मनमोहन सिंग यांनी देशाला दिलेले व्यक्तिगत दान मोलाचे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 05:35 AM2019-06-26T05:35:27+5:302019-06-26T05:35:51+5:30

पंतप्रधानपदासारख्या देशातील सर्वोच्च पदावर राहिलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांचे त्यांच्यासोबत काम करणाऱ्या व वावरणा-या लोकांशी असलेले संबंध जिव्हाळ्याचे, मैत्रीचे व प्रसंगी बरोबरीचे वाटावे असे होते. विरोधी पक्षांची व टीकाकारांची बाजू नीट समजून घेण्याचाच त्यांचा प्रयत्न सदैव राहिला.

Manmohan Singh donated personal donations to the country | मनमोहन सिंग यांनी देशाला दिलेले व्यक्तिगत दान मोलाचे

मनमोहन सिंग यांनी देशाला दिलेले व्यक्तिगत दान मोलाचे

googlenewsNext

काही माणसे राजकारणात न राहताही त्यावर आपल्या व्यक्तिमत्त्वाचा व कर्तृत्वाचा ठसा कायमचा उठवितात आणि देशाएवढेच स्वत:चे नावही जगाच्या इतिहासात नमूद करतात. दहा वर्षे भारताचे पंतप्रधान, त्याआधी त्याचे अर्थमंत्री व त्याहीआधी कित्येक वर्षे देशाच्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर राहिलेले डॉ. मनमोहन सिंग यांनी देशाला दिलेले व्यक्तिगत दान मोलाचे आहे. ते लोकनेते नव्हते. कोणत्याही निवडणुकीत निवडून येणे त्यांना जमणारे नव्हते. पण राष्ट्रपती असो वा पंतप्रधान, देशातील कोणत्याही वरिष्ठाला त्यांची दखल गांभीर्याने घ्यावी लागते आणि देशातील सामान्य माणसेही त्यांच्याविषयीची कृतज्ञता सदैव मनात बाळगतात.

अर्थतज्ज्ञ म्हणून जागतिक कीर्तीचे मानकरी झालेल्या डॉ. मनमोहन सिंगांविषयी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा म्हणाले, ‘जगाची घसरणारी अर्थव्यवस्था सावरू शकेल असा डॉ. मनमोहन सिंग हा एकच माणूस आज आपल्याजवळ आहे.’ जी-२० देशांच्या सर्वच नेत्यांनी त्या वेळी टाळ्या वाजवून ओबामांना साथ दिली होती. देशाच्या राजकारणाला नियोजनाचे वळण नेहरूंनी दिले. त्यात शिस्त इंदिरा गांधींनी आणली. त्याला सौजन्याची देण वाजपेयींनी दिली तर त्याच्या अर्थकारणाला गती व उन्नयन मनमोहन सिंगांनी प्राप्त करून दिले. देशाच्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नरपद त्यांना दिले तेव्हा त्यांनी आपल्या क्षेत्राबाबतचे निर्णयस्वातंत्र्य मागून घेतले. तेव्हा अर्थमंत्रीपदावर असलेल्या प्रणव मुखर्जी यांनीही त्याला मान्यता दिली. तोपर्यंतची देशाची समाजवादी व काहीशी बंदिस्त वाटचाल मोकळी करून तिला तिच्या वाटेने जाऊ देण्याचे व त्या वाटेवरची नवी व उंच ठिकाणे गाठता येतील असे नेतृत्वच त्यांनी तिला दिले. परिणामी तीन ते साडेतीन टक्क्यांवर रखडणारा देशाच्या आर्थिक विकासाचा दर प्रथम पाच व सहा टक्क्यांवर जाऊन पुढे थेट नऊ टक्क्यांपर्यंत गेलेला साऱ्यांना दिसला.

वाजपेयींच्या पश्चात देशातील बहुमतात असलेल्या संयुक्त पुरोगामी आघाडीने आपले पंतप्रधानपद सोनिया गांधींना एकमताने देऊ केले. सोनियाजींनी मात्र ते विनम्रपणे नाकारून त्यावर डॉ. मनमोहन सिंगांना विराजमान केले. (जगाच्या राजकीय इतिहासातील तेव्हाचा तो सर्वोच्च त्यागही होता) त्यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात देशाचा आर्थिक व औद्योगिक विकास गतिमान झाला. कृषीक्षेत्र कृतिशील झाले. प्रशासन पारदर्शी बनले आणि सामान्य माणसांना देशाच्या जलद गतीने होणाºया विकासाविषयी विश्वास वाटू लागला.

मनमोहन सिंग हे पक्षीय राजकारणापासून दूर राहिले. परिणामी विरोधी पक्षाच्या लोकांनाही ते जवळचे व आपले वाटले. अनेक प्रसंगी अटलबिहारी वाजपेयी यांनीही त्यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली. अमेरिकेशी केलेला अणुतंत्रज्ञानाचा करार ही त्यांची देशाला अशीच एक मोठी देणगी होती. मात्र अमेरिकेशी केलेला करार केवळ वैचारिक हटवादामुळे नापसंत असणारे कम्युनिस्ट आणि मनमोहन सिंगांचे सरकार कसेही करून घालविण्याची जिद्द बाळगणारे अडवाणी यांनी या कराराला कडाडून विरोध केला. वैचारिकदृष्ट्या एकमेकांपासून दूर असलेले त्यांचे पक्ष त्या विरोधासाठी एकत्र आले. त्या वेळी मनमोहन सिंगांचे सरकार टिकेल की जाईल, अशी शंका त्यांच्या जवळच्यांच्याही मनात उभी राहिली. मात्र मी या दबावापुढे झुकणार नाही, सरकार गेले तरी बेहत्तर पण या कराराला मूठमाती मिळणार नाही याची मी काळजी घेईन, असे म्हणत मनमोहन सिंगांनी आपल्या सरकारवर लोकसभेचा बहुमताचा विश्वास संपादन केला. त्या वेळी मनमोहन सिंगांच्या मंत्रिमंडळातील काही संशयास्पद लोकांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचे आढळून आले.

अनेक पक्षांच्या आघाडीचे मंत्रिमंडळ चालविण्याची जबाबदारी असलेल्या डॉ. सिंग यांचे त्याकडे काहीसे दुर्लक्ष झाले. परिणामी टू जी सारखे मोठे घोटाळे उघडकीला आले. पुढे झालेल्या न्यायालयीन व अन्य चौकशांत हे घोटाळे झालेच नव्हते असेही उघडकीला आले. त्या काळात त्यांच्या सरकारला मोठ्या टीकेला तोंड द्यावे लागले. मात्र त्याही काळात डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर व्यक्तिगत टीका करण्याचे धाडस कुणालाही झाले नाही. त्यांची लोकप्रियता व कर्तबगारी यांच्या बळावरच काँग्रेसने २००९ ची निवडणूक नव्याने जिंकली व मनमोहन सिंग हे त्या सरकारचे पुन्हा पंतप्रधान झाले. यापुढचा काळ वाढीव अर्थव्यवस्थेच्या नियोजनाचा व तिचा लाभ कनिष्ठ मध्यमवर्गासोबतच गरिबांना मिळवून देण्याचा होता. त्यात त्यांच्या सरकारला फार मोठे यशही प्राप्त झाले. मनमोहन सिंगांची दहा वर्षांची कारकीर्द सर्व शेजारी देशांशी राहिलेल्या मैत्रीसाठीही लक्षणीय ठरली.

रशिया, अमेरिका व चीन यांच्या भूमिका तशाच राहिल्या असल्या तरी त्यात भारतविषयक कटुता कुठे दिसली नाही. देशातील प्रसिद्धीमाध्यमांना सरकारवर सर्व तºहेची टीका करण्याची मुभा होती. विरोधी पक्षांना त्यांची आंदोलने पुढे नेण्याची व सरकारविरोधी जनमत संघटित करण्याची संधी होती. मनमोहन सिंग यांनी टीकेला व विरोधी पक्षांना स्वत:हून कधी उत्तर दिले नाही. परिणामी टीकाकारांनासुद्धा त्यांच्यावर एका मर्यादेपलीकडे जाऊन बोलणे वा लिहिणे कधी जमले नाही. ते सदैव आसाम या राज्यातून राज्यसभेवर निवडून यायचे. पंजाबात त्यांचा पक्ष बलशाली नव्हता आणि आसामात काँग्रेसजवळ तेव्हा हुकमी बहुमत होते. परिणामी मनमोहन सिंग हे सरदार असतानाही संसदेत आसामचे प्रतिनिधी म्हणून बसत आणि देशाचे नेते म्हणून काम करीत. २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसचा सर्वत्र मोठा पराभव झाला. तेच आसामातही झाले. त्या राज्याची विधानसभाही भाजपने जिंकली. परिणामी मनमोहन सिंगांना राज्यसभेत आणण्याएवढी क्षमता काँग्रेसजवळ राहिली नाही. त्यांना तामिळनाडूमधून राज्यसभेत आणण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. पण त्याला द्रमुकने साथ दिली नाही. सबब, दीर्घकाळ राज्यसभेत राहून त्यांना त्या सभागृहाचा आता निरोप घ्यावा लागला आहे. ते संसदेच्या सदस्यत्वापासूनही दूर झाले आहेत. मात्र खासदार असो वा नसो, त्यांच्या नावाचा प्रभाव सरकारात आणि देशात मोठा आहे. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिमत्त्वाची आणखीही एक बाजू येथे नोंदविण्याजोगी आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असताना त्यांनी दरमहा एक रुपयावर काम केले. दहा वर्षे पंतप्रधान राहूनही त्यांची व्यक्तिगत मालमत्ता कधी दोन कोटींवर पोहोचली नाही.

लहानसहान पदावर असलेल्या माणसांनी राजकारणात मिळविलेल्या प्रचंड मिळकती पाहता मनमोहन सिंगांचे त्यागमय जीवन साºयांनाच मार्गदर्शन करणारे व त्याचवेळी आत्मपरीक्षण करायला लावणारे त्याचमुळे ठरते. अमेरिकेतील पिट्सबर्ग या शहरी भरलेल्या जी-२० राष्ट्रांच्या परिषदेतून परत येत असताना रात्री दोन-अडीच वाजण्याच्या सुमारास डॉ. सिंग हे त्यांच्या विशेष विमानातील कक्षातून बाहेर आले आणि त्यांच्या मागल्या दालनात निद्राधीन झालेल्या पत्रकारांच्या रांगेतून फिरताना दिसले. त्यांच्या या हालचालीने जागे झालेल्या एका पत्रकाराने काहीसे चकित व विनम्र होत त्यांना त्यांच्या अशा अवेळच्या आगमनाचे कारण विचारले. त्यावर मंद हसून ते म्हणाले, ‘तुम्हा लोकांची विमानातील व्यवस्था नीट आहे की नाही हे पाहायला मी आलो.’ तेवढ्यावर न थांबता ते पुढे म्हणाले, ‘अरे भई, आज मेरा जनमदिन है.’ त्यावर सारेच पत्रकार जागे झाले आणि डॉ. सिंग यांनी स्वत: आपल्या दालनातून आणलेली मिठाई त्यांना दिली. मोठ्यात मोठ्यांसारखा आणि लहानांत लहानांसारखा राहणारा हा नेता देशाला उंचीवर नेतानाच त्याला प्रगल्भही बनवीत राहिला हे त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. राज्यसभेतील त्यांची आताची निवृत्ती कायमची ठरणार नाही व त्यांना पुनश्च संसदेत तेवढ्याच सन्मानाने प्रतिष्ठित केले जाईल ही देशाची अपेक्षा आहे. राहुल गांधी आणि त्यांचा काँग्रेस पक्ष यांचे ते राष्ट्रीय उत्तरदायित्वही आहे.

Web Title: Manmohan Singh donated personal donations to the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.