Howdy Modi : अमेरिकेत भारतीयांच्या प्रभावाचा चढता आलेख

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 05:42 AM2019-09-30T05:42:53+5:302019-09-30T05:44:07+5:30

ह्युस्टन येथे गेल्या रविवारी अमेरिकी-भारतीय समुदायाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांची प्रतीक्षा करीत होते तेव्हा अनेक भारतीयांच्या नक्कीच असे मनात आले की, आपल्या पंतप्रधानांना खोळंबून ठेवले जात आहे.

Howdy Modi: The impact of Indians' influence in the United States | Howdy Modi : अमेरिकेत भारतीयांच्या प्रभावाचा चढता आलेख

Howdy Modi : अमेरिकेत भारतीयांच्या प्रभावाचा चढता आलेख

Next

- विजय दर्डा
(चेअरमन, एडिटोरियल बोर्ड,
लोकमत समूह)

 ह्युस्टन येथे गेल्या रविवारी अमेरिकी-भारतीय समुदायाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांची प्रतीक्षा करीत होते तेव्हा अनेक भारतीयांच्या नक्कीच असे मनात आले की, आपल्या पंतप्रधानांना खोळंबून ठेवले जात आहे. लोकांना असे वाटत होते की, ट्रम्प यांनी आधी यायला हवे होते किंवा निदान मोदी व त्यांनी सभास्थानी एकत्र तरी यायला हवे होते. परंतु राजनैतिक पातळीवर हे गणित काही वेगळेच होते. अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीय समाजाने तो कार्यक्रम आयोजित केला होता. भारताचे पंतप्रधान या नात्याने यजमान म्हणून नरेंद्र मोदी आधी आले व ट्रम्प आल्यावर मोदींनी त्यांचे स्वागत करून त्यांना आधी बोलण्यासाठी निमंत्रित केले. एवढेच नव्हे तर अस्खलित इंग्रजीत मोदींनी ट्रम्प यांची स्तुती करताना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी जणू त्यांची पुन्हा उमेदवारीच जाहीर करून टाकली. मोदींनी हे जे केले ते ठीक नाही, परंपरेला सोडून आहे, असा आक्षेप काँग्रेसने घेतला. पण मोदी परंपरेची पर्वा करणारे नव्हे तर स्वत: नव्या परंपरा सुरू करणारे आहेत!
ट्रम्प यांनी त्यांच्या भाषणाच्या सुरुवातीसच एका महत्त्वाच्या गोष्टीचा उल्लेख केला. ते म्हणाले की, अमेरिका व भारत या दोन्ही देशांच्या राज्यघटनांची सुरुवात ‘वी द पीपल’ या तीन शब्दांनी होते. जगासाठी हा एक मोठा संदेश होता. खरे तर दोन्ही देशांच्या संदर्भात एक किस्सा येथे जरूर सांगावा लागेल. सन १४९२ मध्ये कोलंबस युरोपहून भारतात जाण्याचा जवळचा रस्ता शोधण्यासाठी सागरी सफरीवर बाहेर पडले. पण ते पोहोचले अमेरिकेजवळच्या एका बेटावर. आपण भारतातच पोहोचलो असे त्यांना वाटले. जवळच्याच आणखी एका बेटावर त्यांना तांबूस वर्णाचे आदिवासी लोक भेटले. कोलंबस यांनी त्यांना ‘रेड इंडियन्स’ असे नाव दिले. काही वर्षांनी अमेरिगो वेस्पूची या आणखी एका सागरी सफरवीराने कोलंबस यांनी शोधलेला प्रदेश भारत नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर अमेरिगो यांच्या नावावरून त्या प्रदेशास अमेरिका असे संबोधले जाऊ लागले. नंतर बरीच वर्षे तेथे युरोपने राज्य केले. सन १७७६ मध्ये अमेरिकेने ‘युनायटेड स्टेट््स आॅफ अमेरिका’ या नावाने स्वत:ला स्वतंत्र देश म्हणून घोषित केले. त्यानंतर अमेरिकेने केलेल्या प्रगतीची कहाणी सर्व जग जाणते.
आज त्याच अमेरिकेत भारतीय समुदाय आपले कर्तृत्व आणि प्राबल्य दाखवून देत आहे. सुमारे ५० लाख भारतीय अमेरिकेत वास्तव्य करत आहेत. अमेरिकेच्या प्रगतीत त्यांचे नक्कीच महत्त्वाचे योगदान आहे. आज मोठमोठ्या अमेरिकी कंपन्यांचे ‘सीईओ’ व ‘एमडी’ भारतीय अथवा भारतीय वंशाचे आहेत. एका सर्वेक्षणानुसार अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या विविध वांशिक समुदायांमध्ये भारतीय वंशाचे लोक सर्वात पुढे आहेत. चीनमधूनही मोठ्या संख्येने तरुण शिक्षणासाठी अमेरिकेत जातात. पण तेथे भारतीयांना लवकर नोकरी मिळते. अमेरिकेच्या राजकारणातही भारतीयांची घट्ट पकड आहे. भारत व अमेरिकेने अधिक जवळ यावे यासाठी सतत प्रयत्न करणारा भारतीयांचा एक मोठा वर्ग अमेरिकेत आहे.
भारतीय लोकांचा प्रभाव आणि त्यांची मोठी संख्या यामुळे अमेरिकेतील राजकीय पक्षांनाही त्यांचा पाठिंबा हवा असतो. ह्यूस्टन येथील कार्यक्रमात ट्रम्प स्वत:हून आले. नरेंद्र मोदी यांच्यासाठी हा राजनैतिक विजय होता. एखाद्या वांशिक समाजाने आयोजित केलेल्या कार्यक्रमास अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष स्वत:हून येण्याची ही पहिलीच वेळ होती. नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांना ‘लॉन्च’ करताना इंग्रजीत त्यांची खूप स्तुती केली. हिंदीमधून भाषण करताना त्यांनी स्पष्ट केले की, जम्मू-काश्मीरच्या बाबतीत कोणाचेही ऐकून घेतले जाणार नाही. त्यांनी पाकिस्तानला सज्जड संदेशही दिला. एवढेच नव्हे तर मुठी आवळून ट्रम्प यांना सोबत घेऊन स्टेडियममध्ये फेरी मारणे हाही मोदींच्या राजनैतिक डावपेचांचाच भाग होता. एकप्रकारे पक्की दोस्ती दाखविण्याचा तो भाग होता. खरं तर मोदींनी अमेरिकेच्या भूमीवर पाकिस्तानला चारी मुंड्या चीत केले! त्या वेळी इम्रान खानही अमेरिकेतच होते. त्यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. मोदी यांची दहशतवादाच्या विरोधात जगाला एकत्र येण्याची हाकही योग्यच होती. ट्रम्प यांनाही इस्लामी दहशतवादाचा उल्लेख करावा लागला, हा मोदींचा मोठा विजय होता.
सध्या आपल्याला भारताची गरज आहे, हे अमेरिका जाणून आहे. चीनच्या समोर खंबीरपणे उभे राहण्याची ताकद फक्त भारतात आहे. त्याचप्रमाणे अफगाणिस्तानचा गुंता सोडविण्यातही भारत मोठी भूमिका बजावू शकतो, याचाही कोणी इन्कार करू शकत नाही. गेली अनेक वर्षे अमेरिकेने पाकिस्तानला गोंजारण्याचे धोरण अवलंबिले हे खरे. पण आता परिस्थिती बदलली आहे. भारत बलशाली होत आहे. अमेरिकेत तंत्रज्ञानापासून व्यापार व राजकारणापर्यंत भारतीय समुदायाचे चांगले वजन आहे. त्यामुळे अमेरिकेच्या नजरेत भारताची किंमत व गरज वाढणे हे अपरिहार्य आहे!

Web Title: Howdy Modi: The impact of Indians' influence in the United States

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.