असे ‘लोकमान्य’ पुन्हा होणे नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2020 10:34 AM2020-08-01T10:34:14+5:302020-08-01T12:00:52+5:30

शंभर वर्षांपूर्वी १ ऑगस्ट १९२० : मध्यरात्री लोकमान्य टिळकांचे निधन झाले. त्या दु:खद घटनेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने लोकमान्यांचे हे स्मरण

Lokmanya Bal Gangadhar Tilak Special article | असे ‘लोकमान्य’ पुन्हा होणे नाही

असे ‘लोकमान्य’ पुन्हा होणे नाही

Next

- प्रा. डॉ. उल्हास रत्नपारखी 
मंडालेच्या कारागृहातून अचानक सुटका करून १६ जून १९१४, मंगळवारी मध्यरात्री गायकवाड वाड्याच्या (टिळकांचे निवासस्थान) समोर टिळकांना उभे केले. दुसऱ्या दिवशी पुणे शहरात वा-यासारखी वार्ता सर्वत्र पसरली. मग गायकवाड वाड्यात टिळकांच्या दर्शनासाठी माणसांची रिघ लागली. न. चिं. केळकरांच्या शब्दात सांगायचे तर ‘‘या गर्दीने पूर्वीच्या सहा वर्षातल्या शून्यकाराचा सर्व वचपा काढला ज्याने यावे, त्याने ऐकवार पायावर डोके ठेवून दूर बसावे. असे होता होता माडी भरून गेली. प्रथम एक-दोन दिवस ‘दर्शन’ देण्याच्या उद्योगाशिवाय टिळकांना दुसरा ‘उद्योग’च करता आला नाही.

मंडालेच्या कारागृहातून सुटून आल्यानंतर पुढची सहा वर्षे (१९१४-१९२०) स्वीकृत स्वराज्य कार्यासाठी टिळक सतत फिरत होते. यासाठीचा प्रचंड कार्यभार त्यांनी स्वेच्छेने स्वीकारला होता. प्रकृती तितकीशी साथ देत नव्हती. तरीही आपल्या राष्ट्रकार्यात, समाजकार्यात व ज्ञानोपासनेत टिळकांनी खंड पडू दिला नाही. या सहा वर्षाच्या कालावधीत राष्ट्रीय सभेचा वाद झाला. होमरूल लीगची स्थापना झाली. ‘गीतारहस्य’ या ग्रंथाचे प्रकाशन झाले. २३ जुलै १९१६ रोजी टिळक साठ वर्षांचे झाले. फिरोजशहा मेहता, गोपाळकृष्ण गोखले यांचे निधन झाले. लखनौ येथे राष्ट्रीय सभेचे (१९१६) अधिवेशन झाले. त्यानंतर कानपूर-विदर्भाचा दौरा पुढचा कर्नाटकाचा दौरा. १९१७ सालातील टिळकांचा कोलंबोचा दौरा. पुढे दिल्लीची राष्ट्रीय सभा. त्यानंतर चिरोल खटल्यासाठी १९१८-१९ जवळ जवळ वर्षभराचा कालखंड टिळकांचा इंग्लंडचा दौरा. २६ नोव्हेंबर १९१९ रोजी ते इंग्लंडहून परतले. चिरोल खटला ते हरले होते; पण ते निराश झाले नाहीत. त्यांनी मद्रासचा दौरा केला. डिसेंबर १९१९मध्ये अमृतसर येथे राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनास उपस्थित होते. २७ मे १९२० बनारस येथे आॅल इंडिया काँग्रेस कमिटीच्या सभेसाठी ते गेले. ३० मे १९२० रोजी गंगेच्या घाटावर काही टिळकभक्तांनी त्यांचा सत्कार केला. त्यांना संस्कृत मानपत्र देण्यात आले. १ जून १९२० रोजी बनारसच्या ब्रह्मघाटावर टिळकांची दोन व्याख्याने झालीत. बनारसहून परत येताना जबलपूर येथे दोन दिवस मुक्काम. तिथे ३ जून रोजी गोलबझार पटांगणावर व ५ जून रोजी टाउन हॉलमध्ये व्याख्याने झाली.

ताई महाराज दत्तक प्रकरणात मुंबईस प्रयाण :
ताई महाराज दत्तक प्रकरणाचा इथे सविस्तर परामर्ष घेता येणे शक्य नाही. या प्रकरणातील कायद्याची लढाई टिळकांनी प्रचंड प्रतिकूलता असूनही सुरू ठेवली होती. १९१५ साली प्रिव्ही. कौन्सिलने टिळकांच्या बाजूने निकाल दिला होता. तरीही मुंबईच्या न्यायालयात या खटल्याचे काही काम शिल्लक होते. सुनावणीसाठी १४ जुलै १९२०ची तारीख निश्चित झाली होती. टिळकांची प्रकृती फारशी बरी नव्हती; पण मुंबईस जाणे आवश्यक होते म्हणूनच जगन्नाथ महाराज - या आपण दिलेल्या दत्तकाची बाजू मांडण्यासाठी १२ जुलै १९२० रोजी टिळक मुंबईत दाखल झाले. मुक्कामाचे ठिकाण नेहमीचेच साळवेकरांचे ‘सरदार गृह’ १२ जुलै व १३ जुलै या दोन दिवशी वकिलांसोबत चर्चा करून कैफियत तयार केली. १४ जुलै १९२० रोजी सुनावणी झाली. २१ जुलै १९२०ला टिळकांच्या बाजूने निकाल देण्यात आला.


ताई महाराजांच्या दत्तक प्रकरणाच्या खटल्याचे काम निर्णायक स्थितीत असताना २० जुलै १९२० रोजी टिळकांचे एक चाहते दिवाण चमनलाल त्यांना भेटण्यासाठी सरदार गृहावर आले. त्यावेळी टिळकांच्या अंगात थोडासा ताप होता. चमनलाल म्हणाले ‘‘एक महिनाभर काश्मीरकडे का जात नाही’’ त्यावर टिळक म्हणाले, इतके लांब जाऊ शकत नाही. पुण्याच्या आसपास कोठे तरी जाईन म्हणतो. मग थोड्यावेळाने चमनलाल म्हणाले, ‘‘बाहेर जाऊया का? बाहेर हिंडून आलो तर तुम्हाला बरे वाटेल.’’ मग दिवाण चमनलाल यांचेसमवेत टिळक त्यांच्या उघड्या मोटारीतून फेरफटका करण्यास निघाले. पावसाळ्याचे दिवस, जुलैचा महिना. उघड्या मोटारीतून लांबवरचा फेरफटका. त्या रात्री टिळकांना चांगलाच ताप भरला. त्या रात्रीपासून टिळकांनी जे अंथरूण धरले ते अखेरपर्यंत काही सुटले नाही. बुधवार, २० जुलैपासून सोमवार, २५ जुलैपर्यंत ताप मलेरियाचा समजून उपाययोजना होत होती. पण सोमवार २५ जुलैपासून निमोनियाची लक्षणे दिसू लागली. प्रथम उजवीकडील फुफ्फुसाचा खालचा भाग सुजला, तापही कमी होत नव्हता. दादासाहेब खापर्डे, न.चिं. केळकर यांना तारा करण्यात आल्या. २७ जुलैला थोडासा घाम आला. डॉक्टरांना हायसे वाटू लागले. पण तब्येतीत उतार पडला नाही. इकडे टिळकांशी ज्यांचा वाद पराकोटीला पोहोचला होता, त्या अच्युतराव कोल्हटकरांनी आपल्या ‘‘संदेश’’ पत्रातून टिळकांच्या प्रकृतीसंबंधीच्या बातम्या तपशिलाने प्रसृत करण्यास सुरुवात केली. डॉ. वेलकर हे टिळकांचे अनुयायी शिवाय डॉक्टर. ते सांगतात, ‘‘लोकमान्यांचे दुखणे जसजसे वाढत गेले तसे समोरच्या हम रस्त्यावर लोकांचे थवेच्या थवे जमा होऊ लागले. ‘सरदार गृहाच्या’ तिस-या मजल्यावर लोकमान्य आहेत असे कळताच लोकांचे डोळे तिस-या मजल्यावर लागून राहिले.’’

३० जुलै १९२० दादासाहेब खापर्डे मुंबईत दाखल झाले. सोबत बापुजी अणे होते. खापर्डे लिहितात, ‘‘दुपारी (३० जुलैच्या) लोकमान्यांना भेटलो. हात जोडून नमस्कार केला. त्यांनी मला ओळखले असे वाटत नाही. सर नारायणराव चंदावरकर, गांधी... आदी पुष्कळ लोक चौकशी करायला आले. जीना चौकशीसाठी आले. इतके लोक आले की त्यांची यादी देणे शक्य नाही.
३० जुलैस गांधीजी टिळकांना भेटण्यास आले. याबाबत गांधीजी लिहितात, ‘‘टिळक गंभीर आजारी असल्याचे समजताच मी माझा आदरभाव व्यक्त करण्यासाठी त्यांच्याकडे गेलो. आमचे बोलणे झाले नाही.’’


३१ जुलै १९२० शनिवार रात्री ९ वाजता टिळकांना श्वास लागला. डॉ. भडकमकर, डॉ. देशमुख ही डॉक्टर मंडळी तिथे होतीच. रात्री १२ वाजून ४० मिनिटांनी म्हणजे उजाडत्या रविवारी ब्रिटिश कालनिर्णयानुसार रात्री १२ वाजता तारीख व दिवस बदलतो त्यानुसार १ आॅगस्ट १९२० रोजी टिळकांनी प्राणत्याग केला. ‘टिळक भारत’कार शि.ल. करंदीकर यांनी टिळकांचे मृत्यूचे वर्णन ‘योगेश्वराचा तनुत्याग’ असे केले.

टिळकांचे अंत्यदर्शन आणि अंत्ययात्रा
पहाटे टिळकांच्या निधनाची वार्ता लोकांना कळाली. हळुहळु लोक सरदार गृहाकडे जाऊ लागले. सकाळी तर सरदार गृहाचे दरवाजे बंद करावे लागले. पुण्यातही ही वार्ता पसरली. सकाळच्या मद्रास मेलने लोक मुंबईकडे निघाले. स्टेशनवर एवढी गर्दी उसळली की, रेल्वे अधिकाऱ्यांना स्पेशल ट्रेन सोडावी लागली. पुणेकरांना अंत्यविधी पुण्यात व्हावे असे वाटत होते, यावर बराच खल होऊन अखेर मुंबईस चौपाटीवर अंत्यसंस्कार करण्याचे ठरले. तशी अनुमती मुंबईच्या पोलीस कमिशनर यांना द्यावी लागली.

‘सरदारगृहा’बाहेर जमलेल्या प्रचंड जनसमुदायाची निराशा होऊ नये म्हणून पहिल्या मजल्याच्या सज्जात (बाल्कनीत) लोकमान्यांचा देह बसता करून लोकांच्या दर्शनार्थ आणून ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली. बायकांनी एका रस्त्याने येऊन दर्शन घेऊन दुस-या रस्त्याने जाण्याची व्यवस्था केली. सकाळी ६ वाजता लोकमान्यांचा भस्मचर्चित देह एका खुर्चीवर दर्शनासाठी ठेवण्यात आला. दर्शनासाठी लोकांची रिघ लागली होती. गांधीजी सकाळीच सरदारगृहात दाखल झाले होते.

दुपारी अंत्ययात्रा सुरू झाली. प्रेतासनाला खांदा अनेकांनी दिले. त्यात विविध जातीचे आणि धर्माचे लोक होते. गांधीजींनी खांदा दिला. गांधीजींच्या पाठोपाठ त्यांच्यासमवेत मौलाना शौकत अली पुढे सरसावले. टिळकांच्या अंत्यदर्शनासाठी अफाट जनसमुदाय सरदारगृहाबाहेर क्रॉफर्ड मार्केटपासून ते धोबी तलावापर्यंत रस्त्यावर उभा होता. तो एक प्रकारे लोकसागरच होता. चाळीस-पन्नास भजनी मंडळे आपली सेवा देण्यासाठी भक्तिभावाने उपस्थित होते. टिळकांची ही अंत्ययात्रा तीन ते चार कि.मी. लांबीची होती. दोन-अडीच लाख माणसे सहभागी झाली होती. त्यात हजारो गिरणी कामगार होते. ज्या वाहनातून ही यात्रा निघालेली होती त्या वाहनात उंच जागी हजारो फुलांच्या हारांनी देह जरी आच्छादिलेला असला, तरी तोंड आणि मस्तकाचा भाग मोकळाच होता. लोकमान्य हे जनतेच्या सिंहासनावर विराजमान झालेले अनभिषिक्त सम्राट होते. या यात्रेच्यावेळी पावसाची संततधार सुरू होती. अंत्ययात्रा चौपाटीवर पोहोचली. चंदनाच्या चितेवर लोकमान्यांचा देह ठेवण्यात आला. देशभक्त लाला लजपतराय त्या ठिकाणी आले. त्यांनी लोकमान्यांना वंदन केले. अवतीभवती प्रचंड जनसागर होता. मग यथाविधी संस्कार करून अग्नी देण्यात आला. अग्नीच्या ज्वाला उंच उंच जात होत्या.

१ आॅगस्टच्या दिवशी विविध नियतकालिकांतून लोकमान्यांवर मृत्युलेख प्रसिद्ध झाले. टिळकांच्या मृत्यूनंतर तीन दिवसांनी आचार्य अत्र्यांनी त्यांच्यावर ‘अकरावा अवतार’ या नावाचे दोनशे ओळींचे काव्य लिहिले. ते ‘उद्यान’ छापखान्यात ताबडतोब छापून घेतले. टिळकांच्या बाराव्या दिवशी हे काव्य प्रसिद्ध झाले. दोन आणे किमतीच्या या पुस्तकाच्या २००० प्रति एका आठवड्यात संपल्या. या काव्यातील दोन ओळी अशा आहेत. छत्रपतींच्या नव्या युगातील सरला अवतार, लपली म्यानी पुन्हा भवानी आजच तलवार ! खरोखरच असे ‘लोकमान्य’ पुन्हा होणे नाही.   

Web Title: Lokmanya Bal Gangadhar Tilak Special article

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.