हसतमुख, दिलदार आणि विद्वान सहकारी

By Rajendra Darda | Published: January 22, 2022 05:41 AM2022-01-22T05:41:59+5:302022-01-22T05:44:20+5:30

ज्येष्ठ पत्रकार, ‘लोकमत’चे माजी समूह संपादक दिनकर रायकर यांचे जाणे वेदना देणारे आहे. हसतमुख, दिलदार, विद्वान सहकाऱ्याला आम्ही मुकलो.

Humorous kind Scholar collogue dinkar raikar and his memories | हसतमुख, दिलदार आणि विद्वान सहकारी

हसतमुख, दिलदार आणि विद्वान सहकारी

Next

- राजेंद्र दर्डा, माजी मंत्री आणि एडिटर इन चीफ, लोकमत मीडिया

पत्रकारितेतील उमेदीचा काळ इंडियन एक्स्प्रेससारख्या इंग्रजी वृत्तपत्र समूहात घालविल्यानंतर निवृत्तीनंतरच्या काळात मराठी पत्रकारितेत कोणी रमेल का, असा प्रश्न कोणी विचारल्यास त्याचे उत्तर नाही, असेच राहील. दिनकर रायकर यांनी हे म्हणणे सपशेल खोटे ठरविले.  निवृत्तीनंतर ते मराठी वृत्तपत्रसृष्टीत म्हणजेच ‘लोकमत’मध्ये केवळ रमलेच नाहीत, तर मराठी पत्रकारिता ही त्यांच्या जीवनाचा अंग बनून गेली. संपादक ते समूह संपादक आणि पुढे सल्लागार संपादक अशी मोठी जबाबदारी त्यांनी ‘लोकमत’ परिवारात पार पाडली. अखेरच्या श्वासापर्यंत ते लोकमत परिवाराचा भाग राहिले.
कोल्हापूरच्या लाल मातीत तयार झालेला आणि पुढे मुंबईतच रमलेला हा पहिलवान मराठवाड्याच्या दुष्काळी मातीत नुसता रमलाच नाही, तर या मातीत त्यांनी मोठा गोतावळा निर्माण केला. मुंबईसारख्या स्वप्ननगरीत संपूर्ण कारकीर्द घालविल्यानंतर औरंगाबादसारख्या शांत शहरात ते रमतील असे मला वाटले नव्हते.  माझा हा अंदाज दिनकर रायकर यांनी खोटा ठरविला. एक्स्प्रेस ग्रुपमध्ये वाढलेल्या दिनकर रायकर यांनी निवृत्तीनंतरची इनिंग ‘लोकमत’मध्ये सुरू केली.  



२००२ ते २००६ अशी चार वर्षे ते औरंगाबाद आवृत्तीत संपादक राहिले. औरंगाबाद शहर समजून घेण्यासाठी प्रारंभीच्या काळात सहकाऱ्यांच्या स्कूटरवर त्यांनी अगदी गल्लोगल्ल्या पालथ्या घातल्या. या चार वर्षांत त्यांनी औरंगाबाद कार्यालयातील न्यूज रूमचे वातावरण बदलून टाकले. साऱ्या जगाची चिंता आपल्यालाच आहे, अशा ओझ्याखाली का जगायचे, काम करीत असताना आनंद देत राहा, आनंद घेत राहा असे ते म्हणायचे. दिनकर रायकर अखेरच्या श्वासापर्यंत असाच आनंद वाटत राहिले. 

पुढे २००६ ते २००९ पर्यंत मुंबई आवृत्तीचे संपादक म्हणून त्यांनी यशस्वी धुरा सांभाळली. २००९ ते २०२० जवळपास ११ वर्षे ‘लोकमत’चे समूह संपादक म्हणून त्यांनी काम पाहिले. पत्रकाराला वयाचे बंधन नसते. त्याला प्रत्येक गोष्टीचे किमान ज्ञान आवश्यक असते. पत्रकारितेत येणाऱ्या नव्या पिढीला ते हे नेहमी सांगायचे. काम करणाऱ्या माणसाच्या हातूनच चुका होतात, हे सांगत असताना एकच चूक पुन्हा होऊ द्यायची नसते हेही ते सांगायला विसरत नसत.
मराठी माणसाने आत्मविश्वासाने जगायला पाहिजे. विशेषत: गावाकडून येणाऱ्या तरुणांनी तर अधिक आत्मविश्वासाने पुढे आले पाहिजे, असे ते आग्रहाने सांगत असत. ‘लोकमत’ परिवारातील संपादकीय विभागातील अधिकतर सहकारी खेडेगावातून आले. मुंबईत संपादक झाले तेव्हा अशा तरुण सहकाऱ्यांना ते मुद्दाम पंचतारांकित हॉटेलमधील पत्रकार परिषदांना पाठवीत असत. गावखेड्यातून आलेल्या अनेक तरुणांना त्यांनी आत्मविश्वासाने उभे केले. यातील अनेक जण आज संपादक म्हणून यशस्वीपणे काम करीत आहेत. 



राज्यात ४५ पेक्षा जास्त संपादक घडविणारे दिनकर रायकर संपादक म्हणून जेवढे कठोर होते, तेवढेच ते मिश्कीलदेखील होते. न्यूज रूम गंभीर झाली, की एखादा किस्सा घेऊन ते आनंद पेरत राहायचे. त्यांच्यासमोर दैनिकाचे पान दाखविण्यासाठी नेताना भल्याभल्या उपसंपादकाची घाबरगुंडी उडायची. काही मिनिटांत पूर्ण पान वाचून चुकांवर लाल मार्क यायचे. त्यांच्या नजरेतून अंकातील चूक अजिबात सुटायची नाही.

महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्र्यांपासून ते आताच्या उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत सर्वच मुख्यमंत्र्यांचा जवळून परिचय असलेल्या मोजक्या संपादकांपैकी ते एक.  संपादक म्हणून यशस्वी राहिले, तेवढेच ते रिपोर्टर म्हणून देखील यशस्वी राहिले. त्यांच्यातील पत्रकार त्यांनी कधीच मरू दिला नाही. वाचनाची अफाट गती आणि प्रत्येक बातमीवर तातडीने रिॲक्ट होण्याचा स्वभाव यामुळे ते कायम बातमीत रमत राहिले. सामाजिक, आर्थिक, राजकीय आदी कुठलाही विषय त्यांना वर्ज्य नव्हता. कुठल्याही विषयावर केवळ त्यांचा अभ्यासच नव्हता तर ते व्यक्त करण्याची कलादेखील त्यांना अवगत होती. कुठलीही व्यक्ती पहिल्या भेटीतच दिनकर रायकरांच्या प्रेमात पडायची, ते यामुळेच. निसर्ग नियमाप्रमाणे वयानुसार ते वृद्ध झाले होते. मात्र, पंचविशीतल्या तरुणाला लाजवील असा त्यांचा उत्साह शेवटच्या श्वासापर्यंत कायम होता. त्यांचे कायम उत्साही असण्याचे औषध मात्र त्यांनी आम्हाला कधीच सांगितले नाही. राजकारणापासून ते समाजकारणापर्यंत सर्वच क्षेत्रांत त्यांचा चाहता वर्ग मोठा. ‘लोकमत’मध्येदेखील केवळ संपादकीय विभागातच त्यांचे चाहते आहेत असे नाही, तर सर्वच विभागातील सहकारी त्यांचे चाहते राहिले. काम करताना ताण न घेणे. हसत-खेळत काम करणे आणि सर्वांना तसे करायला भाग पाडणे या त्यांच्या स्वभावामुळे त्यांनी न्यूज रूम जितकी सिरियस ठेवली तितकीच ती हसती-खेळतीदेखील ठेवली.

खरे तर इंडियन एक्स्प्रेसमधून निवृत्त झाल्यानंतर दुसरा एखादा पत्रकार कौटुंबिक जीवनात रमला असता. दिनकर रायकर असे सर्वसामान्यांमधले नव्हते. निवृत्तीनंतर जवळपास २२ वर्षे म्हणजे अख्खी एक इनिंग त्यांनी ‘लोकमत’ परिवारासोबत काम केले. निवृत्तीनंतर ‘लोकमत’ परिवारात ते आले तरी त्यांच्या कामात, कामांच्या वेळात निवृत्ती कधीच जाणवली नाही. ती आता कायमचीच जाणवणार आहे.

Web Title: Humorous kind Scholar collogue dinkar raikar and his memories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.