो अंधाराचे जाळे...! उद्याच्या सुवासाचा आस्वाद घेण्यासाठी सर्वांना बळ मिळाे, हीच आज प्रार्थना!

फिटो अंधाराचे जाळे...! उद्याच्या सुवासाचा आस्वाद घेण्यासाठी सर्वांना बळ मिळाे, हीच आज प्रार्थना!

Next

चांद्र वर्षाचा आज पहिला दिवस! त्यानिमित्त विजयाची गुढी भक्तिभावाने उभारून नव्या आशा-आकांक्षांची प्रतीक्षा करण्याचा दिन. उद्या महामानव आणि ज्ञानसूर्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती! त्याच दिवशी रमजान म्हणजे भाजणे, पाेळणे-उपवासाने सर्व पापे जळून जातात म्हणून ज्या व्रताला रमजान म्हटले जाते, त्याचाही प्रारंभदिन! काेराेनाने गतवर्षीच्या या दिनापासून सर्वत्र उदास-उदास वातावरणाने सर्व अवकाश गर्दीने भरभरून गेले आहे. त्यात नवा आशेचा किरण दिसताे असे वाटत असताच काेराेना संसर्गाची दुसरी लाट गल्लाेगल्ली येऊन थडकली आहे. अशा वातावरणातही मानवी समाजाने माणुसकी आणि चांगुलपणाची वाट साेडलेली नाही.

लाॅकडाऊनच्या उंबरठ्यावर असताना ‘लक्ष्मीची पाऊले’ चित्रपटातील गाणे ओठावर येते. त्यात सुधीर माेघे यांनी केलेल्या शब्दांच्या पेरणीतून उद्याचा सुवास दरवळताे आहे. ते म्हणतात, ‘फिटे अंधाराचे जाळे, झाले माेकळे आकाश, दरीखाेऱ्यातून वाहे, एक प्रकाश प्रकाश, रान जागे झाले सारे, पायवाटा जाग्या झाल्या, सूर्य जन्मता डाेंगरी, संगे जागल्या सावल्या, एक अनाेखे लावण्य, आले भरास, भरास !’ सारे काही आपल्या आजूबाजूला राेजचेच असले तरी वाटेत आलेल्या संकटावर मात करण्याची मानवाची धडपड, जिद्द संपत नाही. त्यातूनच नवा सुवास दरवळत राहतो.

काेराेना संसर्गाने शंभर वर्षांपूर्वीच्या (इसवी सन १९२०) प्लेगमुळे निर्माण झालेल्या काळाेखात आपण लाेटले गेलाे असलो, उदास... उदास झालाे असलाे, तरी नवी किरणे घेऊन येणाऱ्या सूर्याबराेबरच संगे सावल्याही जागविल्या जाणार आहेत. त्याच आशेवर मानवाची धडपड चालू असते. संशाेधन संंस्थेच्या प्रयाेगशाळेत नेत्रांना दुर्बीण लावून बसलेल्या संशाेधकाच्या नजरेपासून अतिदक्षता विभागातील परिचारिकेच्या सलाइनमधून ठिबकत्या थेंबावर असलेल्या नजरेपर्यंतचा प्रयत्न हा नवा आशेचा किरणच तर असतो. चैत्र पाडव्याला आपण याच आशेने गुढी उभारून भक्तिभावाने मांगल्याची सदिच्छा व्यक्त करताे.

उद्या डॉ. बाबासाहेबांची जयंती येत आहे आणि रमजानचे राेजेही सुरू हाेत आहेत. ज्ञानसूर्याच्या जन्माचा दिन या देशात त्याच भक्तिभावाने साजरा होतो! बाबासाहेबांनी या भारतवर्षाला एक नवी लाेकशाही समाजरचना बहाल केली. एक माेठे बळ सर्व भारतीयांना दिले. त्यांचा उत्सवच हा आहे. ताे ज्ञानसंपादनेचा आहे. नव्या समाजरचनेच्या आदर्शाचा आहे. अंधाराचे जाळे फिटावे म्हणूनच त्यांची अखंड धडपड होती. यामुळेच सुधीर माेघे यांच्या या गीताची आज प्रकर्षाने आठवण हाेते. चैत्र मासामध्येच रामनवमी म्हणजेच प्रभू रामचंद्राचा जन्माेत्सव, माेठ्या आदर्शाचा वस्तुपाठ घालून देणाऱ्या मर्यादा पुरुषाेत्तमाचा उत्सव साजरा होतो.

रमजानचे राेजे धरताना उपवास करून आपल्यातील अनावश्यक ऊर्जा जाळून शुद्धतेचा नवा मार्ग आपण धरत असतो. नव्या पायवाटा चाेखाळतो. त्यानिमित्त क्राेध, मत्सर, द्वेष, आदींना बाजूला सारून शांततेचा संदेश मनामनात रुजावा, असा प्रयत्न  असतो.  दरवर्षीचे हे उत्सव, सणवार, जयंत्या आणि नव्या किरणांची ऊब आनंदाने स्वीकारताना काेराेना संसर्गाचे संकट हे या पिढीला नवेच आहे. अशा प्रकारच्या अनेक संसर्गजन्य प्रादुर्भावाने मानवजात नष्ट हाेते का? अशी शंका उपस्थित व्हावी, अशी परिस्थिती उभी राहिली; पण मानवातील सर्वाेच्च मूल्य माणुसकीचे आहे. त्या मूल्याच्या जाेरावर मानव आजवरची वाटचाल करीत आला आहे.

मागील वर्षभरात सूर्यकिरणांनी, पावसाच्या अृमतधारांनी साथ दिली आणि रानं हिरव्या काेंदणांनी भरभरून गेली. तृष्णेला शांत करणाऱ्या पाण्याच्या थेंबांनी जमीन हिरवीगार हाेऊन गेली हाेती. ही आशा निसर्गानेच तर पेरून ठेवली आपल्यासाठी! अशा वातावरणात उदास-उदास न हाेता सारे काही राेजचेच असले तरी नवा सुवास दरवळणार आहे. त्यासाठी आपण साऱ्यांनी मर्यादा पुरुषाेत्तमाप्रमाणे काही मर्यादांच्या लक्ष्मणरेषा आखून घेऊन वर्तणूक करण्याची गरज आहे. सूर्याच्या किरणांची आणि आभाळातून काेसळणाऱ्या थेंबांची काेणतीही किंमत माेजावी लागत नाही याचा अर्थ आपण आपले वर्तन एका मर्यादेच्या पल्याड घेऊन जाणार नाही, याची काळजी घ्यावीच लागणार आहे. त्यासाठी ‘लाेकमत’च्या असंख्य वाचकांना चैत्र पाडव्याच्या, आंबेडकर जयंतीच्या, रमजान ईदच्या आणि रामजन्माेत्सवाच्या भरभरून शुभेच्छा! उद्याच्या सुवासाचा आस्वाद घेण्यासाठी सर्वांना बळ मिळाे, हीच आज प्रार्थना!

Web Title: May all have the strength to enjoy the fragrance of tomorrow, this is the prayer today!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.