भारताच्या पुत्राचा पोर्तुगाल विजय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 04:51 PM2019-10-14T16:51:19+5:302019-10-14T16:53:39+5:30

भारतीय वंशाचे पहिले युरोपियन पंतप्रधान झालेले आंतोनियो कॉश्ता यानी प्रचंड मतांनी पोर्तुगालमधली सार्वत्रिक निवडणूक जिंकली

indian origin antonio costa wins portugal election | भारताच्या पुत्राचा पोर्तुगाल विजय

भारताच्या पुत्राचा पोर्तुगाल विजय

Next

- एड्गर वालीस

भारतीय वंशाचे पहिले युरोपियन पंतप्रधान झालेले आंतोनियो कॉश्ता यानी प्रचंड मतांनी पोर्तुगालमधली सार्वत्रिक निवडणूक जिंकली आहे. त्या देशात ६ ऑक्टोबर रोजी निवडणुका पार पडल्या.

आंतोनियो कॉश्ता यांच्या समाजवादी पक्षाला ३६.६५ टक्के मते मिळाली. पक्षाचे १०६ उमेदवार राष्ट्रीय संसदेत निवडले गेले. कॉश्ता यांचे राजकीय प्रतिस्पर्धी गणले जाणारे रुई रियो यांच्या नेतृत्त्वाखालील सोशल डेमोक्रेटिक पक्षाला २७.९० टक्के मिळाली असून त्या पक्षाचे ७७ सदस्य संसदेत पोहोचले आहेत. असे असले तरी कॉश्ता याना संपूर्ण बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे त्याना कम्युनिस्ट पक्ष आणि ब्लोको दी इस्केर्दा या डाव्या पक्षांच्या मतदीने  सरकार चालवावे लागेल. भारताप्रमाणेच पोर्तुगालमध्येही सरकार चालवताना संसदेचा बहुमताचा पाठिंबा असावा लागतो. कॉश्ता याना बहुमतासाठी आणखी दहा आमदारांची आवश्यकता होती. ती संख्या त्यांच्या पक्षाला स्वबळावर गाठता न आल्याने त्याना अन्य पक्षांची मदत घेऊनच सरकार चालवावे  लागणार आहे.

विजयोत्सव साजरा करताना जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात कॉश्ता यानी काही महत्त्वाच्या मुद्द्यांना स्पर्श केला आहे. ‘‘ पोर्तुगीज जनतेला माझे सरकार आणि आमची धोरणे आवडली आणि आपल्याला सक्षम समाजवादी पक्ष असल्याचे जनतेने निवडणुकीतून दाखवून दिलेय.’’ ‘‘लोकशाहीवादी पोर्तुगालमध्ये उजव्या विचारसरणीच्या पक्षांना दारूण पराभवाला सामोरे जावे लागलेय.’’ आणि, ‘‘मी नेहमीच सांगत आलोय, राजकीय स्थैर्य हे अनिवार्य असे मूल्य असते.’’

काय आहे कॉश्ता यांच्या या विजयामागचे रहस्य?
गेल्या चार वर्षांच्या कालावधीत पोर्तुगालले अन्य युरोपियन देशांच्या तुलनेत भरीव अशी आर्थिक प्रगती केली आहे. गुंतवणूक वाढलीय, निर्यात वाढलीय. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतली आपली वित्तीय पत त्या देशाने पुन्हा प्राप्त केली आहे. आता तो देश आपल्या देणेकऱ्याना ०.५ टक्के दराने व्याज देतो; चार वर्षांआधी त्याला ४ टक्के दराने व्याज द्यावे लागत असे. २०१५ साली बेरोजगारीचे प्रमाण १२.६ टक्के होते; आज ते ६.६ टक्क्यांवर आलंय. सरकारने वेतन कपात आणि पेन्शन कपातीचे सत्र आवरते घेतले आणि त्यामुळे राष्ट्रीय किमान वेतनाचा स्तर उंचावला. गरीब जनतेचे राहणीमान सुधारले आहे तसेच गरीब आणि श्रीमंतांमधली दरी अरूंद झालेली आहे. महत्त्वाचे म्हणजे देशाने गमावलेला आत्मविश्वास पुन्हा प्राप्त केला आहे.

याच यशाच्या पार्श्वभूमीवर कॉश्ता यानी निवडणूकपूर्व प्रचारात आपल्या नेतृत्त्वाखाली देशाने केलेल्या भरीव प्रगतीलाच प्रचाराचा मुद्दा बनवले. २०१५ सालच्या पोर्तुगालपेक्षा आजचा पोर्तुगाल कसा सरस आहे हे त्यानी सांगितले. २०१५ साली सोशल डेमोक्रॅट पक्षाला स्वबळावर बहुमत प्राप्त करता आले नव्हते. परिणामी कॉश्ता यांच्याकडे पंतप्रधानपदाची जबाबदारी देण्यात आली होती. 

कॉश्ता आणि त्यांच्या समाजवादी पक्षाच्या विजयाला आणखी एक महत्त्वाची किनार आहे. डावे सरकार सत्तेवर असलेले युरोपात अवघेच देश आहेत. बहुतेक देशांत पुराणमतवादी पक्षांची सरकारे सत्तारूढ असून फाजील लोकानुनयाचे सत्र सर्वत्र जारी आहे. खुद्द पोर्तुगागलगद णदेूोलमध्ये ‘चेगा’ ( या शब्दाचा अर्थ: ‘आता बास्स’) या पक्षाचा एक सदस्य संसदेसाठी निवडला गेलाय.

पोर्तुगाल प्रजासत्ताकाचे अध्यक्ष मार्सेलो रिबेलो डिसोझा यानी कॉश्ता यांची पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली असून आता ते आपले सरकार स्थापन करण्यात गुंतले आहेत.  आपण जुन्याच मंत्र्याना पुन्हा जबाबदारी देणार असून जनतेच्या हिताचेच निर्णय आपले सरकार घेईन अशी ग्वाही कॉश्ता यानी दिली आहे. 
 

Web Title: indian origin antonio costa wins portugal election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.