आनंददायी शिक्षण पुन्हा कसे मिळेल?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 03:19 AM2019-06-22T03:19:29+5:302019-06-22T03:21:00+5:30

सध्याच्या स्पर्धात्मक वातावरणात आपण शिक्षणाच्या गुणवत्तेची आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याची कितपत काळजी करायला हवी? शिक्षण घेण्यातला आनंद मुले केव्हाच गमावून बसली आहेत.

How will we get a happy education again | आनंददायी शिक्षण पुन्हा कसे मिळेल?

आनंददायी शिक्षण पुन्हा कसे मिळेल?

googlenewsNext

- डॉ. एस. एस. मंठा

केंद्रीय शिक्षण मंडळाच्या सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षेत २००८ साली ४०० पेक्षा कमी विद्यार्थी ९५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवू शकले होते. त्यानंतरच्या सहा वर्षांत या संख्येत २३ टक्के वाढ होऊन २०१४ साली विद्यार्थी संख्या ९००० पर्यंत पोहोचली, २०१८ साली ही वाढ ३८ टक्के झाली व विद्यार्थी संख्या १४,९०० झाली. हीच स्थिती राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेतही दिसू लागली आहे. त्याविषयी एकीकडे आनंद व्यक्त करीत असताना, दुसरीकडे आत्मपरीक्षण करण्याचीही गरज वाटू लागली आहे. गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांच्या संख्येत होणाऱ्या वाढीपासून काय बोध घ्यायचा.



दहापैकी दहा गुण मिळणे ही अलीकडे साधारण अवस्था होऊ पाहत आहे. मग ती सीबीएसईची परीक्षा असो की, राज्य माध्यमिक-उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची परीक्षा असो, ५०० पैकी ४९९ गुण मिळणे किंवा ५०० पैकी ५०० गुण मिळणे ही साधारण स्थिती होऊ पाहत आहे. याचा अर्थ पूर्वीच्या पिढीपेक्षा आजची पिढी अधिक हुशार आहे, असा निष्कर्ष काढायचा का?

शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये युक्तिवाद करण्याचे, पृथक्करण करण्याचे आणि समंजसपणाचे कौशल्य वाढावे, अशी अपेक्षा असते. ती क्षमता आजच्या विद्यार्थ्यांमध्ये त्यांना मिळणाऱ्या शिक्षणामुळे येते आहे का? की आपण त्यांना मिळणाऱ्या गुणांचाच विचार करणार आहोत? आज मिळणारे शिक्षण कितपत गुणवत्तापूर्ण आहे? आपल्याला परीक्षेत काय विचारले जाणार आहे, हे विद्यार्थी अगोदरच जाणून घेऊन परीक्षेत अतुलनीय यश मिळवितात का? विज्ञानाचे विषय सोडा, पण भाषेच्या विषयातही विद्यार्थी ९० पेक्षा अधिक गुण मिळवू लागले आहेत. तेव्हा परीक्षेचे जे मॉडरेशन केले जाते, त्याची फेरतपासणी होणे गरजेचे झाले आहे.



२०१६ सालापासून एक नवीन ट्रेन्ड पाहावयास मिळू लागला आहे. सीबीएसई बारावीच्या परीक्षेत मुले आणि मुली यांच्यातील उत्तीर्ण होण्यात दहा टक्क्यांचा फरक दिसू लागला आहे. २०१६ साली मुली ८८ टक्के तर मुले ७८ टक्के, २०१७ साली मुली ९५ टक्के तर मुले ८९ टक्के, २०१८ साली मुली ८८ टक्के तर मुले ७९ टक्के असे प्रमाण दिसून आले. मुलांपेक्षा मुली अधिक चमकताना दिसतात. कारण त्यांची अभ्यासाप्रति बांधिलकी अधिक असते. याचा अर्थ, शाळांमध्ये मुलींचे प्रवेश अधिक प्रमाणात होतात, असा काढायचा का? की नापास होणाऱ्यांत मुलांचे प्रमाण अधिक असते? तसे असेल, तर त्याची कारणे शोधायला हवीत. दहावी परीक्षेतही हाच ट्रेन्ड पाहावयास मिळतो.



संपूर्ण देशातील १६ लाख शाळांपैकी मोजक्या चांगल्या शाळा वगळल्या, तर अन्य शाळांत विद्यार्थ्यांची खोगीरभरती सुरू असते. त्यामुळे विद्यार्थ्यांकडे व्यक्तिगत लक्ष दिले जात नाही. कुठे कुठे तर अजिबात लक्षच दिले जात नाही. विद्यार्थी-शिक्षक यांच्यातील प्रमाणाला धरबंधच नसल्यामुळे विद्यार्थी कोचिंग क्लासच्या मागे धावत असतात. त्यामुळे अनुभवी शिक्षक नोकऱ्या सोडून कोचिंग क्लास चालविण्याकडेच लक्ष पुरविताना दिसतात. मानव संसाधन मंत्रालयाने लोकसभेत जी माहिती पुरविली, ती पाहता शासनातर्फे चालविल्या जाणाऱ्या संपूर्ण देशातील प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांच्या १८ टक्के जागा रिक्त आहेत, तर माध्यमिक शाळांमधील १५ टक्के जागा रिक्त आहेत, असे दिसून येते. मुलांचे पालक नोकरीवर जात असल्याने गृहपाठाकडे लक्ष देण्यास कुणाला वेळ नसतो. कोचिंग क्लासेसने ही त्रुटी भरून काढली आहे. त्यामुळे कोचिंग क्लासेसची बाजारपेठ दरवर्षी वेगाने वाढते आहे. २०२० सालापर्यंत तिची उलाढाल ३० बिलियन डॉलर्सची मर्यादा ओलांडेल, असा अंदाज आहे.



नॅशनल सॅम्पल सर्व्हेच्या सर्वेक्षणानुसार प्रत्येक चार विद्यार्थ्यांतील एक विद्यार्थी हा कोचिंग क्लासला जात असतो, असे दिसून आले आहे. कोचिंग क्लासेसची वेगवेगळी रूपे पाहावयास मिळतात. क्लासरूम कोचिंग, स्टडी सर्कल, घरची शिकवणी आणि ऑनलाइन शिकवणी त्यात ९६ टक्के शिकवणी ही समोरासमोर करण्यात येते. ऑनलाइन कोचिंग आणि क्लासरूम कोचिंगची बाजारपेठ रु. ३,५०० कोटींची आहे. आता ग्रामीण भागातही इंटरनेटने प्रवेश केला असल्याने ऑनलाइन शिकवणीचे प्रमाण वाढते आहे. या नव्या बाजारपेठेत भांडवलदारांनीही रुची घ्यायला सुरुवात केली आहे.



सध्याच्या स्पर्धात्मक वातावरणात आपण शिक्षणाच्या गुणवत्तेची आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याची कितपत काळजी करायला हवी? शिक्षण घेण्यातला आनंद मुले केव्हाच गमावून बसली आहेत. खरी चिंता काहीच कामगिरी दाखवू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि शालेय स्तरावर अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची वाटू लागली आहे. मुले १०० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण होऊ लागल्याने महाविद्यालयात प्रवेश घेण्याचे कटऑफ गुणही वाढले आहेत. त्यामुळे चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळणे दुरापास्त झाले आहे. तेव्हा शिक्षणातून हरवलेला आनंद पुन्हा कसा मिळवून देता येईल, याचा विचार व्हायला हवा. शिक्षण ही अशी संपत्ती आहे, जिचा उपयोग जगात कुठेही होऊ शकतो, ही चिनी म्हण लक्षात घेऊन, त्यानुसार सुरुवात करण्याची खरी गरज आहे.

(लेखक एआयसीटीई एडीजेचे माजी चेअरमन आणि एनआयएएस बंगळुरूत प्रोफेसर आहेत)

Web Title: How will we get a happy education again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.