गावाकडं बघ माझ्या दोस्ता!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 07:44 AM2020-10-20T07:44:32+5:302020-10-20T07:46:06+5:30

महापुराने घेरलेल्या सोलापुरातल्या तरुणांच्या धडपडीची कहाणी

Look at the village my friend! | गावाकडं बघ माझ्या दोस्ता!

गावाकडं बघ माझ्या दोस्ता!

googlenewsNext

राकेश कदम, सोलापूर

कोरोनातून सावरून शहरं रुळावर यायला लागली. गावातली काही पोरं नोकरीसाठी पुन्हा शहरात आली तर काही गावाकडंच राहिली. नोकरी मिळेल तोवर शेती बघू, थोडा जवळचा, थोडा हातउसना घेऊन एकरा-दोन एकराचे उत्पन्न काढू असे आशावादाने बोलू लागली. तोच पावसाने घात केला. शेतकऱ्याच्या कुटुंबात दोन मुलं असतील तर एकानं नोकरी करावी. दुसºयानं शेतीपूरक व्यवसाय करावे असे सल्ले दिले जातात. काल कोरोनामुळं एका मुलाची नोकरी गेली. आज पावसामुळे शेती गेली. यातून सावरता येईल की नवे भोग वाट्याला येतील, या भीतीच्या चिखलात ‘तरुण मनं रुतून बसल्याचं’ सोलापूरच्या पूरग्रस्त भागातून फेरफटका मारताच लक्षात येतं.

सोलापूर-पुणे रोडवरील लांबोटी (ता. मोहोळ, जि. सोलापूर) गावचे अमर जाधव हताश होऊन सांगत होते, ‘दोन वर्षांपूर्वी कंत्राटी कामात नुकसान झालं म्हणून शेती करायचं ठरलं. यावर्षी कर्ज काढून शेतीत गुंतवणूक केली. एका शेतात ऊस लावला. दुसरीकडं खरबूज, मिरची, टमाटे लावले. मार्चच्या पहिल्या आठवड्यात खरबूज, मिरची चांगलं उत्पन्न देतील, असं वाटू लागलं. अचानक एक दिवस सरकारनं कोरोनाचा लॉकडाऊन जाहीर केला. हाताला आलेलं पीक रानात पडून राहिलं. शेवटी रस्त्यावर उभं राहून खरबूज विकले. मिरची तर अशीच गेली. आता ऊस साथ देईल असं वाटत असतानाच पाऊस सुरू झाला. नदीला पूर आला आणि उभा ऊस आडवा झाला. माती वाहून गेली. विजेचे पोल, तारा, शेड सगळं वाहून गेलं... धंद्यात बुडालो म्हणून शेतीत आलो... शेती करत नव्हतो तेच बरं होतं, असं आता वाटू लागलंय... शेती विकणं एवढचं राहिलंय...!’

परवाच्या मुसळधार पावसाने सोलापूर जिल्ह्याचे अतोनात नुकसान झाले. उजनी धरणातून भरमसाट पाणी सोडले. भीमा-सीना नद्यांना महापूर आला. नदीकाठच्या गावात पाणी शिरले. एरव्ही ओढ्यासारख्या वाहणाऱ्या भोगावतीसारख्या उपनद्यांचे पाणी पात्राबाहेर एक-दीड किलोमीटर दूर पसरले. शेतातली माती वाहून गेली. महापूर ओसरतोय तसा शेतकऱ्यांच्या दु:खाचा बांध फुटतोय.

दुष्काळी भाग ही ओळख बदलण्याचा प्रयत्न सोलापूर जिल्ह्यातील तरुण अनेक दिवसांपासून करतो आहे. माढा, पंढरपूर, मोहोळ, करमाळा, मंगळवेढा, उत्तर सोलापूर, अक्कलकोट भागातील अनेक मुलं नोकरी-उद्योगाच्या निमित्तानं पुणे, ठाणे, पनवेल भागात स्थायिक आहेत. येथे ’वन आरके’ किंवा ‘वन बीएचके’मध्ये दिवस काढूनही मुलं गावाकडं शेतीत, जोडधंद्यात गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करतात. लांबोटीचे अमर जाधव काही दिवस पुण्यात, तर काही दिवस कुर्डूवाडी भागात कंत्राटी कामं घ्यायचे. रेल्वेच्या एका कामात कंपनीने त्यांना मोबदलाच दिला नाही म्हणून ते शेतीकडे वळले.

मुंढेवाडीत भेटलेला श्रीकांत डोंगरे पुण्यात खासगी कंपनीत होता. लॉकडाऊनमुळे गावी आला. शेतात कांदा लावला. परवाच्या पावसात सगळा कांदा पाण्याखाली गेला. डिकसळचा निरंजन धावणेही पुण्यातच होता. नोकरी गेली म्हणून गावातल्या द्राक्षाच्या बागेत लक्ष घातलं. परवाच्या पावसात निरंजनची अख्खी बाग झोपली. बाग काढायची म्हटलं तरी पैसे लागतील, अशी अवस्था आहे.

पोफळे गावातील रणजित पाटील आणि त्याच्या कुटुंबीयांवर ओढवलेला प्रसंग भीषण आहे. रणजित पुण्यात एक ट्रॅव्हल एजन्सी चालवितो. घरात एकत्र कुटुंब पद्धती. कुटुंबातील इतर सदस्य आयटी कंपनीत आहेत. लॉकडाऊनमध्ये सर्व जण पुण्यातून शेतातल्या घरी आले. शेतीत काही गुंतवणूक केली. परवाच्या पावसात घरातली ६० पेक्षा अधिक जनावरं वाहून गेली. आयटीवाल्याचे लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक वस्तू बुडून गेल्या. घर दहा फूट पाण्याखाली होतं, आता नव्यानं कसं आणि किती करायचं या विवंचनेत अख्खं पाटील कुटुंब आहे.

लॉकडाऊनमध्ये गावातली पोरं घाबरली होती; पण त्यांना शेताचा आधार होता. आता शेताची वाताहत पाहून ती पार खचून गेलीत. मनातून खचलेला माणूस लवकर उभा राहात नाही, असे नाईकनवरे बोलून जातात.
- ही सारी कहाणीच मन अत्यंत सुन्न करून जाणारी आहे!

Web Title: Look at the village my friend!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी