‘अंतराळा’त तरंगण्याचा सोस पृथ्वीला सोसवेल का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 07:57 AM2021-07-24T07:57:39+5:302021-07-24T07:58:41+5:30

बेझोस म्हणतात,  ‘अंतराळ पर्यटनामुळे माणूस पृथ्वीच्या अधिक जवळ येईल!’ - पण, अब्जाधीशांच्या या नव्याकोऱ्या हौसेचे मोल फार महागडे आहे.

jeff bezos space tour and its impact on earth | ‘अंतराळा’त तरंगण्याचा सोस पृथ्वीला सोसवेल का?

‘अंतराळा’त तरंगण्याचा सोस पृथ्वीला सोसवेल का?

Next

असे म्हणतात की, “हौसेला मोल नाही!” सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबासाठी ही म्हण एखाद्या महागड्या गाडीसाठी, सोन्या-चांदीच्या फारफार तर हिऱ्याच्या दागिन्यांपुरती मर्यादित राहते. पण, हीच म्हण जर जगातील अब्जाधीशांबाबत लागू करायची झाली तर त्यांची हौस कोणतीही असो; त्याचं मोल त्यांच्यासाठी फार काही नसतं. ताजं उदाहरण म्हणजे, अंतराळ पर्यटनाच्या दोन घटना. दोन अब्जाधीश काही दिवसांच्या अंतराने अंतराळात काही मिनिटांची भ्रमंती करून आले आणि त्यांनी पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरवलं. पैसा किती खर्च झाला हा सर्वसामान्यांना पडणारा प्रश्न त्यांना खचितच पडला असेल. पण, त्यांनी आपल्या ‘बकेट लिस्ट’मधलं एक अशक्य वाटणारं स्वप्न पूर्ण केलं हेही तेवढंच खरं... पण, यासाठी पैसा हाच एक मापदंड लावून चालणार नाही. त्यासाठी लागणारी इच्छाशक्ती, धैर्य आणि मोठी स्वप्न पाहण्याची इच्छाशक्तीही तेवढीच गरजेची आहे.

ॲमेझॉनचे संस्थापक आणि मालक जेफ बेझोस आणि व्हर्जिन गॅलॅस्टिक या स्पेस फ्लाईट कंपनीचे संस्थापक रिचर्ड ब्रॅन्सन यांच्यात ती इच्छाशक्ती होतीच; शिवाय स्वप्न पूर्ण करण्याची धमकही. बेझोस आणि ब्रॅन्सन यांनी आपापल्या सहकाऱ्यांसोबत अंतराळात पर्यटन करून नवा इतिहास रचला आहे. त्यांच्या मोहिमांनी अंतराळ पर्यटनाच्या गेल्या अनेक वर्षांपासूनच्या चर्चा-अभ्यासांना आणि संशोधनांना नवं आकाश खुलं केलं आहे. शक्य-अशक्यतांच्या पातळीवर आतापर्यंत फिरणाऱ्या अंतराळ पर्यटनाच्या चर्चांना या दोघांनी पूर्णविराम दिलाय आणि ते प्रत्यक्षात शक्य असल्याचा पुरावाही दिलाय.

आतापर्यंत अंतराळातील प्रवास हा केवळ आणि केवळ संशोधनासाठी केला जायचा. नेमकं काय काय आहे आपल्या अवतीभोवती याची उत्सुकता मानवाला होती. त्यामुळे अंतराळ मोहिमांचा उद्देश एकच असायचा, पृथ्वीबाहेरील विश्वाचा शोध घेणे. या संशोधनात मानवाने बरीच प्रगती केली आहे आणि कोट्यवधी प्रकाशवर्ष दूरवर असलेल्या अनेक अद्भुत गोष्टींचा शोधही  घेतला आहे. चंद्रावर मानवाचे पाऊल पडले आहे आणि आता मंगळाच्या दिशेने प्रवास होऊ घातला आहे. तोही यशस्वी करण्यासाठी संशोधक जीवाचे रान करतील, यात तिळमात्र शंका नाही. रिचर्ड ब्रॅन्सन यांनी अंतराळात ८६.१८२ किलोमीटर एवढी उंची गाठली. हे उड्डाण म्हटले तर जेमतेम ३६ मिनिटांचे होते. रिचर्ड ब्रॅन्सन तसेच त्यांच्या सहप्रवाशांनी साधारण दोन मिनिटे अवकाशात शून्य गुरुत्वाकर्षणाचा अनुभव घेतला. जेफ बेझोस यांनी सहप्रवाशांसह अंतराळ कुपीतून १० मिनिटांची अंतराळ सफर केली. या सर्वांना तीन मिनिटे शून्य गुरुत्वाकर्षणाचा अनुभव घेता आला. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च झाले. त्यात अगदी ८२ वर्षांची आजीही होती आणि १८ वर्षांच्या विद्यार्थ्याचाही समावेश होता. त्यामुळे या भ्रमंतीला वयाची कोणतीही मर्यादा नसेल, हे अगदी स्पष्ट झालं आहे. केवळ एकच मुद्दा यात असेल तो म्हणजे त्यासाठी चुकवावी लागणारी किंमत... ती सर्वसामान्यांच्या कधी आवाक्यात येईल, हा प्रश्नही अद्याप स्वप्नवत आहे.

आता आणखी एक अब्जाधीश अंतराळाला गवसणी घालण्यासाठी आपली ताकद पणाला लावत आहेत. ते म्हणजे एलॉन मस्क. त्यांनी थेट मंगळावर पर्यटन करण्याचीही तयारी केली आहे. शिवाय बेझोस यांच्या ब्लू ओरिजिन या कंपनीने आगामी अवकाश मोहिमांसाठी नोंदणीही सुरू केली आहे. हे बेझोस म्हणतात, ‘अंतराळातील पर्यटनाचा प्रयोग मानवाला पृथ्वीपासून दूर घेऊन जाण्यासाठी नाही, तर आणखी जवळ आणण्यासाठी आहे.’- हे खरेच ‘गरजेचं’ आहे का? यावर आता जगभरात चर्चेला वेग येताना दिसतो.
अर्थात,  ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्यासाठी अंतराळ पर्यटन यापुढे केवळ स्वप्न नसेल. काय सांगावे, यापुढे कुणी हौशी अब्जाधीश  अंतराळात जाऊन लग्न करतो/करते म्हणेल! प्रश्न एवढाच आहे की, हे असे पर्यटन सुरू झाल्यास वाढत जाणारे प्रदूषण  पृथ्वीला सोसवेल का?

- पवन देशपांडे, सहायक संपादक, लोकमत
 

Web Title: jeff bezos space tour and its impact on earth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.